मुंबई : (Vishwas Nangare Patil Hindu Sammelan) वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची सानपाडा येथे आयोजित 'सकल हिंदू संमेलना'च्या व्यासपीठावरील उपस्थिती काँग्रेसला चांगलीच झोंगल्याचे दिसून आले. विश्वास नांगरे पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त काढलेल्या गौरवोद्गारांमुळे काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला, त्यांच्या भूमिकेविरोधात टीका केली. हिंदू संमेलनाच्या व्यासपीठावरील त्यांच्या उपस्थितीवरून काँग्रेसकडून केली जाणारी टीका कितपत योग्य आहे, असा प्रश्न हिंदुत्ववादी संघटनांकडून उपस्थित केला जातोय.
सानपाडा येथे पार पडलेल्या 'सकल हिंदू संमेलनात अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांसमोर आपले विचार मांडले. त्याचप्रमाणे वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सुद्धा उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले, तसेच दूरदर्शी राष्ट्रभक्त म्हणून संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचाही उल्लेख केला. परंतु, नांगरे पाटील यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने त्यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली.
काँग्रेसच्या मते, संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ घेतलेले अधिकारी जर संघाची जाहीर स्तुती करणार असतील, तर त्यांना कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी कसे म्हणायचे? शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे कोणत्याही विशिष्ट विचारसरणीची किंवा संघटनेची बाजू घेणे म्हणजे लोकशाही आणि संविधानाचा अपमान आहे, असा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तुम्ही सरकारी नोकर आहात, संघाचे स्वयंसेवक नाही, असेही काँग्रेसने म्हटले.
जर एखाद्या व्यक्तीच्या किंवा अधिकाऱ्याच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होत असेल आणि एक हिंदू म्हणून ते हिंदू संमेलनाच्या व्यासपीठावर आपल्याच बांधवांना संबोधित करण्यासाठी जात असतील, तर त्यात चुकीचे काय? कोणत्याही व्यक्तीला आपल्या संस्कृतीबद्दल आणि विचारांबद्दल अभिमान बाळगण्याचा पूर्ण अधिकार संविधानाने दिला आहे. अशा स्थितीत काँग्रेसला एवढा 'पोटशूळ' का उठत आहे, असा प्रश्न हिंदुत्ववादी संघटनांकडून विचारण्यात येत आहे. (Vishwas Nangare Patil Hindu Sammelan)
काँग्रेस पुन्हा तोच जुना वाद उकरून काढू पाहतंय?
काँग्रेसचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असणारा विरोध नवीन नाही. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने अनेकदा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याकाळात आणि पुढे काँग्रेसचे सरकार असेपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना संघात जाण्यास किंवा संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास कायदेशीर बंदी होती. संघात जाणारे कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावर दबाव टाकला जायचा किंवा नोकरी सोडण्यासाठी भाग पाडले जायचे. आज विश्वास नांगरे पाटलांच्या भूमिकेवरून काँग्रेस पुन्हा एकदा तोच जुना वाद उकरून काढू पाहत असल्याचे दिसते. (Vishwas Nangare Patil Hindu Sammelan)
अनेक सामाजिक कार्यक्रमात उपस्थिती
जानेवारी २०२६ - महानगर मराठी साहित्य संमेलन (मुंबई)
नोव्हेंबर २०२५ - बालकुमार मराठी साहित्य संमेलन (पुणे)
जून २०२५ - माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शाळांचा गुणगौरव सोहळा
मार्च २०२३ - सिंबायोसिस इंटरनॅशनल (सम-विश्वविद्यालय) आजोजित 'यूथ-२० कन्सल्टेशन'
ऑगस्ट २०२२ - मुंबई पोलिस आयोजित स्वातंत्र्य अमृत महोत्सव ७५ किमी. दौड
इत्यादी अशा अनेक कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली आहे.
प्रत्येक गोष्टीत संघविरोध शोधण्याऐवजी देशहिताच्या मुद्द्यांवर चर्चा करा
देशात विचारस्वातंत्र्य फक्त काँग्रेसच्या विचारांशी सहमत असणाऱ्यांसाठीच आहे का? एखादा अधिकारी एखाद्या सांस्कृतिक किंवा सामाजिक व्यासपीठावर गेला, काही सकारात्मक अनुभव मांडले, तर लगेच संविधान धोक्यात आले, लोकशाही संकटात आली आणि खाकी वर्दीचा अपमान झाला, असे चित्र उभे केले जाते. पण याच निकषाने काँग्रेसच्या विचारसरणीशी संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या किंवा त्यांच्या नेत्यांचे कौतुक करणाऱ्या व्यक्तींवर त्यांनी कधी आक्षेप घेतला का? आजचे काँग्रेसचे स्वरूप म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातली मुस्लिम लीग असेच आहे. एखादा सरकारी अधिकारी जर अन्य धर्मीयांच्या कार्यक्रमात गेला असता तर याच काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचे ढोल बडवले असते. लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण विशिष्ट संघटनांविषयीचा जुना वैचारिक आकस वारंवार उकरून काढून व्यक्तींच्या देशसेवेवर प्रश्नचिन्ह उभे करणे हा राजकीय दुटप्पीपणाचा नमुना आहे. काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे आणि प्रत्येक गोष्टीत संघविरोध शोधण्याऐवजी देशहिताच्या मुद्द्यांवर चर्चा करावी.
- मोहन सालेकर, प्रांत मंत्री, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक