व्यापारासाठी सुरक्षितता, विद्येसाठी स्वतंत्रता!


(अमेरिकेतल्या ‌‘टाईम‌’ साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर चित्र झळकणे हा एकेकाळी बहुमान असे. 1953 साली इगोर सिकोर्‌‍स्की आणि त्याची हेलिकॉप्टर विमाने ‌‘टाईम‌’च्या मुखपृष्ठावर झळकली.)

जगातील पहिल्या विमाननिर्मितीचे श्रेय दिले जाते ते अमेरिकेतील राईट बंधूंना. पण, जगातील पहिल्यावहिल्या हेलिकॉप्टरचा शोध कुणी लावला, या प्रश्नाचे उत्तर मात्र तितक्या सहजपणे देता येत नाही. कारण, ज्या माणसाने पहिल्यांदा हेलिकॉप्टर बनविले, तो जन्माने रशियन-युक्रेनियन असला तरी कर्माने अमेरिकन. अशा या इगोर सिकोर्‌स्कीची ही कहाणी...

इसवी सनाच्या 17व्या शतकात मुघल साम्राज्य हे भारतातले सर्वात मोठे राज्य होते. त्याची राजकीय राजधानी दिल्ली-आग्रा असली, तरी आर्थिक राजधानी होती सुरत. मुघल बादशाहीच्या खजिन्यातला महसुलाचा मोठा हिस्सा, सुरतेच्या बंदरातून चालणाऱ्या देशी-विदेशी व्यापारातून निर्माण होत होता.

पश्चिम किनारपट्टीवर मुघलांच्या खालोखाल मोठे राज्य होते ते आदिलशहाचे. त्याचीही राजकीय राजधानी होती शहर विजापूर; पण आर्थिक राजधानी होती, कोकण किनाऱ्यावरचे दाभोळ. सन 1659 साली अफजलखानाला ठार केल्याबरोबर तातडीने शिवरायांनी दाभोळ जिंकले, ते उगीच नव्हे.

सन 1664 आणि 1670 अशी दोनवेळा शिवरायांनी बलाढ्य मुघल सत्तेची आर्थिक राजधानी सुरत साफ लुटली. याचा चटका इतर कुणाला किती जाणवला असेल, नसेल; पण इंग्रजांना फारच जाणवला.

सन 1662 साली मुंबई बेट इंग्रजी राजाच्या ताब्यात आले. सन 1668 साली राजाने ते ‌‘ईस्ट इंडिया कंपनी‌’ला भाडेपट्ट्याने दिले. सन 1669 साली जेराल्ड अँजियर हा अत्यंत हुशार आणि दूरदर्शी इसम मुंबईचा गव्हर्नर झाला. शिवाय, त्याच्याकडे सुरतेच्या मुख्य वखारीचे अध्यक्षपदही होतेच. तेवढ्यात म्हणजे 1670 साली शिवरायांनी सुरत दुसऱ्यांदा लुटली. तेव्हा अँजियरने मनाशी पक्की खूणगाठ बांधली की, आता आपला मुख्य व्यापार सुरतेहून मुंबईला हलवायचा.

कशी होती यावेळी मुंबईची स्थिती? मुंबईच्या उत्तरेला वांद्रे-कुर्ले ते वसई-ठाणे या भागात पोर्तुगीजांची प्रबळ आरमारी सत्ता होती. मुंबईच्या दक्षिणेला जंजिरेकर सिद्दीची प्रबळ आरमारी सत्ता होती. मुंबईच्या पश्चिमेला अफाट समुद्र होता. मुंबईच्या पूर्वेला उल्हास नदीच्या खाडीने बनलेला; पण अतिशय सुरक्षित, खोल समुद्र होता नि या समुद्रापलीकडे पनवेलपासून थेट मालवणपर्यंत शिवरायांचे राज्य होते.

पोर्तुगीज आणि सिद्दी हे आरमारीदृष्ट्या जसे प्रबळ होते, तसेच ते कमालीचे धर्मांध होते. हिंदूंची गावे लुटणे, जाळणे, कत्लेआम करणे आणि मनसोक्त बाटवाबाटवी करणे, हे त्यांचे अत्यंत आवडते छंद होते. त्यामुळे मुंबईच्या भोवतालची कोकणपट्टी सततच्या लढायांनी नुसती गांजून गेली होती. सुरतेला मुघली अधिकारी हे भयंकर भ्रष्ट होते. लाच खाल्ल्याशिवाय ते कोणतेही काम करीत नसत.

जेराल्ड अँजियर हा मुळात एका प्रोटेस्टंट पाद्य्राचा मुलगा होता. पण, त्याच्या व्यापारी इंग्लिश रक्ताने त्याला अचूक संधी दाखवली. त्याने मुंबईचा गव्हर्नर या नात्याने एक जाहीरनामा काढला आणि तो पोर्तुगीज, सिद्दी, मराठे, मुघल, आदिलशहा अशा सर्व शेजारी सत्तांच्या मुलखातल्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचेल, असे पाहिले. या जाहीरनाम्याचा आशय असा होता की, ‌‘आता मुंबईवर आमचे राज्य आहे. आम्ही व्यापारी लोक आहोत. तुम्ही धर्माने कुणीही असा. आमच्या राज्यात या आणि सुखाने व्यापार करा. आम्ही तुमच्या धार्मिक बाबतीत अजिबात ढवळाढवळ करणार नाही. आम्ही तुमच्या व्यापाराला संपूर्ण संरक्षण आणि उत्तेजन देऊ. मुंबईत या. शांतपणे व्यापार करा. तुम्ही मोठे व्हा नि आम्हालाही मोठे करा.‌’

मुंबईच्या आर्थिक राजधानी बनण्याची ही सुरुवात होती. व्यापार-उदीम वाढूनच राज्याचा खजिना समृद्ध होत असतो आणि तो वाढण्यासाठी व्यापारी वर्गाला हवी असते शांतता आणि सुरक्षिततेची हमी! हे अँजियरला कळले. शिवरायांना, शंभूराजांना, चिमाजी अप्पांना आणि माधवरावांनादेखील हे कळत होते. पण, नियतीने बिचाऱ्यांना आयुष्यच इतके कमी दिले की, राज्याची आर्थिक बाजू मजबूत करायला त्यांना वेळच मिळाला नाही.

व्यापारवाढीसाठी शांतता आणि सुरक्षितता किती महत्त्वाची असते, याचे एकच ठळक उदाहरण पाहूया. ठाण्याजवळ घोडबंदर नावाचे गाव आहे. ते अर्थातच, पोर्तुगीज मुलखात होते. धार्मिक छळाला गावकरी अगदी कंटाळून गेले होते. अशा स्थितीत मुरकुटे आडनावाच्या एका इसमाने इंग्रजी हद्दीत म्हणजेच मुंबईला स्थलांतर केले. जीवित, वित्त आणि धर्म यांच्या बाबतीत सुरक्षितता मिळाल्यावर मुरकुटे मंडळींनी अनेक प्रकारचा व्यापार सुरू करून अफाट संपत्ती मिळवली. गणबाशेट मुरकुटे यांच्या मुंबईच्या फोर्टमधल्या पेढीवर कायम 17 लाख रुपये रोख ठेवलेले असत. कोणत्याही क्षणी गरज लागल्यास वापरता यावेत म्हणून! लक्षात घ्या, 18व्या शतकातले रोख 17 लाख चांदीचे रुपये, कागदी नोटा नव्हे! गणबाशेट मुरकुटे यांचे पणतू म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना, ज्यांनी भारतात रेल्वे सुरू केली आणि अक्षरश: युगप्रवर्तन केले.

आता आपण भारताच्या सुदूर वायव्येला नजर टाकूया. तो पहा काळा समुद्र. आशिया खंड आणि युरोप खंड यांना विभागणारा काळा समुद्र हे खरे म्हणजे एक प्रचंड सरोवरच आहे आणि तो पाहा त्याच्या उत्तर काठावरचा युक्रेन नामक देश. युक्रेन देश हे अख्ख्या युरोप खंडाचे गव्हाचे कोठार मानले जाते. खरेतर युक्रेन हा वेगळा देश होता. पण, रशियन झार राजांनी तो हळूहळू करत पूर्णपणे गिळला. पण, तसा युक्रेनियन लोकांना कोणताही जाच नव्हता. रशियन लोकांप्रमाणेच ते ‌‘स्लाव्ह‌’ वंशाचे, गोऱ्या कातडीचे नि ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी होते. फक्त त्यांची भाषा वेगळी होती. पण, रशियन झार लोकांचे आपल्या साम्राज्यातल्या सगळ्याच लोकांना उत्तेजन असे की, त्यांनी पश्चिम युरोपातल्या पुढारलेल्या देशांत जावे. ऑस्ट्रिया, प्रशिया (नंतर जर्मनी), फ्रान्स, इटली इत्यादी देशांमधून भाषा, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, शिकावे आणि स्वत:बरोबरच साम्राज्यालाही मोठे करावे. म्हणजेच विद्या, विज्ञान, तंत्रज्ञान यांच्या प्रगतीसाठी आवश्यक ते स्वातंत्र्य, मुक्त वातावरण झार राजांनी आपल्या राजेशाही व्यवस्थेतही आपल्या सगळ्याच नागरिकांना दिले होते.

तर अशा या रशियन साम्राज्यातल्या युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्ह या शहरात 1889 साली इगोर सिकोर्‌स्की हा मुलगा जन्मला. त्याचा बाप इव्हान सिकोर्‌स्की हा सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होता आणि त्यानिमित्ताने तो वरचेवर पश्चिम युरोपातल्या नामवंत विद्यापीठांत जात असे. रशियाचे ऑस्ट्रिया आणि फ्रान्सशी जरा जास्त जवळिकीचे संबंध होते. त्यामुळे इव्हान अनेकदा पॅरिसला जात असे. अनेकदा त्याच्या सोबत त्याची स्वतः डॉक्टर असलेली बायको मारिया आणि पाच मुलेदेखील असत.

ही मारिया ‌‘लिओनार्दो-द-विंची‌’ची अभ्यासक होती. लिओनार्दोची चित्रकला आणि त्यापेक्षाही त्याच्या कागदपत्रांमधील अनेक यंत्रांची रेखाटने, याबद्दल ती मुलांशी खूप संवाद करीत असे. त्यातल्या डोक्यावर पंखा लावून उडणाऱ्या विमानाच्या चित्राने (ज्याला आपण आज हेलिकॉप्टर म्हणतो) छोटा इगोर एकदम भारावून गेला. याच काळात ज्यूल्स व्हर्न या फ्रेंच लेखकाच्या विज्ञान कादंबऱ्यांनी लोकांना वेड लावले होते. ज्यूल्स व्हर्नच्या साहित्यातील अनेक चित्रविचित्र यंत्रे प्रत्यक्षात शोधून काढण्यासाठी युरोप-अमेरिकेतले अनेक वैज्ञानिक जीव तोडून प्रयत्न करीत होते. मोटर कार हे स्वयंचलित वाहन निर्माण करण्यासाठी युरोप आणि अमेरिकेत लागलेली स्पर्धा अमेरिकेने जिंकली होती. आता स्पर्धा सुरू झाली विमान बनवण्यासाठी. यातही फ्रेंच आणि जर्मन संशोधक खूप पुढे होते. सन 1878 साली फ्रेंच संशोधक आल्फोन्स पेनाँ याने एक खेळण्यातले उडणारे हेलिकॉप्टर बनवले. ते मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्येही खूप लोकप्रिय झाले. अमेरिकेतला एक बिशप मिल्टन राईट याने ते खेळणे आपल्या विल्बर आणि ऑर्विल या मुलांना दिले. खेळता खेळता ते मोडले. 11 वर्षांच्या विल्बरच्या मनात ठिणगी पडली. त्याने ते खेळणे उघडून दुरुस्त तर केलेच; पण स्वतः तसेच नवीन खेळणे बनवले आणि अखेर याच विल्बर-ऑर्विल राईट बंधूंनी 1903 साली पहिले विमान बनवले. पाठोपाठ 1905-06 साठी जर्मन संशोधक काउंट झेपेलिन यानेही विमान बनवले. गंमत म्हणजे, लिओनार्दो आणि ज्यूल्स व्हर्न यांच्यापासून प्रेेरणा घेतलेल्या इगोर सिकोर्‌‍स्कीने 1901 साली वयाच्या 12व्या वष स्वत:च्या प्रयत्नांनी खेळण्यातले हेलिकॉप्टर बनवले होते. 1908 साली इगोरला कळले की, अमेरिकेत राईट बंधूंनी आणि जर्मनीत फर्डिनांड झेपेलिन यांनी विमानाचा शोध लावलाच आहे; पण विमानांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन करणाऱ्या स्वत:च्या कंपन्या काढल्या आहेत. 19 वर्षांचा इगोर सिकोर्‌स्की झपाट्याने कामाला लागला. 1912 साली 23 वर्षांच्या इगोरने बनवलेल्या विमानाला मॉस्कोच्या औद्योगिक प्रदर्शनात पहिले बक्षीस मिळाले. 1913 साली सेंट पीटर्सबर्गच्या लष्करी प्रदर्शनात त्याने बनवलेल्या विमानाचा नमुना रशियन सेनापतींनी पास केला आणि 1914 साली तो रशियन लष्करासाठी बॉम्बफेकी विमाने बनवू लागला. त्याच साली महायुद्ध सुरू झाले. आपल्या साम्राज्यातल्या एका तरुण इंजिनिअरच्या या कर्तबगारीवर खुद्द सम्राट झार निकोलस दुसरा हा बेहद खूश होता.

पण... 1917 साली रशियात कम्युनिस्ट क्रांती झाली. नव्या साम्यवादी नेत्यांना स्वतंत्र बुद्धिमत्तेचे संशोधक नको होते. आपल्याला गोळी घालण्याचा लेखी आदेश निघाला आहे, हे समजताच इगोर कीव्हमधून पळाला आणि प्रथम पॅरिसला नि 1919 साली न्यूयॉर्कला आला. 1923 साली त्याने न्यूयॉर्क राज्यात रुझवेल्ट या ठिकाणी पहिली विमानोड्डाण कंपनी काढली. तेव्हापासून 1972 साली वयाच्या 83व्या वष मरेपर्यंत अनेक नवनवीन विमाने बनवणे, विमानोड्डाण शास्त्रावर व्याख्याने देणे आणि नवनवीन कंपन्या काढून यशस्वी व्यवसाय करणे, यात तो पूर्णपणे बुडालेला होता. त्याची सर्वात संस्मरणीय उपलब्धी म्हणजे त्याने जगातले पहिले हेलिकॉप्टर बनवले आणि दि. 14 सप्टेंबर 1939 या दिवशी ते उडवून दाखवले. लिओनार्दोच्या चित्रातले हेलिकॉप्टर अशा रीतीने प्रत्यक्षात उतरले. यावेळी दुसरे महायुद्ध सुरू झालेलेच होते. साहजिकच, या नव्या विमानाचा अमेरिकन सैन्याला फार उपयोग झाला.

अमेरिका, विमानोड्डाण क्षेत्राचा पाया घालणारे संशोधक, म्हणून राईट बंधूंना जितका सन्मान देते, तितकाच जन्माने रशियन-युक्रेनियन असलेल्या इगोर सिकोर्‌स्कीलाही देते. स्वत:च्या वैज्ञानिक यशाबद्दल सिकोर्‌स्की म्हणतो, ‌‘मुक्त, स्वतंत्र जगात, मुक्त माणूस काय करू शकतो, याचे उदाहरण म्हणजे मी आहे.‌’





मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.   

संबंधित मजकूर