मुंबई : (TET Exam Paper Leak 2026) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. २८ जून रोजी राज्यभरातील १ हजार २८ केंद्रांवर घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ रद्द करण्यात आली आहे. शनिवारी टीईटीचा पेपर फुटल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून परीक्षा पारदर्शकत होण्यासाठी परीक्षा परिषदेने आता ही परीक्षा पुढे ढकलली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा सुरक्षित व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, शनिवारी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी येथे काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली. या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित व्यक्तींकडे आढळलेल्या काही प्रश्न आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) जून २०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(TET Exam Paper Leak 2026)
या घटनेची गंभीर दखल घेत परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने दि. २८ जून रोजी नियोजित टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आला आहे. टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिषदेकडून कळविण्यात आले आहे.(TET Exam Paper Leak 2026)
"शिक्षकांच्या भावनांशी खेळणाऱ्या, शिक्षकांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या टीईटी पेपर फोडणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आयुक्तांकडे मागणी करणार."
- डॉ. विशाल कडणे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....