श्री शिवराज कृपान|

    27-Jun-2026

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला सार्वभौमत्व प्राप्त करून देणारा ‌‘शिवराज्याभिषेक‌’ हा भारतीय इतिहासातील एक युगप्रवर्तक क्षण. आजच्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या तिथीला साजऱ्या होणाऱ्या ‌‘शिवराज्याभिषेकोत्सव दिन‌’ अर्थात ‌‘हिंदू साम्राज्य दिना‌’निमित्ताने कविराज भूषण यांच्या ‌‘शिवराज भूषण‌’ या काव्यग्रंथातून उलगडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे, धर्मरक्षणाचे आणि त्यांच्या भवानी तलवारीच्या तेजस्वी प्रतिमेचे हे रसगर्भ दर्शन...

हिंदवी साम्राज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा समस्त प्रजेला प्रेरणादायी आहे. हिंदूंचे अधिष्ठान प्राप्त करून देणारा सण म्हणजे ‌‘शिवराज्याभिषेक सोहळा‌’. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीला होणारा राज्याभिषेक हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चौकाचौकांत शिवरायांच्या मूत सजवल्या जातात व मानवंदना दिली जाते. चौकाचौकांत असलेले शिवरायांचे पुतळे, त्याबरोबर त्यांनी उगारलेली भवानी तलवार प्रत्येकास ‌‘वीरश्री‌’ प्रदान करते. त्यांच्या हातातील तलवार आपल्या प्रत्येकाच्या मनात त्यांची छवी परिपूर्ण करते, त्याशिवाय आपण त्यांना पाहूच शकत नाही. अष्टायुधे धारण करणारी महिषासुरमर्दिनी आई भवानी ही त्यांची आद्यदेवता. या देवीच्या नावाने असलेली त्यांची तलवार म्हणजे ‌‘भवानी तलवार‌’. शिवरायांची तलवार ही वीररसात न्हाऊन निघालेली पाहून कविराज भूषण यांनी त्यावर काही ‌‘छंद‌’ रचले आहेत. शिवरायांची भवानी तलवार ही हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांच्या शत्रूवर सदैव उगारलेली, असे गुणगान त्यांनी या ‌‘ब्रजभाषे‌’तील काव्यात मांडले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांवर समकालीन असलेला दस्तऐवज आणि इतिहास साधन म्हणून ओळखला जाणारा काव्यग्रंथ म्हणजे ‌‘शिवराज भूषण‌’. उत्तर प्रदेशातील टिकवापूर अथवा त्रिविक्रमपूर या गावी स्थित असलेल्या एका कवीने हे काव्य रचले, ते कवी म्हणजे कविराज भूषण. हिंदवी स्वराज्याचे सर्वसार्वभौम असे स्वतंत्र सिंहासन स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीतचे गोडवे या काव्यातून व्यक्त होतात. त्यांचे हिंदुत्व, त्याचबरोबर अधर्माचा नाश करून धर्मकारण करण्यासाठी ज्या-ज्या देवी-देवतांनी या पृथ्वी तलावर जन्म घेतला, त्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असे कवी सांगतात.

भारताला तसा ग्रंथसंपदेचा एक मोठा इतिहास लाभलेला. इथे अनेक ग्रंथांची, पुराणांची निर्मिती झाली. सतरावे शतक हे रीती-ग्रंथाचा काल म्हणून ओळखले जाते. याकाळात काव्याचा कल हा ‌‘शृंगाररसा‌’कडे जास्त होता. पण, उत्तरेकडील एकमेव असे कविराज भूषण यांनी ‌‘वीररसा‌’तील काव्यरचनेला सुरुवात केली आणि त्याचे आद्यनायक ठरले, छत्रपती शिवाजी महाराज. सरस्वतीची कठोर तपस्या व उपासना करून कवी म्हणून नावारूपाला आलेले हे कवी. महाराष्ट्रात येऊन त्यांनी किल्ले रायगडावर राज्याभिषेकाअगोदर ‌‘शिवराज भूषण‌’ हा ग्रंथ रचला. कवी भूषण यांनी भारतभर भ्रमंती केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण मांडताना ते या छंदात सांगत आहेत.

मोरँग जाहू कि जाहू कुमाहू
कि श्रीनगरै हि कबित्त बनाए|
बाँधव जाहू कि जाहू आमेर
कि जोधपुरैं कि चितोरहि धाए|
जाहू कुतुब्ब कि एदिल पै
दिल्लीसहू पै किं जाहू बुलाए|
भूषण व्है हौ निहाल मही गाढपाल
सिवहि कि कीत गाए॥


ते सांगताहेत की, मी मोरंग, कुमाऊ, श्रीनगर, बांधवगड, अंबर, जोधपूर, चितोड येथील सर्व राजांवर काव्य केली. तसेच कुतुबशाह, आदिलशाह व दिल्लीपती बादशाह यांच्या निमंत्रणावरून तेथे जाऊनदेखील काव्य केली. मात्र, गडपती शिवाजी महाराज यांच्याकडे येऊन त्यांची कीत गाऊनच मी संतुष्ट झालो.

‌‘शिवराजभूषण‌’ हा 105 अलंकारांनी सजलेला एक काव्यग्रंथ असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक प्रसंगांचा त्यामध्ये समावेश आहे. शिवाजी महाराजांचे शौर्य, धैर्य, अभिमान, दातृत्व, कीत, त्यांचा दरारा, त्यांचे नेतृत्व अशा अनेक गुणांच्या वर्णांनी हा ग्रंथ सजलेला आहे. शिवरायांचे सामर्थ्य व त्यांच्या तलवारीचे गुणगान गाण्यासाठी त्यांनी विशेष अलंकार वापरले आहेत, ते म्हणत आहेत...

सुंदरता गुरुता पराभूता
भनि भूषण होती है आदरजामे|
सज्जनता ओ दयालुता दीनता
कोमलता झळके परजा मै|
दान कृपानहुं को करिबो करिबो
अभै दीनन को बर जामें|
साहिनसो रनटेक विवेक इते गुण
एक सिवा सरजा मै॥


सौंदर्य, गुरुत्व, प्रभुत्व या सर्व गुणांमुळे शिवरायांना सर्वत्र आदर प्राप्त झाला आहे. ते प्रजाहितदक्ष राजा असून, त्यांच्याविषयी सौजन्य, सज्जनता, दयाळूपणा आणि विनम्रपणा या गुणांनी ते संपन्न आहेत. शत्रूंना तलवारीचे दान व दिन लोकांना ते अभयदान देतात. प्राणपणाने लढणे आणि विवेकशील राहणे हे सर्व गुण शिवरायांमध्ये एकवटलेले आहेत. शिवरायांनी हिंदूंचे, येथील धर्मक्षेत्रांचे, तसेच मठ-मंदिरांचे रक्षण केले, त्याबद्दल कविराज मांडतात...

बेद राखे विदित पुरान परसिद्ध राखे राम नाम राख्यो अति रसना सुधर मे|
हिंदून कि चोटी रोटी राखी है सिपाहीन कि काँधे में जनेउ राख्यो माला राखी गरमे|
मिडी राखी मुगल मारोडी राखे पातसाह बैरी पीसी राखे बरदान राख्यो कर मे|
राजन कि हद्द राखी तेगबल सिवराज देव राखे देवल स्वधर्म राख्यो घरमे॥

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‌‘वेदां‌’चे रक्षण केले व प्रसिद्ध असलेल्या ‌‘पुराणां‌’चेदेखील रक्षण केले. तसेच जिभेवर ‌‘रामनामा‌’सारखे सुमधुर नाव जिवंत ठेवले आहे. समस्त हिंदूंच्या शेंडींचे रक्षण केले, शिपायाची रोटी म्हणजेच उपजीविका राखली, सर्वांच्या गळ्यातील जानव्याचे रक्षण केले व माळाही राखल्या. मुघलांचे निर्दालन केले, बादशाहास तुडवले. शत्रूंनं चक्की पिसण्यास लाविले व शरणागतास अभयदान दिले. शिवरायांनी आपल्या तलवारीच्या जोरावर देवतांचे, देवालयांचे, स्वधर्माचे आणि आपल्या राज्याच्या सरहद्दीचे रक्षण केले.

राखी हिन्दुवानी हिंदीवान को तिलक राख्यो अस्मृती पुरान राखे बेद बिधि सुनी मै|
राखी राजपुती राजधानी राखी राजनकि
धरामै धरम राख्यो गुण राख्यो गुनिमै|
भूषन सुकबि जिती हद्द मरहट्टन कि
देसदेस कीत बखानी तव सुनी मै|
साहिके सपूत सिवराज समसेर तेरी दिल्ली
दल दाबी कै दिवाळ राखी दुनी मै॥


शिवरायांनी हिंदूंची वाणी, हिंदूंच्या मस्तकावरील टिळा, ‌‘वेद‌’, ‌‘पुराण‌’ यांचे रक्षण केले. क्षत्रियत्वाचे, राजपुतांच्या राजधानीचे, या पृथ्वीवरील धर्माचे आणि गुणिजनांच्या गुणांचे रक्षण केले. शिवरायांच्या तलवारीच्या बळाने दिल्लीच्या सैन्याला दाबून टाकले व ही तलवार हिंदूंसाठी भिंत बनून त्यांचे रक्षण करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे गुणगान अनेक छंदात आढळून येते, त्यांची तलवार यवनांचा काळ बनलेली आहे आणि हिंदूंचे रक्षण करत आहे, असे कविराज म्हणतात.

पैज प्रतिपाल भूमीभारकौ हमाल चहौ चक्क को अमाल भयौ दंडत जिहानकौ|
साहनकौ साल भयौ ज्वारीकौ जवाल भयौ हरकौ कृपाल भयौ हार के बिधानकौ|
वीररस ख्याल सिवराज भूअपाल तूअ हाथकौ बिसाल भयौ भूषण बखानकौ|
तेरो करवाल भयो दखनकौ ढाल भयौ हिंदूकौ दिवाळ भयौ काल तुरकान कौ॥


छत्रपती शिवाजी महाराजांचे हे ‌‘करवाल‌’ म्हणजेच, त्यांची तलवार ही प्रतिज्ञेचे पालन करणारी व या पृथ्वीचा भार उचलणारी आहे. पृथ्वीची चाके चालवणारी आणि त्यावरील दुष्टांना दंडित करणारी आहे. त्यांचे खङ्ग (तलवार) बादशहाचे चुंबन घेऊन त्याला सोलून काढणारे आहे, जव्हारच्या राजांवरती संकट आणणारे आहे. ही तलवार शत्रूंचे शिर कापून महादेवाच्या गळ्यातील मुंडमाला बनविणारी आहे. तुमचे खङ्ग हे वीररसाने भरलेले व तुमच्या बाहूंचे बळ वाढवणारे आहे. शिवरायांच्या खङ्गाची (तलवार) प्रशंसा करताना कविराज म्हणत आहेत की, हे खङ्ग दक्षिणेची ढाल बनून, हिंदूंसाठी भक्कम भिंत बनून, तुर्कांचा काळ बनलेली आहे.

अचरज मन भूषण बढयो श्री शिवराज खुमान
तव कृपान धुव धूम ते भयौ प्रताप कृसान|


भूषण म्हणत आहेत की, “हे दीर्घायुषी शिवराज, आपल्या तलवारीच्या तेजाने व अटल धुराने प्रतापरूपी अग्नी उत्पन्न झाला, हे पाहून आश्चर्य वाटत आहे. या तलवारीने सर्वत्र प्रताप पसरवलेला आहे. शिवरायांनी तलवारीच्या बळावर अनेक शत्रूंचे पारिपत्य केले.”

सिव सरजा के बैर को यह फल आलमगीर
छुटे तेरे गढ सबै कुटे गए वजीर|

छत्रपती शिवाजी महाराजांशी वैर केले, तर त्याचा परिणाम काय होते हे आलमगीर औरंगजेबला चांगलेच समजले होते. त्याचे सर्व गड शिवरायांनी जिंकून घेतले आणि त्याच्या वजीर सरदारांना परास्त केले, याबद्दल शिवरायांच्या तलवारीचे अलंकारबद्ध वर्णन करताना ‌‘धाकवर्णन अत्युक्ती‌’ हा अलंकार वापरून पुढील ‌‘छंद‌’ कविराज भूषण यांनी लिहिलेला आहे -

कत्ताकी कराकनि चकत्ता को कटक काटी
किन्ही सिवराज वीर अकह कहानीयाँ|
भूषण भनत और मुलुक तिहारी धाक दिल्ली
औ बिलाईत सकल बिललानियाँ॥

चंगेज खानाच्या वंशातील औरंगजेब यांच्या मुघल सेनेला शिवाजी महाराजांनी आपल्या कत्त्याने (तलवारीने) कापून वीरतेचे एक कीर्तिमान स्थापित केले आहे आणि याच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. दिल्लीमध्ये शिवरायांची दहशत निर्माण झालेली आहे आणि येथील मुघल स्त्रिया व्याकूळ झालेले आहेत.

‌‘शिवराज भूषण‌’ या काव्यग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीसाठी विविध अलंकारिक शब्द देऊन संबोधले गेले आहे. जसे- ‌‘कृपान‌’, ‌‘करवाल‌’, ‌‘कत्ता‌’, ‌‘करवार‌’, ‌‘फिरंगे‌’, ‌‘खग्गु‌’, ‌‘तेग.‌’ शिवरायांच्या तलवारीचे ‌‘दोहा‌’ या स्वरूपात वर्णन करताना शिवरायांच्या हातातील ती तलवार नसून, भुजारूपी शेषनागाची नागीन आहे, जी सर्व शत्रूंच्या प्राणरूपी वायूंचे प्राशन करते.

शिवसर्जा के कर लसै सो न हाये करवांन|
भुजबुज केंद्र भुजंगणी बखती पौंन अरीप्रांन॥


शिवरायांचा पराक्रम, साहस, धर्मनिष्ठा, न्यायाचरण, प्रजाहितदक्षता इत्यादी सर्व या अलंकारबद्ध काव्यातून व्यक्त होतात. भूषणाच्या काव्याची वैशिष्ट्ये म्हणजे वीररसनिर्मिती, ठळक इतिहास, अप्रतिम पदलालित्य, रौद्र व भयानक रसाचे प्रभावशाली वर्णन, उदार भाषानीती, उत्तम छंद योजना आणि स्पष्टवक्तेपणा. भारताच्या इतिहासातील मुकुटमणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वीररसातील एक जागरगीतच आहे, जे ऐकल्यावर अंगात वीररस संचारल्याशिवाय राहत नाही.

- पंकज भोसले
9821009137






संबंधित मजकूर