मुंबई : (SARTHI Training For Maratha Youth) "सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत यूपीएससी, एमपीएससी आणि बँकिंग क्षेत्रातील विविध परीक्षांमध्ये तसेच विविध योजनांद्वारे 2,00,000 हून अधिक युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात आले असून 'सारथी'च्या विशेष प्रशिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून 13 हजारांहून अधिक विद्यार्थी रोजगारक्षम बनले आहेत", अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि.२६ जून रोजी पुणे येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्या वतीने आयोजित संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सन्मान केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१५-१६ मध्ये मराठा आरक्षणासाठी राज्यभर शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध मोर्चे काढण्यात आले. त्या आंदोलनाची दखल घेत मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात आला. मात्र, केवळ आरक्षण हा एकमेव उपाय नसून शिक्षण, कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करणे आवश्यक आहे, या विचारातून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली.(SARTHI Training For Maratha Youth)
रोजगारनिर्मितीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन करून व्याजमुक्त कर्ज योजनांच्या माध्यमातून लाखो उद्योजक घडविण्यात आले. स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकासामध्ये मराठा समाजाचा सहभाग वाढावा, या उद्देशाने 2018 मध्ये सारथीची स्थापना करण्यात आली. तसेच 'सारथी' ड्रोन पायलट प्रशिक्षण, भाषा प्रयोगशाळा आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण सुरू करून युवकांना भविष्यातील संधींसाठी सक्षम करण्याचे कार्य करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचविणे हेच राज्य शासनाचे ध्येय असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपण सर्वजण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. छत्रपती शिवराय यांनी कधीही भेदभाव केला नाही आणि राज्य सरकारकडूनही भेदभाव केला जाणार नाही. तसेच स्पर्धा परीक्षा वेळेत, पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना सारथीला नियोजन विभागामार्फत आवश्यक निधी उपलब्ध करून देत मुख्यालय आणि वसतिगृह उभारणीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे, याचीही आठवण ही त्यांनी यावेळी काढली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, "सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचा नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याचा उत्सव आहे.
त्यांनी सारथीच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, "शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि उद्योजकता या सर्व क्षेत्रांत सारथीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे." तसेच, "स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सारथीने घडविलेले अधिकारी हे समाजाच्या आत्मविश्वासाचा आणि परिवर्तनाचा जिवंत पुरावा आहेत," असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, 'सारथी'चे अध्यक्ष अजित निंबाळकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.(SARTHI Training For Maratha Youth)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सारथीच्या मुख्यालयास भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. महेश पाटील यांनी सारथीच्या विविध उपक्रमांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.(SARTHI Training For Maratha Youth)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.