नाटकाने शांत माणसाला अस्वस्थ आणि अस्वस्थ माणसाला शांत करायला हवं - प्राजक्त देशमुख

    27-Jun-2026   
Prajakt Deshmukh Interview
 
महाराष्ट्र शासनाच्या ‌‘सांस्कृतिक कार्य संचालनालया‌’तर्फे आयोजित 36व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेमध्ये मुंबईच्या ‌‘भद्रकाली प्रॉडक्शन्स‌’ संस्थेच्या ‌‘करुणाष्टके‌’ या नाटकाने मानाचे सात पुरस्कार पटकावले. केवळ अभिनयच नव्हे, तर आशयाच्या पातळीवरसुद्धा या नाटकाला लोकांनी पसंती दर्शवली आहे. ‌‘संगीत देवबाभळी‌’सारख्या बहुचर्चित नाटकाचे प्रयोगशील लेखक प्राजक्त देशमुख यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून साकारलेल्या या नाट्यकृतीमुळे, पुन्हा एकदा मराठी नाटकाच्या नावीन्याची चर्चा रंगलेली दिसते. यानिमित्ताने प्राजक्त देशमुख यांच्याशी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’ने साधलेला हा विशेष संवाद...

‘संगीत देवबाभळी‌’च्या अभूतपूर्व यशानंतर आता ‌‘करुणाष्टके‌’ नाटकालासुद्धा रसिकप्रेक्षकांचे अतोनात प्रेम मिळत आहे. तेव्हा नेमकं ‌‘करुणाष्टके‌’चं बीज कुठे सापडलं?
 
मी मूळचा नाशिकचा. त्यामुळे जुन्या नाशिकच्या भागातील वेगवेगळ्या गोष्टींशी माझा परिचय आहे. तिथे एक ‌‘बायकांचा राम‌’ नावाचं मंदिर आहे, जे एका घरामध्ये आहे. तिथे एका विधवा बाईचा चरितार्थ चालावा, म्हणून ते मंदिर बांधण्यात आलं होतं. साधारण 125 वर्षे असं हे जुनं मंदिर. मी काही काळापूव महात्मा फुलेंचे चरित्र वाचत होतो. आपल्याकडे दुर्दैवाने महापुरुषांच्या बाबतीत बरेचदा आपण त्यांना एका विशिष्ट वर्गाशी जोडले आहे. अर्थात, अनेक महापुरुषांच्या बाबतीत हीच शोकांतिका. मात्र, त्यांनी त्या काळात न्हाविकांचा जो संप केला, ती एक महत्त्वाची घटना होती. त्याचे काही पडसाद मग नाशिकसारख्या ठिकाणीसुद्धा उमटले असतील का; कारण त्या काळात नाशिकमध्ये वेगळ्या प्रकारच्या विचारधारा एकत्रित नांदत होत्या. ‌‘करुणाष्टके‌’ या नाटकाचा आत्मा हा आहे की, आपण ज्या वाईट चालीरिती-कुप्रथा मागे सोडून पुढे आलो आहोत, त्यांची एकदा उजळणी झाली पाहिजे. आपण किती अडथळे पार करत आज इथवर आलो आहोत, हे लोकांनी, पुढच्या पिढीने समजून घेतलं पाहिजे. ज्या वेळेला एखाद्या बाईवर अशा पद्धतीची बंधनं येतात, त्यावेळेला त्या बंधनातून त्या स्त्रिया आपापल्या परीने कशा मार्ग काढतात, त्यांचं भावविश्व कसं आहे, हे या माध्यमातून उलगडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
 
मराठी रंगभूमी आणि सिनेक्षेत्रातील अभिनेत्रींचा एक सुरेख संगम ‌‘करुणाष्टके‌’ नाटकात आपल्याला बघायला मिळतो. तेव्हा, लेखक म्हणून आपल्या पात्रांना जे मूर्त रूप या कलाकारांनी दिलं; त्याबद्दल काय सांगाल?
 
सगळ्याच अभिनेत्री अत्यंत प्रगल्भ विचारांच्या व स्वतःची शैली जोपासत काम करणाऱ्या आहेत. गीतांजली कुलकण असतील, किरण खोजे, कल्याणी मुळे या ‌‘एनएसडी‌’च्या पासआऊट आहेत. पर्ण पेठे स्वतः दिग्दर्शिका आहेत. केतकी सराफ आणि प्रतीक्षा खासनीस ‌‘ललित कला केंद्रा‌’च्या आहेत. त्यांच्याकडे त्यांचा म्हणून एक विचार आहे. त्यामुळे तालमीला येताना, त्या स्वतःहून काही सूचना घेऊन यायच्या. वेगळं काही सांगावं लागायचं नाही. त्यामुळे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून हा एक आनंद देणारा अनुभव होता.
 
आंतरमहाविद्यालयीन एकांकिकांपासून ते चित्रपटांच्या संहितेपर्यंत आपण विविध स्तरावर लेखन केले. पण, मग लेखक म्हणून सर्वाधिक जीव कुठे रमतो?
 
100 टक्के माझा जीव नाटकांतच रमतो. अर्थात, सिनेमा हे माध्यमसुद्धा आवडतं. त्याचीसुद्धा काही बलस्थाने आहेत. मात्र, या सगळ्याच्या शिक्षणाची सुरुवात नाटकांमधूनच झाली. मी आजही काही गोष्टींना नाटकाच्या एका चौकटीत ठेवून बघतो. म्हणजे अमूक एका गोष्टीचं नाटक होऊ शकतं का, हा विचार मनात येतो. ज्या पद्धतीचे ‌‘स्टोरी टेलिंग‌’ असतं, त्याची एक वेगळी मजा असते.
 
प्रारंभीच्या काळात ज्यावेळी नाट्यलेखनाला सुरुवात केली, त्यावेळी आपल्यासमोर आदर्श कोण होते?
 
मी मुळातच नाशिकचा असल्यामुळे ज्यावेळेला नाटक बघायला लागलो, त्यावेळेला सचिन शिंदे, दत्ता पाटील यांची नाटकं मी बघितली. मला त्यात गंमत वाटायची. ते सगळं आवडायचं. याव्यतिरिक्त बरेचदा मी असंसुद्धा केलंय की, सकाळी ‌‘पंचवटी एक्सप्रेस‌’ पकडून मुंबईला यायचं आणि ‌‘पृथ्वी थिएटर‌’मध्ये एक नाटक बघायचं. त्यावेळेला हाताशी असलेली पुस्तकं म्हणजे कुसुमाग्रज, कानिटकर यांची नाटकं. त्यांची एक वेगळी गोडी लागली. नंतरच्या काळात मग महाविद्यालयात असताना दत्ता पाटील, सचिन शिंदे यांची नाटक बघून मग प्रेरणा मिळाली. त्यातून ‌‘हंडाभर चांदण्या‌’, ‌‘तो राजहंस एक‌’ अशी नाटकं करू शकलो.
 
आताच्या घडीला रंगभूमीवर अशी कुठली नाटकं आहेत, ज्यांची दखल आपण घ्यायलाच हवी, असं वाटतं?
 
इंग्रजी किंवा हिंदुस्थानी भाषेत आजघडीला मोहित टाकळकर जे काम करत आहे, ते अफलातून आहे. त्याचबरोबर अतुल कुमार यांचेसुद्धा काम सुंदर आहे. मध्यंतरी मी इप्सिता चक्रवत यांचं ‌‘कादंबरी‌’ नावाचं बंगाली नाटक पाहिलं. याव्यतिरिक्त क्षितिज पटवर्धन यांचं ‌‘भूमिका‌’, जे चंद्रकांत कुलकण यांनी दिग्दर्शित केलेलं आहे, तेसुद्धा एक महत्त्वाचं नाटक आहे, असं मला वाटतं. याव्यतिरिक्त सचिन शिंदे, दत्ता पाटील यांचंसुद्धा काम महत्त्वाचं आहे.
 
नाटक हे माध्यम समजून घेण्यासाठी कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत?
 
राजीव नाईक यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं आहेत. मकरंद साठे यांचं ‌‘मराठी रंगभूमीच्या 30 रात्री‌’ हा त्रिखंडात्मक ग्रंथ आहे. रामू रामनाथन यांनी मुंबईच्या रंगभूमीवर लिहिलं आहे. त्याचबरोबर शांताबाई शेळके यांनीसुद्धा केलेलं लिखाणही वाचनीय. त्याचबरोबर मला असं वाटतं की, नाटक ही करून बघण्याची गोष्ट आहे. त्याचबरोबर एका चांगल्या लेखकाचा रियाज म्हणजे वाचन! म्हणजे लेखकाने दहा ओळी लिहिण्याच्या आधी दहा पुस्तकं वाचणे अपेक्षित आहे. एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून जो संस्कार होतो, तोसुद्धा तितकाच महत्त्वाचा. राज्य नाट्य स्पर्धा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. म्हणजे, अमरावती-बीडसारख्या कानाकोपऱ्यांत होणारी नाटके तेथील लोकांनी पाहिली पाहिजेत. त्याने कलावंतांबरोबरच प्रेक्षकसुद्धा तयार होतो. इथे विविध केंद्रांवर दहा-दहा दिवस अविरतपणे नाटक सुरू असतं. ती नाटकं आपण बघितली पाहिजेत.
 
रंगभूमीने समाजाला काय द्यायला हवं? आणि नाटकाने तुम्हाला व्यक्तिश: काय दिलं?
 
कलेच्या बाबतीत एक असं वाक्य म्हटलं जातं की, कलेने अस्वस्थ माणसाला शांत आणि शांत माणसाला अस्वस्थ केले पाहिजे. हेच नाटकाच्या बाबतीतसुद्धा लागू होतं, असं मला वाटतं. जी व्यक्ती शांत आहे, आपल्या एका विशिष्ट बुडबुड्यामध्ये बसली आहे, त्यांना नाटकाने अस्वस्थ केले पाहिजे आणि जी माणसं अस्वस्थ आहेत, जी पीडित आहेत, जे संघर्ष करत आहेत, त्यांना नाटकाने धीर दिला पाहिजे, ती माणसं शांत झाली पाहिजेत, त्यांना आधार वाटला पाहिजे की, या संघर्षामध्ये ते एकटे नाहीत!
 
9967826983




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर