सना मलिक यांच्या सभागृहातील वक्तव्यानंतर राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

तिहेरी तलाकबाबतचे मत वैयक्तिक; पक्ष सहमत नाही

    27-Jun-2026   
NCP Clarifies Stand on Triple Talaq
 
मुंबई :  (NCP Clarifies Stand on Triple Talaq) विधानसभेत तिहेरी तलाकबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आ. सना मलिक यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असून पक्ष त्यांच्या मताशी सहमत नाही, अशी भूमिका पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली.
 
विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान, मंगळवारी विधानसभेत 'तिहेरी तलाक' आणि 'बहुपत्नीत्व' यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर सभागृहात गदारोळ झाला. यावर राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सभागृहात तीव्र पडसाद उमटले. सना मलिक म्हणाल्या की, "बहुपत्नीत्व फक्त मुस्लिमांमध्येच नाही, इतर धर्मांतही आहे. पाकिस्तानने कुराणमध्ये जे सांगितले आहे, त्याचीच अंमलबजावणी केली आहे. भारतामध्येही कुराणची अंमलबजावणी करावी, ही आमची मागणी आहे," असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना आमदार आक्रमक झाले होते. (NCP Clarifies Stand on Triple Talaq)
 
हेही वाचा :  शहीद जवानांच्या वारसांना शेतजमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क माफ
 
त्यानंतर शुक्रवारी सना मलिक यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सना मलिक यांनी मंगळवार २३ जून रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचनेदरम्यान तलाक संदर्भात केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या या मताशी सहमत नाही, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले.
 
तलाक संदर्भात संसदेने संमत केलेला कायदा सर्वोच्च
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच जात, धर्म किंवा पंथ बाजूला ठेवून महिलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ठामपणे भूमिका घेत आलेला आहे. कोणत्याही महिलेवर केवळ एका बाजूने, अन्यायकारक पध्दतीने वैवाहिक नाते संपुष्टात आणण्याची टांगती तलवार असू नये, अशी पक्षाची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला मानणारा, त्याचा आदर करणारा पक्ष आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे.
 
त्यामुळे तिहेरी तलाक संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि संसदेने संमत केलेला कायदा हा सर्वोच्च आहे. त्याचे पालन आपण सर्वांनी केले पाहिजे. आमदार सना मलिक यांना घटनेनुसार बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. ती त्यांची वैयक्तिक भूमिका होती, असेही पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. (NCP Clarifies Stand on Triple Talaq)
 
 
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर