मोहरम मिरवणुकीत विषाचा कट उधळला!; 'उंदीर मारायचे विष' पेन किलर म्हणून वाटले

१४,९०० विषारी कॅप्सूलसह आरोपी जेरबंद, १४,९०० विषारी कॅप्सूल, ३० हजारांचे लक्ष्य!

    27-Jun-2026
 (Mumbai Police Foil Alleged Moharram Sabotage)
 
मुंबई :  (Mumbai Police Foil Alleged Moharram Sabotage) मुंबईतील भायखळा येथे मोहरम मिरवणुकीदरम्यान कथित घातपाताचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी हाणून पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भायखळा परिसरात मोहरमच्या मिरवणुकीत वेदनाशामक (पेन किलर) औषध असल्याचे भासवून प्रत्यक्षात उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी रसायनांनी भरलेल्या कॅप्सूल वाटल्या जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या कारवाईत पुण्यातील फय्याज प्रेमजी या संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहरम मिरवणुकीत हा संशयित चार जणांना कॅप्सूल देताना काही नागरिकांच्या आणि पोलिसांच्या नजरेस पडला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला तो परवानगीशिवाय कॅप्सूल विकत असल्याचे सांगत होता; मात्र पुढील चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
 
पहाटे एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने उलगडला प्रकार
 
या घटनेदरम्यान पहाटे सुमारे चारच्या सुमारास एका व्यक्तीला उलट्या आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तपासाची गती वाढवली. संशयिताकडील कॅप्सूल जप्त करून त्यांची तपासणी करण्यात आली असता त्या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाईड हे उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी रसायन भरल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला. (Mumbai Police Foil Alleged Moharram Sabotage)
 
घरातच तयार केल्या हजारो विषारी कॅप्सूल
 
तपासादरम्यान आरोपीने तब्बल ५० किलो झिंक फॉस्फाईड मागविल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या राहत्या घरी प्रत्येक कॅप्सूलमध्ये सुमारे एक ग्रॅम विषारी पदार्थ भरून त्या तयार करत होता. पोलिसांच्या मते, आरोपीने एकूण ३० हजार कॅप्सूल तयार करण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यापैकी १४,९०० कॅप्सूल तयार झाल्या होत्या.
 
परदेश दौऱ्याचाही तपास
 
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने २०२५ मध्ये इराण आणि इराकचा प्रवास केला होता. या परदेश दौऱ्याचा आणि सद्य प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. त्याच्या मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आर्थिक व्यवहार तसेच संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. (Mumbai Police Foil Alleged Moharram Sabotage)
 
रासायनिक तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत
 
जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूल आणि विषारी पदार्थाचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अंतिम रासायनिक अहवाल आल्यानंतर आरोपीविरुद्ध आणखी गंभीर कलमे लावली जाण्याची शक्यता आहे. पोलिस विविध सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत. (Mumbai Police Foil Alleged Moharram Sabotage)
 
काल रात्री भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहरमची मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीदरम्यान एक संशयित व्यक्ती कॅप्सूल वाटत आणि विकत असल्याचे आढळून आले. संशय आल्याने मुंबई पोलिसांच्या गस्ती पथकाने त्याची चौकशी केली आणि त्याच्या ताब्यातील कॅप्सूलचा साठा जप्त केला. चौकशीदरम्यान त्याने मोहरमच्या मिरवणुकीलाच लक्ष्य केले होते आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना इजा पोहोचवण्याचा त्याचा हेतू होता, अशी कबुली दिली आहे. तसेच त्याने एकूण ३० हजार रिकाम्या कॅप्सूल आणि अत्यंत विषारी पदार्थ असलेल्या ५० किलो झिंक फॉस्फाईडची ऑर्डर दिल्याचे सांगितले.
 
- जयंत मीणा, पोलीस उपायुक्त, मध्य विभाग-१
 
 
 
 




संबंधित मजकूर