मुंबई : (Mumbai Mechanized Dust Mitigation Vehicles) मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि रस्त्यांवरील धुळीचे साम्राज्य संपवण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. मुंबईत रस्ते स्वच्छ करताना धूळ हवेत न उडता थेट शोषून घेतली जावी, यासाठी पालिका प्रशासन ७९.५ कोटी रुपये खर्च करून २९ अत्याधुनिक 'मेकॅनाइज्ड डस्ट-मिटिगेशन' वाहने खरेदी करत आहे. या यंत्रणेमुळे प्रदूषणाची मात्रा लक्षणीयरीत्या कमी होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
या प्रकल्पाचा भाग म्हणून पालिकेने यापूर्वी ७ मशिन्स खरेदी करून एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता. मात्र अनेक सहाय्यक आयुक्तांनी या अत्याधुनिक मशीनचा वापर करण्यास नकार दिला.मात्र झाडलोट करतांना उडणारी धुळ शोषून घेणारी यंत्रे वापरणे गरजेचे असल्याचे काहींची मत आहे त्यामुळेच धुळ न होता रस्ते साफ करण्यासाठी या मशीनला दुसरा पर्याय सध्या तरी उपलब्ध नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटते.
काही सहाय्यक आयुक्तांनी केलेला टाळाटाळ बाजूला सारत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र उर्वरित २९ मशिन्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी या निर्णयाला दुजोरा दिला असून, मुंबईला प्रदूषणमुक्त करायचे असेल तर मेकॅनाइज्ड स्विपिंगशिवाय दुसरा कोणताही प्रभावी पर्याय सध्यातरी पालिकेपुढे उपलब्ध नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वॉर्ड स्तरावरील अडचणींवर मात करून लवकरच या नवीन २९ मशिन्सचा ताफा मुंबईच्या सेवेत दाखल केला जाईल, अशी माहिती डॉ. ढाकणे यांनी दिली.
मुंबईत गेल्या अनेक दशकांपासून सकाळी रस्ते झाडण्याची पारंपरिक पद्धत सुरू आहे. एकाच वेळी संपूर्ण मुंबईत हजारो सफाई कामगारांकडून झाडलोट केली जात असल्याने, रस्त्यावरील सुकी धूळ मोठ्या प्रमाणावर हवेत उडते. सकाळी हवेचा वेग कमी असल्याने ही धूळ वातावरणात खालच्या थरातच तरंगत राहते, ज्यामुळे मुंबईच्या हवेतील प्रदूषणाची मात्रा अचानक वाढते, याकडेही पालिका प्रशासनाने लक्ष वेधले आहे.(Mumbai Mechanized Dust Mitigation Vehicles)
यावर महापालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले की,
"या नवीन मेकॅनाइज्ड मशिन्समध्ये 'व्हॅक्यूम सक्शन' आणि 'वॉटर स्प्रिंकलर' (पाण्याचे फवारे) तंत्रज्ञान असल्याने, रस्ता झाडताना धूळ हवेत उडण्यापूर्वीच ती मशीनमध्ये ओढून घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात ३ महिन्यांत ७ वाहने पालिकेत दाखल झाली असून पुढील ९ महिन्यांत उर्वरित २२ वाहने पालिकेच्या ताफ्यात येतील. या वाहनांमुळे मुंबईतील पारंपरिक आणि प्रदूषणकारी झाडलोटीला चाप बसेल."(Mumbai Mechanized Dust Mitigation Vehicles)