छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा सन्मान ‘युनेस्को’च्या माध्यमातून जागतिक स्तरावर मागच्याच वष करण्यात आला. महाराजांचे दुर्गवैभव हेच शिवविचारांचे खरे संचित. मात्र, एका बाजूला महाराजांचा जयजयकार करणारी माणसं, याच किल्ल्यांवर अत्यंत बेजबाबदारपणे वागत असल्याचे आपल्याला दिसून येते. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे आरडाओरडा न करता, दुर्गसंवर्धनाचे रचनात्मक काम करणाऱ्या अनेक संस्था आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत कार्यरत आहेत. आज ‘हिंदू साम्राज्य दिना’निमित्ताने त्यापैकी अशाच काही निवडक संस्थांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
‘शिवशंभू’ हा एकच ध्यास
‘शिवशंभू’च्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या हेतून ‘शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान’च्या कार्याला सुरुवात झाली. महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास आणि येथील गडकिल्ले ही आपली खरी अस्मिता आहे, याच भावनेतून या प्रतिष्ठानने संघटनावाढीसाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले. या प्रयत्नांना आज मोठे यश आले असून, संपूर्ण महाराष्ट्रात गड-किल्ले संवर्धनाचे एक मोठे जाळे निर्माण करण्यात प्रतिष्ठान यशस्वी झाले आहे. या यशामागील सर्वांत मुख्य कारण म्हणजे, संघटनेतील प्रत्येक गडरक्षकामध्ये असलेले ‘शिवशंभूचे वेड’ आणि आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ऐतिहासिक वास्तू आपल्याकडून जपली जावी, ही अत्यंत पवित्र भावना. यामध्ये प्रामुख्याने गडकिल्ल्यांवरील ऐतिहासिक तोफ-गाड्यांचे संवर्धन करणे, विविध संस्थांच्या संवर्धन मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे आणि तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी ‘दुर्गा माता दौड’चे यशस्वी आयोजन करणे, अशा महत्त्वाच्या कार्यांचा समावेश आहे. केवळ दुर्गसंवर्धनच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानने रक्तदान शिबिरांचे आयोजन, गरजूंसाठी दिवाळी फराळवाटप आणि थंडीच्या दिवसांत वंचितांना कंबलवाटप करून समाजकार्यातही आपले मोलाचे योगदान दिले आहे. पूर्वजांचा हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच सामाजिक सेवा करण्याचा हा संकल्प भविष्यातही असाच अखंड सुरू राहील, असा ठाम विश्वास प्रतिष्ठानच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.
‘दुर्गवीरां’चा शिववारसा
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेले गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे आणि पराक्रमाचे जिवंत साक्षीदार. या ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संरक्षण आणि संगोपन करण्याच्या पवित्र ध्येयाने २००८ मध्ये ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली. गडकोटसंवर्धन, शाश्वत पर्यटन, शिक्षण विकास आणि महिला सक्षमीकरण ही चार मुख्य उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून सुरू झालेल्या या चळवळीने आज एका मोठ्या वटवृक्षाचे रूप धारण केले आहे. संस्थेचे कार्य आज महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांसह कर्नाटक सीमाभागातील बेळगावपर्यंत विस्तारले आहे.
प्रतिष्ठानने २००९ पासून नऊ जिल्ह्यांतील १६ गडकोट आणि अनेक ऐतिहासिक स्मारकांच्या जतन-संवर्धनाचे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे. दुर्गसंवर्धनासाठी ‘कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट’, इतिहास अभ्यासक आणि पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने जतन व दुरुस्तीची शाश्वत कामे केली जातात. केवळ इतिहास जपणे एवढ्यावरच मर्यादित न राहता, प्रतिष्ठानने दुर्गम भागातील सामाजिक विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. शिक्षण विकासांतर्गत अतिदुर्गम भागातील शाळांची दुरुस्ती, शाळांना संगणक, गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. तसेच, महिला सक्षमीकरणाअंतर्गत दुर्गम भागांतील विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण शिबिरे यशस्वीपणे आयोजित केली जातात. संस्थेच्या या उल्लेखनीय कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. प्रतिष्ठानला आजवर ११० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले असून, त्यात ‘गिरीमित्र सन्मान’, राजभवन येथे मिळालेला ‘शिखर सावरकर सन्मान (२०२३)’ आणि २०२४ मध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते मिळालेला विशेष गौरव समाविष्ट आहे. 2025 पासून संस्थेने अधिक पारदर्शकतेसाठी ‘सीएसआर’ प्रकल्प, ‘पे-रोल’वरील संवर्धनकार्य आणि कायदेशीर सल्ला समित्यांच्या माध्यमातून आपल्या रचनेत आधुनिक व शिस्तबद्ध बदल केले आहेत.
दुर्गसंवर्धनाचा वटवृक्ष
स्वराज्याचे गडकिल्ले हे मराठी माणसाची स्फूर्तिस्थाने आहेत; परंतु या ऐतिहासिक ठेव्याबाबत समाज अनेकदा संवेदनशील नसतो. केवळ प्रशासनावर विसंबून न राहता, गडकिल्ल्यांचे रक्षण ही आपली नैतिक जबाबदारी आहे, या जाणिवेतून डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी दि. ९ जून २००८ रोजी ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची स्थापना केली. गडांवर कचरा न टाकणे, प्रबोधन करणे, अशा छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या या चळवळीत आज इतिहासप्रेमी, गृहिणी व युवावर्ग मोठ्या संख्येने जोडले गेले असून हे छोटे रोपटे आता एका मोठ्या वटवृक्षात परिवर्तित झाले आहे.
आज ही संस्था पूर्ण महाराष्ट्रभर ५० पेक्षा अधिक विभागांत कार्यरत असून बेळगावी, बसवकल्याणसह देशाबाहेर मॉरिशस आणि मँचेस्टर येथेही याच्या शाखा विस्तारल्या आहेत. संस्थेकडे तब्बल 28 हजार नोंदणीकृत दुर्गसेवक आहेत. ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ने केवळ स्वच्छता मोहिमा न राबवता, गडांवर शाश्वत आणि ऐतिहासिक कार्य करण्यावर भर दिला आहे. संस्थेच्या नावावर अनेक थक्क करणारे विक्रम नोंदवले गेले आहेत, ज्यात देशातील दोन हजार, ३०२ गडांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून आणि २०१६ मध्ये एकाचवेळी ३००गडांवर स्वराज्य पताका फडकावून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करणे समाविष्ट आहे.
प्रतिष्ठानने आजवर विविध गडांवर दोन हजार, ८०० पेक्षा जास्त मोहिमा राबवल्या आहेत. यामध्ये १५ गडांवर २५ सागवानी प्रवेशद्वार उभारणे, १३ गडांवर ३९ तोफ-गाडे बसवणे, दहा अपरिचित तोफा प्रकाशात आणणे आणि स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच आठ लोखंडी तोफगाड्यांची उभारणी करणे, अशा ऐतिहासिक कामांचा समावेश आहे. यंदा ‘युनेस्को’मध्ये समाविष्ट १२ दुर्गांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन मँचेस्टर येथे भरवण्यात आले. याशिवाय, दर रविवारी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, ‘शौर्या तुला वंदितो’अंतर्गत भारतीय जवानांचा सन्मान, रक्तदान व आरोग्य शिबिरे यांद्वारे संस्था सामाजिक बांधिलकी जपत आहे. या अतुलनीय कार्यासाठी संस्थेला ११० पेक्षा अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.