महामार्गांचे विकासपर्व


जगभरात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात असल्याने, रस्ते बांधकाम आणि देखभाल बाजारपेठेत सातत्याने वृद्धी झालेली दिसते. वाढते शहरीकरण, महामार्गांचे विस्तारीकरण, ‌‘स्मार्ट‌’ वाहतूक व्यवस्थापन आणि शाश्वत पायाभूत सुविधा उभारणीसाठी सरकारांकडून होत असलेली मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक, यामुळे या उद्योगाला नवी गती मिळत आहे. रस्ते बांधकाम क्षेत्राचा अभ्यास केल्यास अहवालातून असे दिसून येते की, 2025 ते 2029 याकालावधीत जागतिक रस्ते बांधकाम आणि देखभाल बाजारपेठेत 230.4 अब्ज अमेरिकी डॉलरची वाढ होण्याचा अंदाज असून, याकालावधीत 4.5 टक्के वार्षिक चक्रवाढ दराने बाजार विस्तारेल.

या वाढीमागे रस्ते, महामार्ग, पूल आणि शहरी वाहतूक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जगभरातील सरकारांकडून सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांचा मोठा वाटा आहे. विशेषतः नवीन रस्त्यांचे बांधकाम हे या बाजारपेठेतील सर्वांत मोठे क्षेत्र ठरले असून, 2023 मध्ये या विभागाचे मूल्य 426.40 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते. महामार्ग बांधकाम विभागानेही सर्वाधिक महसूल मिळवला आहे.

आशिया-पॅसिफिक हा या बाजारपेठेतील सर्वांत मोठा प्रदेश असून, आगामी काळातील एकूण वाढीपैकी 48 टक्के वाढ या प्रदेशातून होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रस्ते बांधकाम क्षेत्रात तांत्रिक क्रांतीही वेगाने होताना दिसते. ‌‘इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम‌’ (ITS), कृत्रिम बुद्धिमत्ता, ट्रॅफिक सिम्युलेशन मॉडेलिंग, बांधकाम नियोजन सॉफ्टवेअर, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि सेन्सर-आधारित निरीक्षण यांचा वापर वाढत आहे. यामुळे वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावी होत असून, बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढत आहे. याशिवाय, जिओपॉलिमर काँक्रीट, सेल्फ-हिलिंग काँक्रीट, उच्च कार्यक्षमतेचे काँक्रीट, ‌‘प्रीकास्ट मॉड्युलर संरचना‌’ आणि ‌‘जिओसिंथेटिक्स‌’ यांसारख्या आधुनिक बांधकाम साहित्याचा वापर वाढत आहे. या साहित्यामुळे रस्त्यांचे आयुष्य वाढते, देखभाल खर्च कमी होतो आणि पर्यावरणावर होणारा परिणामही कमी होतो. पर्यावरणपूरक आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जगभरातील सरकारे आणि खासगी कंपन्या अशा तंत्रज्ञानाला प्राधान्य देत आहेत.

मात्र, या क्षेत्रासमोर काही मोठी आव्हानेही आ वासून उभी आहेत. सिमेंट, स्टील, धातू, लाकूड आणि इतर बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे प्रकल्पांचा खर्च सातत्याने वाढत आहे. तसेच विशेष तांत्रिक सेवा, कामगार खर्च आणि यंत्रसामग्रीच्या देखभालीवरील खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पांच्या खर्चात वाढ होत असून, बांधकाम कंपन्यांवर आर्थिक दबाव निर्माण होत आहे. रस्ते बांधकाम उद्योगात डिजिटल तंत्रज्ञान, स्वयंचलित यंत्रसामग्री आणि ‌‘थ्रीडी प्रिंटिंग‌’ यांचा वापर वाढत असून, उत्पादनक्षमता सुधारण्यावर भर दिला जात आहे. भविष्यात रस्ते प्रकल्पांपैकी मोठा हिस्सा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे बांधकामाचा कालावधी कमी होईल, गुणवत्ता वाढेल आणि दीर्घकालीन देखभाल खर्चातही बचत होईल.

अंतिम वापरकर्त्यांमध्ये सरकारी यंत्रणांचा सर्वाधिक वाटा असून, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेललाही वाढती चालना मिळत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे नवीन महामार्ग, शहरी रस्ते, पूल आणि औद्योगिक कॉरिडॉर विकसित करण्यासाठी सरकारे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत आहेत. या बाजारपेठेत आघाडीच्या कंपन्या धोरणात्मक भागीदारी, विलीनीकरण, नवीन प्रकल्प, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि डिजिटल तंत्रज्ञानावर गुंतवणूक करून जागतिक बाजारातील आपले स्थान अधिक मजबूत करत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, वाढती वाहतूक, शहरीकरण, हवामानबदलाशी सुसंगत पायाभूत सुविधा, ‌‘स्मार्ट‌’ रस्ते व्यवस्थापन आणि आधुनिक बांधकाम साहित्याचा वाढता वापर, यामुळे पुढील काही वर्षांत जागतिक रस्ते बांधकाम आणि देखभाल बाजारपेठ सातत्याने विस्तारत राहील. विशेषतः आशिया-पॅसिफिक प्रदेशातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे या उद्योगाच्या वाढीला सर्वाधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर