मुंबई : (Construction Site Tree Safety) मुंबई महापालिकेने खार येथील झाड पडून एका मुलीचा मृत्यू झाल्याची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे बांधकाम स्थळावरील झाडांच्या सुरक्षिततेची जबाबदारी विकासकाची आणि याबाबतचे धोरण अधिक कडक करण्याची कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
तसेच महापालिकेतर्फे खारमधील झाड कोसळल्याच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये आणि जखमी तरुणीला 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल.
उद्धवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी महापालिका सभागृहात महापालिका अधिनियमच्या कलम 66 ब अन्वये चर्चा घडवून आणली, त्यावर उत्तर देताना महापालिका अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी प्रशासनाची बाजू स्पष्ट केली. या विषयांवरील चर्चेत बहुतांश नगसेवकांनी खासगी जागेवरील झाडांची महापालिकेने पावसाळ्यापूर्वी छाटणी करावी, अशी मागणी केली. (Construction Site Tree Safety)
१० मे रोजी खार पश्चिमेतील लिंकिंग रोडवर बांधकाम स्थळावरील एक मोठे झाड कोसळून रिक्षावर आदळल्याने दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेत १४ वर्षीय आरिका श्रीवास्तव हिचा मृत्यू झाला तर हर्षिता कुमार (२३) जखमी असून तिच्यावर उपकार सुरू आहेत. (Construction Site Tree Safety)
या विषयावर उत्तर देताना लवंगारे म्हणाल्या, संबंधित विकासकाविरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या विकासकाचे बांधकाम थांबवण्यासाठी स्टॉप वर्क नोटिस बजावण्यात आली आहे, वृक्ष प्राधिकरणाची परवानगी त्याने घेतली नसल्याने भविष्यात आशा घटना टाळण्यासाठी बांधकाम स्थळावरील झाडांची जबाबदारी विकसकाची असेल, याबाबतचे धोरण कडक करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (Construction Site Tree Safety)