मुंबई : (Central Railway Converts) मुंबईकरांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत मध्य रेल्वेने सोमवार, २९ जूनपासून मुख्य मार्गावर आणखी १२ उपनगरीय लोकल सेवांचे एसी लोकलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मध्य रेल्वेवरील एकूण एसी लोकल सेवांची संख्या १२० वर पोहोचणार असून, त्यापैकी ९२ सेवा मुख्य मार्गावर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–कल्याण–टिटवाळा) आणि २८ सेवा हार्बर मार्गावर धावणार आहेत.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी शनिवार, दि.२७ रोजी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नव्याने स्वतंत्र एसी लोकल सुरू करण्यात येत नसून, विद्यमान १२ नॉन-एसी लोकल सेवांचे एसी सेवांमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. त्यामुळे एकूण लोकल फेऱ्यांची संख्या कायम राहणार असून प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.
या नवीन एसी सेवांची सुरुवात सोमवार, २९ जूनपासून होणार आहे. दिवसातील पहिली सेवा ठाणे येथून सकाळी ५.३५ वाजता टिटवाळ्याकडे रवाना होईल. तर टिटवाळा येथून सकाळी ६.४६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी एसी लोकल धावेल. याशिवाय घाटकोपर, कुर्ला, ठाणे, कल्याण आणि टिटवाळा मार्गावरील सकाळच्या तसेच संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेतील महत्त्वाच्या फेऱ्यांचे एसी सेवांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.(Central Railway Converts)
डॉ. नीला म्हणाले की, मुंबईकरांनी आतापर्यंत एसी लोकल सेवांना उत्तम प्रतिसाद दिला आहे. प्रवाशांची वाढती मागणी आणि सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन या सेवांमध्ये वाढ करण्यात येत आहे. यापूर्वी उपलब्ध झालेल्या दोन नवीन एसी रेक हार्बर मार्गावर कार्यरत करण्यात आल्या होत्या. आता वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून मुख्य मार्गावर एसी सेवा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Central Railway Converts)
त्यांनी प्रवाशांना आवाहन केले की, एसी लोकलचा प्रवास करताना वैध एसी तिकीट अथवा पास घेऊनच प्रवास करावा. प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वे सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे दररोज लाखो प्रवाशांना गर्दीच्या वेळेत अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असून, मुख्य मार्गावरील एसी लोकल सेवांचे जाळे आणखी मजबूत होणार आहे.(Central Railway Converts)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....