मुंबई : (Ajitsrushti in Chinchwad) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर स्व.अजितदादा पवार यांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक करणारी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच संबंधित जागेवरील एमआयडीसीचे प्लॉटिंग तात्काळ थांबवावे, असे निर्देश महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
विधानभवन येथील उपाध्यक्ष कार्यालयाच्या दालनात आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात चिंचवड येथील आरक्षण क्रमांक ३०१ ही जागा पर्यटन केंद्रासाठी राखीव असून जुन्या तसेच नव्या प्रारूप विकास आराखड्यातही हे आरक्षण कायम आहे. सद्यस्थितीत ही जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आहे.
मात्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) या जागेवर प्लॉटिंग करून ती खाजगी उद्योजकांना विक्री करण्याचे नियोजन केल्याची बाब निदर्शनास आली आहे. विकास आराखड्यातील आरक्षणाला बाधा पोहोचविणारे हे नियोजन रद्द करण्यात यावे, असे निर्देश उपाध्यक्ष बनसोडे यांनी बैठकीत दिले.(Ajitsrushti in Chinchwad)
या परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी वस्ती असून शाहूनगर परिसरात एमआयडीसीने कामगारांसाठी घरे योजना राबवलेली आहे. त्यामुळे पर्यटन केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेचे मूळ स्वरूप कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या जागेवर सुरू असलेले प्लॉटिंगचे काम तातडीने थांबवून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विकास आराखड्यातील पर्यटन केंद्राचे आरक्षण कायम ठेवावे व त्याठिकाणी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत पिंपरी-चिंचवड एमआयडीसीचे मुख्य अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Ajitsrushti in Chinchwad)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.