‘चिंटू’सारख्या सचित्रकथा आणि साने गुरुजींच्या कथा संस्कृतात अनुवादित करून संस्कृत बालसाहित्यात मोलाची भर घालणाऱ्या डॉ. माधवी जोशी यांच्याविषयी...
आपल्या प्रत्येकाच्याच वाचनाची सुरुवात झाली, ते ‘चांदोबा’, ‘चंपक’ आणि ‘किशोर’ वाचत. त्याचे रूपांतर आवडीत झाले, ते ‘गोट्या’, ‘चिंगी’, ‘फास्टर फेणे’, ‘बोक्या सातबंडे’ या साऱ्या बालसवंगड्यांमुळे! आणि यांत 21व्या शतकात आणखी एकाची भर पडली, तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका ‘चिंटू!’
हाच ‘चिंटू’ संस्कृतमध्ये अनुवादित करून लहान मुलांना पहिल्यापासूनच सोप्या संस्कृतची ओळख करून देण्याची कल्पना साकार केली, ती चिपळूणच्या डॉ. माधवी जोशी यांनी.
माधवी जोशी या मूळच्या मुंबईतील गोरेगावच्या. तेथील अभिगोरेगावकर शाळेत त्यांना संस्कृत शिक्षक म्हणून भागवत सर लाभले. त्यांचे स्पष्ट उच्चार, संस्कृतवरची पकड आणि प्रभुत्व पाहून माधवी कमालीच्या प्रभावित झाल्या. शिक्षक चांगले असले की, तो विषय शिकायला मजा येते, तसे माधवी यांना संस्कृत आवडू लागले. सरांच्याच मार्गदर्शनाने त्यांनी काही शालाबाह्य संस्कृत परीक्षांतदेखील उत्तम यश मिळवले.
माधवी यांना पुढे आणखी संस्कृत शिकायचे होते. खरेतर, त्यांनी डॉक्टर व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण, माधवी यांच्या संस्कृत शिकण्याच्या निर्णयाचाही वडिलांनी आदरच केला.
ज्या काळात केवळ ‘ढ’ विद्याथच कला शाखेत प्रवेश घेतात, असा समज रूढ होता; त्या काळात संस्कृतला सन्मान मिळण्याची आशा न केलेलीच बरी! तरीही, माधवी यांनी रुपारेल महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला आणि आपला निश्चय कायम ठेवत, रुईया महाविद्यालयातून संस्कृतमध्ये पदवीदेखील संपादन केली. त्यांना तेथे अलका वाकरे मॅडम आणि कुलकण सरांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी शिकवलेले ‘काव्यशास्त्र’ माधवी यांना एवढे आवडले की, आणखी उत्सुकता निर्माण होऊन त्यांनी त्याच विषयात पदव्युत्तर पदवीदेखील मिळवली.
याच काळात ‘72 तासांत संस्कृत शिका’ ही वर्तमानपत्रातील एक जाहिरात माधवी यांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण करून गेली. एवढ्याशा वेळात भाषा शिकणे जरी शक्य नसले, तरी तेथील ग. वा. करंदीकर सरांचे संस्कृत बोलणे ऐकून, स्वतःही हळूहळू प्रयत्न करून माधवी यांना आपल्या तोडक्या-मोडक्या संस्कृतमध्ये बोलण्याचा आत्मविश्वास लाभला.
लग्नानंतर त्या देवरूखला स्थायिक झाल्या असल्या, तरी कुटुंबीयांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच पुढे ‘पीएचडी’पर्यंत शिक्षण घेत, आपल्या वडिलांचे मुलांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकल्या, असे त्या आवर्जून सांगतात.
या संपूर्ण काळात त्यांना त्यांच्या संस्कृत-अभ्यासक आजोबांच्या शब्दकोशाचा खूप उपयोग झाला. तो केवळ एक कोश नव्हता, तर आजोबांचा वारसा चालवण्याचा एक आशीर्वादरूपी संदेश होता, असे माधवी नम्रपणे सांगतात.
डॉ. माधवी यांनी ‘पीएचडी’नंतरही विद्यादानच करण्याचा मार्ग निवडला. आजही त्या चिपळूणच्या दातार-बेहेरे-जोशी महाविद्यालयात अध्यापन करतात. याच काळात निःस्वार्थ भावाने विद्यादान करणाऱ्या ‘संस्कृतभारती’ या संस्थेशी त्यांचा परिचय झाला. रीतसर प्रशिक्षण घेऊन डॉ. माधवी संस्कृत संभाषण शिकवू लागल्या. त्या म्हणतात, “संभाषणामुळेच भाषा जिवंत राहते. आपण पुस्तकी संस्कृत शिकलो, तरी बोलण्याच्या वेगात शब्द न स्फुरणं आणि ‘लोक काय म्हणतील’ हा न्यूनगंड हे अडथळे पार करून देणारा तराफा म्हणजे संभाषण होय!”
संस्कृतमध्ये काहीतरी लिहिण्याच्या डॉ. माधवी यांच्या लहानपणापासूनच्या इच्छेला ‘संस्कृतभारती’च्या ‘सरस्वती-सेवा-योजने’च्या रूपात व्यासपीठ मिळाले. नवोदित लेखकांची स्वरचित किंवा अनुवादित पुस्तके प्रकाशित करण्याची ती योजना होती. त्यात भाग घ्यायचे डॉ. माधवी यांनी पक्के केले.
तेव्हा ‘काय लिहू’ हा प्रश्न त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींनी अगदी सहज सोडवला. माधवी त्यांच्या मुलींशी संस्कृतमध्ये संवाद साधत असत. त्यामुळे लहान वयातही मुलांना संस्कृत समजू शकते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे बालसाहित्यातीलच काहीतरी अनुवादित करण्याची कल्पना त्यांना सुचली. तेव्हाच त्यांच्या मुलींचे ‘साने गुरुजींच्या गोड गोष्टी’ हे आवडते पुस्तकच त्यांनी अनुवादासाठी निवडले. त्यातल्या काही निवडक गोष्टी घेऊन 2011 साली ‘संस्कृतभारती, दिल्ली’कडून ‘सानेगुरुजीमहोदयस्य मधुराः कथाः’ हे पुस्तक प्रकाशित केले.
परंतु, अशा कथांपेक्षाही चित्रकथा मुलांना अधिक आकर्षित करतील, असे डॉ. माधवी यांना वाटत होते. तेव्हा दररोज वर्तमानपत्रात प्रभाकर वाडेकर लिखित आणि चारुहास पंडित सुरेखित ‘चिंटू’चा एक विनोद प्रकाशित होत असे. त्यांच्या संकलनाचे एक पुस्तकही तयार झाले होते. त्याच ‘खोडकर चिंटू’ पुस्तकाचा अनुवाद करून 2013 साली त्यांनी ‘चपलः चिण्टुः’ प्रसिद्ध केले. फक्त बालच नाही, तर संस्कृतच्या वर्गात बाल असलेल्या ज्येष्ठांसाठीही हे सचित्र विनोद सुगम आहेत.
अनुवाद तपासणारे तज्ज्ञ मार्गदर्शक आणि ‘संस्कृतभारती, गोवा’ची त्यांना यात खूप मदत झाली. मूळ चिंटूकारांची परवानगी घेऊन त्याच सुरेखनांत मराठीऐवजी संस्कृत मजकूर लिहिला गेला आणि हे ‘संस्कृत चिंटू’ साकार झाले.
असेच आणखी संस्कृत बालसाहित्य तयार झाले, तर लहानपणापासूनच मुलांच्या मनात ते रुजवले जाईल आणि असे झाल्यास, संस्कृत ही बोलीभाषा होण्याचा दिवस नक्कीच दूर नाही.
- ओवी लेले
9869345753