मुंबई : (Vijay Wadettiwar Shiv Sena Entry) उबाठा गटात झालेली खासदारांची फूट ताजी असतानाच शुक्रवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या चर्चांनी राजकारण तापले. मंत्री उदय सामंत यांनी वडेट्टीवारांना पक्षात येण्याची ऑफर दिल्याने या चर्चांना उधाण आले.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, "विजय वडेट्टीवार हे एकनाथ शिंदे आणि आमचे सर्वांचे चांगले मित्र आहेत. पक्ष प्रवेशासंदर्भात वडेट्टीवार यांनी आमच्याशी कधीही चर्चा केली नाही. पण विजय वडेट्टीवारांसारख्या विदर्भातील लोकांशी नाळ जुळलेल्या ताकदीच्या नेत्याने एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतल्यास सर्वात जास्त आनंदी व्यक्ती मी असेल. कारण मी वडेट्टीवार यांच्यासोबतही काम केले आहे."
मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता - विजय वडेट्टीवार
यावर आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत विजय वडेट्टीवार म्हणाले की, "मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. शिंदे गटात जाणार का? पक्ष प्रवेश करणार का? कोणाला भेटले का? अशा प्रकारच्या निराधार बातम्या पेरल्या जातात.
काही पत्रकारही कोणताही तथ्य नसताना असे प्रश्न विचारून मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. माझी भूमिका स्पष्ट आहे. मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसच्या विचारांशी माझी बांधिलकी कायम आहे. पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.(Vijay Wadettiwar Shiv Sena Entry)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....