मुंबई : (Mumbai Leprosy Patients Monthly Aid) महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या कुष्ठपीडितांना मिळणाऱ्या मासिक विशेष अनुदानात किमान पाच हजार रुपयांपर्यंत तातडीने वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी 'महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटना'च्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या बैठकीला महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर प्रामुख्याने उपस्थित होते.
शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेत महापौर रितू तावडे यांनी कुष्ठपीडितांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दर्शविला. तसेच, या संदर्भात महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना सविस्तर पत्र पाठवून कुष्ठपीडितांना देण्यात येणाऱ्या अनुदानात पाच हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र तुकाराम चव्हाण यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जून २०१९ पासून महानगरपालिकेकडून कुष्ठपीडितांना दरमहा अडीच हजार रुपयांचे विशेष अनुदान दिले जात आहे. मात्र, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या रकमेवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे.(Mumbai Leprosy Patients Monthly Aid)
पनवेल महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील कमी उत्पन्न असलेल्या कुष्ठपीडितांना प्रतिमहा चार हजार रुपयांचे विशेष अनुदान देत आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कुष्ठपीडितांनाही किमान पाच हजार रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करण्यात यावे, जेणेकरून या कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी मागणी संघटनेने केली आहे.
कुष्ठपीडितांच्या जीवनमानाचा आणि वाढत्या महागाईचा विचार करता ही मागणी न्याय्य असल्याचे सांगत महापौर रितू तावडे यांनी या विषयावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे शिष्टमंडळाला आश्वस्त केले. तसेच, संबंधित प्रशासनाने या मागणीवर तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Mumbai Leprosy Patients Monthly Aid)