पायी चालत जोडली माणसे, उभारला संघपरिवार

    26-Jun-2026
Madan Singh Thakur RSS Contribution
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे व्यक्तीपेक्षा विचारांवर आणि त्यागी कार्यकर्त्यांवर उभे आहे. अशाच निःस्वार्थ, कर्तव्यनिष्ठ आणि संघकार्याला जीवन अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये कै. मदनसिंह बाबूसिंह ठाकूर यांचे नाव जळगाव जिल्ह्यात अत्यंत आदराने घेतले जाते. संघकार्याला आयुष्यभर वाहून घेतलेल्या या संघतपस्वीने आपल्या शांत, संयमी आणि संपर्कप्रधान कार्यपद्धतीने हजारो स्वयंसेवकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले.
 
मदनसिंह ठाकूर यांचा जन्म एप्रिल १९२४ मध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे त्यांच्या आजोळी झाला. बालपणापासूनच त्यांच्यावर कष्ट, शिस्त आणि संस्कारांचे वातावरण होते. वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी वडिलांचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी संसार आणि समाजकार्य यांचा सुंदर समतोल साधला.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा परिचय तरुण वयातच झाला. १९५० च्या सुमारास जळगावचे शहर प्रचारक केशवराव दीक्षित यांच्या संपर्कातून त्यांचे संघकार्य अधिक दृढ झाले. केशवराव दीक्षित यांची मदनसिंह यांच्यासह अनेक तरुणांशी आत्मीय मैत्री होती. जुन्या जळगाव, वाल्मीक नगर, शनि पेठ, बळीराम पेठ आणि नवी पेठ या भागांत संघकार्याचे मजबूत जाळे उभारण्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. नागपूर येथे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेसाठी जाताना केशवराव दीक्षित जळगावात थांबत असत. त्या वेळी जुन्या स्वयंसेवकांच्या भेटीगाठी आयोजित करण्याची जबाबदारी मदनसिंह अत्यंत आत्मीयतेने पार पाडत असत.
 
संघकार्यामध्ये "संपर्क हा शाखेचा आत्मा आहे" या विचारावर मदनसिंह यांची अढळ श्रद्धा होती. त्यामुळे त्यांनी संपर्काला आपल्या कार्यपद्धतीचा केंद्रबिंदू बनवले. विशेष म्हणजे, संपर्कासाठी ते कधीही वाहनाचा वापर करत नसत. रोज सहा ते सात किलोमीटर पायी चालत ते स्वयंसेवकांच्या घरी जात, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आणि संघकार्याची प्रेरणा देत असत. त्यांचा हा नित्यक्रम अनेक वर्षे अखंड सुरू राहिला. त्यांच्या मते, पायी चालत भेट दिल्याने कार्यकर्त्यांशी अधिक आत्मीय संबंध निर्माण होतात आणि विश्वास अधिक दृढ होतो. १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादल्यानंतर संघाच्या अनेक स्वयंसेवकांना मीसा अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्या कठीण काळात अटक झालेल्या स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांची विचारपूस करणे, त्यांना मानसिक आधार देणे आणि आवश्यक ती मदत पोहोचविणे हे अत्यंत संवेदनशील कार्य मदनसिंहांनी निःशब्दपणे केले. संकटाच्या काळातही त्यांनी संघपरिवाराला एकटे पडू दिले नाही.
 
व्यवसायाने ते जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत होते. प्रामाणिकपणा, शिस्त आणि कार्यक्षमता यांमुळे त्यांना सहकारी क्षेत्रातही विशेष मान होता. १९७८ मध्ये जळगाव जनता सहकारी बँकेची स्थापना झाली, तेव्हा तिच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्यांनी बँकेतील नोकरीतून तब्बल तीन वर्षांची विनावेतन रजा घेतली. वैयक्तिक आर्थिक नुकसान पत्करूनही समाजहितासाठी काम करण्याचा त्यांचा हा निर्णय त्यांच्या त्यागी वृत्तीचे ज्वलंत उदाहरण ठरला.
 
संघाच्या जळगाव कार्यालयाची इमारत कालबाह्य झाल्यानंतर नवीन भव्य कार्यालय उभारण्याचा निर्णय जिल्हा बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक कार्याची सुरुवात २६ फेब्रुवारी १९९४ रोजी गुरुपुष्यामृत योग आणि विश्वकर्मा जयंतीच्या शुभमुहूर्तावर झाली. या नवीन इमारतीचे भूमिपूजन मदनसिंह ठाकूर आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या शुभहस्ते संपन्न झाले.
 
मदनसिंह ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या मित्रपरिवाराने आणि कुटुंबीयांनी ११ एप्रिल १९९९ रोजी त्यांचा जाहीर अमृतमहोत्सव साजरा करण्याचे ठरविले. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच त्यांची प्रकृती खालावू लागली. मार्च २००० मध्ये त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच २४ मार्च २००० रोजी त्यांची जीवनयात्रा संपली. त्यांच्या निधनाने जळगावच्या सामाजिक आणि संघपरिवारात मोठी पोकळी निर्माण झाली.
 
त्यांच्या पश्चात तीन मुले आणि तीन मुली असा परिवार आहे. सर्व संतती आपल्या-आपल्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी वडिलांचे संस्कार जपले आहेत. त्यांचे द्वितीय पुत्र चंद्रशेखर ठाकूर हे वडिलांप्रमाणेच कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. कै. मदनसिंह बाबूसिंह ठाकूर यांचे संपूर्ण जीवन हे संघनिष्ठा, त्याग, साधेपणा, शिस्त आणि अखंड संपर्क यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. आज जळगाव जिल्ह्यात संघकार्य ज्या भक्कम पायावर उभे आहे, त्या पायाभरणीत मदनसिंह ठाकूर यांच्यासारख्या निःस्वार्थ आणि तपस्वी कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे.




संबंधित मजकूर