केतन अग्रवाल हत्या प्रकरण :कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी;

उज्वल निकम विशेष सरकारी वकील,जलदगती न्यायालयासाठीही मान्यता

Ketan Agrawal Murder Case
 
मुंबई : (Ketan Agrawal Murder Case) लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणात पीडित कुटुंबीयांनी न्यायासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करत या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी, अशी मागणी केली.
 
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकार या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे स्पष्ट केले. केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कोणतीही कसूर ठेवणार नाही, तसेच दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
 
कुटुंबीयांनी या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, तसेच खटल्याची प्रभावी बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी तत्काळ मान्य करत विधी व न्याय विभागाच्या सचिवांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.(Ketan Agrawal Murder Case)
 
दरम्यान, उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती दिली आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणातील सरकारी बाजू अधिक प्रभावीपणे मांडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(Ketan Agrawal Murder Case)
 
केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पीडित कुटुंबीय यांच्यात झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती आणि जलदगती न्यायालयात खटला चालविण्याच्या निर्णयामुळे न्यायप्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता असून, पीडित कुटुंबीयांच्या न्यायाच्या अपेक्षांना बळ मिळाले आहे.(Ketan Agrawal Murder Case)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर