मूळ धर्मात या, नाहीतर गाव सोडा!

धर्मांतरित झालेल्या २६ कुटुंबांविरोधात गावकऱ्यांनी काढले फरमान

    26-Jun-2026
 
Chhattisgarh Religious Conversion Row
 
मुंबई : (Chhattisgarh Religious Conversion Row) छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात धर्मांतराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या २६ कुटुंबांना गावकऱ्यांनी घराबाहेर काढल्याचा आणि गाव सोडण्याबाबत फरमान जारी केल्याचे सांगण्यात येते आहे. ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या कुटुंबांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी गावकऱ्यांनी त्यांना गाव सोडण्याबाबतचे फरमान सुनावले आणि घरातून बाहेर काढले. त्यामुळे त्यांना झाडाखाली उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मांतर केलेल्या कुटुंबांनी आरोप केला आहे की, गावकऱ्यांमुळे त्यांना स्वतःच्या घरातही प्रवेश करता येत नाही. त्यांनी गाव सोडण्यास नकार दर्शविला असून, गावकऱ्यांनी त्यांना मूळ धर्मात परत येण्याची अट घातल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते, “मूळ धर्मात परत आलात तरच गावात राहण्याची परवानगी मिळेल, अन्यथा गाव सोडावे लागेल,” असा इशारा देण्यात आला आहे.(Chhattisgarh Religious Conversion Row)
 
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप केला असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार भरेंडा गावात घडला असून पोलिसांनी दोन्ही पक्षांशी चर्चा केली असली तरी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसल्याचे सांगितले जात आहे. अशी माहिती आहे की गावकऱ्यांनी धर्मांतरित झालेल्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत मूळ धर्मात परत न आल्यास त्यांना गावाबाहेर हाकलण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.(Chhattisgarh Religious Conversion Row)
 
स्थानिकांच्या माहितीनुसार, गावात धर्मांतराच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. डिसेंबर २०२५ पासून गावातील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती आणि अधूनमधून वादाच्या घटना घडत होत्या. ९ जूननंतर परिस्थिती अधिक बिघडली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करून समझोता घडवून आणला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत पुन्हा तणाव वाढला असून धर्मांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या गावात पोलीस तैनात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.(Chhattisgarh Religious Conversion Row)
 
 




संबंधित मजकूर