लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! सरकार पुन्हा केवायसी सुरू करण्याच्या तयारीत?

    02-Jun-2026   
Total Views |
Ladki Bahin Yojana
 
मुंबई : (Ladki Bahin Yojana) जवळपास १ कोटी ७० लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे निकष पूर्ण करत असून त्यांची केवायसी झाली आहे. त्यामुळे त्यांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळतच राहतील. परंतू, ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आम्ही पैसे देणार नाही पण त्यांना दिलेले पैसे वसुलही करणार नाही. मात्र, ज्या १४ हजार पुरुषांनी पैसे घेतले त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
मंत्रालयात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा त्यासंदर्भात काही निकष होते. त्या निकषांच्या आधारे बहिणींना अर्ज करण्यास सांगितले होते. कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून त्यांनी जे सांगितले ते सत्य मानून त्यांना योजनेचा लाभ देणे सुरू केले. पण कुठलाही सरकारी पैसा खर्च करताना त्याचे सीएजीचे ऑडिट होते.
 
या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की, नाही याची माहिती द्यावी लागते. त्यामुळे योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याची केवायसी सुरू केली आणि वेगवेगळ्या माहितीशी त्याची तुलना सुरू केली. यात आयकर विभाग आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे जिथून पगार होते त्या पोर्टलवरून काही माहिती घेतली. यासोबतच लाभार्थ्यांपैकी चारचाकीची मालकी कुणाकडे याबाबत परिवहन विभागाकडून माहिती घेतली.
 
 
 
तसेच रेशन कार्डच्या डेटा बेसची माहिती घेतली. या सगळ्या प्रक्रियेनंतर पाच लाख लोकांच्या घरी सरकारी नोकरी आहे, १४ हजार पुरुष लाभार्थी आहेत, जवळपास १० लाख लोकांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. अशा वेगवेगळ्या माहितीच्या आधारे अपात्र झालेल्या लोकांना आपण अपात्र घोषित केले आहे.”
 
ते पुढे म्हणाले की, “केवासयी करण्यास सांगण्यात आल्यानंतरही मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. ज्यांना अर्ज करता येतो त्यांना केवायसी करता येत नाही असे मानणे योग्य नाही. त्यामुळे ९ महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते कुठल्यातरी एखादा निकष पार पाडत नसल्याने त्यांनी केवायसी केली नाही.
 
नीट वैज्ञानिक पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आजही कुणी केवायसी करायला तयार असल्यास आम्ही विंडो ओपन करून त्यांना लाभ देण्यास तयार आहोत. देशातील कुठल्याही योजनेपेक्षा महाराष्ट्रातील ही योजना सर्वात मोठी आहे. १ कोटी ७० लाख एवढा लाभ दुसरे कुठलेही राज्य देत नाही.” (Ladki Bahin Yojana)
 
कर्जमाफीची अधिकृत घोषणा निवडणूकीनंतरच
 
शेतकरी कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळाकडे असून मंत्रिमंडळ त्यावर निर्णय घेईल. हा विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, परंतू त्याची घोषणा करता येणार नाही, अशी अट आम्हाला निवडणूक आयोगाने टाकली आहे. त्यामुळे आम्ही आज निर्णय घेऊन त्याप्रमाणे कारवाई सुरु करू आणि निवडणूक संपल्यानंतर त्याबाबतची अधिकृत घोषणा करू.”
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....