गेली अनेक दशके ‘समतोल फाऊंडेशन’ घरातून रेल्वे स्थानकांवर पळून आलेल्या मुलांसाठी काम करते. या मुलांना त्यांच्या पालकांकडे सुखरूप सुपूर्द करते. ज्या मुलांचे पालक नाहीत, त्यांच्या भविष्यासाठीही सुरक्षित योजना आखते. संस्कार-सुरक्षेसोबतच ‘समतोल’ विविध समाजोपयोगी उपक्रमही राबवते. त्यांपैकीच एक म्हणजे ‘गोरक्षा व गोवंश सेवा केंद्र.’ आजचा लेख याच केंद्राची संक्षिप्त माहिती देणारा...
कहां कहां से आते हैं ये लोग?” असा काहीसा कुत्सित संवाद आपण अनेक वेळा लोकलमध्ये ऐकला असेल. एखाद्या भीक मागणार्या किंवा झाडू मारणार्या मुलावर लोक गर्दीमध्ये डाफरतात. रेल्वे स्थानकांवर भंगार गोळा करणारी, रस्त्यावर सिग्नलला भीक मागणारी, छोट्या-छोट्या वस्तूंची विक्री करणारी अनेक मुले आणि मोठी माणसेसुद्धा दिसतात. अशा लोकांना बघून ‘कोण आहेत हे लोक?’, ‘कुठून आले आहेत?’ असे प्रश्न कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात उपस्थित होणे साहजिकच. पण, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘समतोल फाऊंडेशन’ने २० वर्षे अगोदरच शोधली! त्या मुलांची माहिती घेऊन त्यांचे मनपरिवर्तनसुद्धा ‘समतोल’ने घडवून आणले. ‘समतोल’ने आतापर्यंत एक लाखांहून जास्त मुलांना या दुष्टचक्रातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.
खरं तर, या मुलांच्या चांगल्या सवयींकडे समाज आणि यंत्रणा दुर्लक्ष करतात आणि त्यांच्या वाईट गोष्टींकडे जास्त प्रमाणात लक्ष दिले जाते. पण, मुले ही शेवटी मुलेच असतात. ती जन्मतःच गुन्हेगार नसतात. त्यांना सुधारण्याची संधी दिल्यास, तीही तुमच्या-आमच्यासारखी सभ्य नागरिकाप्रमाणे वर्तन जरुर करू शकतात. ही मुले शिकूही शकतात आणि हे सर्व शयदेखील आहे. कारण, आम्ही सातत्याने या प्रश्नावर अतिशय सक्रियपणे काम करीत आहोत. अशी ही मुले स्वभावतःच चिडचिडी असतात. पण, घराबाहेर राहिल्यामुळे त्यांच्या वर्तणुकीत हा फरक दिसून येतो. पण, यांपैकी बरीचशी मुले तितकीच मेहनतीही असतात. त्यांना अनेक कला-कौशल्ये अंगीकृत असतात. ही मुले काटक असली, तरी घाबरट नसतात. त्यांची बौद्धिक क्षमताही खूप जास्त असते. शारीरिकदृष्ट्या कमजोर दिसत असली, तरी मानसिकदृष्ट्या तितकीच खमकी असतात. खरं सांगायचं तर, त्यांच्यातील जिद्द आणि बिनधास्त वृत्तीमुळे ते बाहेरच्या जगातही अगदी तग धरू शकतात. आता ही मुले ज्या वातावरणात वावरतात, त्यामुळे साहजिकच ती तशीच घडत असतात. मुख्यत्वे या मुलांचा वयोगट १२ ते १८ वर्षांच्या आसपास. याच मुलांच्या सकारात्मक ऊर्जेचा उपयोग ‘समतोल फाऊंडेशन’ करते आणि त्यातूनच उभी राहिली आहे ‘समतोल गोशाळा!’
गोरक्षा व गोवंश सेवा केंद्र
गेले १०० महिने, म्हणजे आठ वर्षे, चार महिन्यांपासून ही गोशाळा सुरू आहे. २०१८ साली म्हणजे ‘कोविड’ सुरू होण्यापूर्वी ‘समतोल’च्या ‘स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रा’त सहजपणे एक गोमाता आश्रयाला आली. कदाचित तिला काळजी व संरक्षण या ठिकाणी मिळेल, असे वाटले असावे. बराच शोध घेतला, तरी त्या गोमातेचा कोणीही मालक नेण्यासाठी आला नाही. देवाच्या इच्छेनुसार ‘समतोल’ने या गोमातेला चारा-पाणी दिले. नंतर लक्षात आले की, गाय गाभण आहे. मग काय, याचदरम्यान अनेक मुलांना या गायीचा लळा लागला; प्रेम जडले. मुले गायीची क्षणाक्षणाला काळजी घेऊ लागली. याचदरम्यान त्या गायीच्या पोटी गोंडस वासरूसुद्धा जन्मले. ‘कोविड’च्या काळात तर मुले या गाय-वासराची जरा जास्तच काळजी घेत होती.
‘समतोल फाऊंडेशन’ हरवलेल्या मुलांना कुटुंबात जोडण्याचे व पुनर्वसनाचे कार्य करते. पण, ‘कोविड’दरम्यान मुलांना घरी सोडता आले नाही. दोन वर्षे ही मुले अडकून होती. यामध्ये आजूबाजूला असणार्या अनेक नागरिकांना ‘समतोल’मध्ये सांभाळल्या जाणार्या गायीबद्दलही कळले आणि ज्या शेतकर्यांना गायी नको होत्या, त्यांनी त्या ‘समतोल’मध्ये आणून सुपूर्द करायला सुरुवात केली. मग काय, बघता बघता २०-२५ गोमातांनी हे गोकुळ फुलून गेले.
‘समतोल फाऊंडेशन’ ‘स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र, मामणोली, कल्याण’मध्ये अगदी निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे. बाजूलाच जंगल अन् प्रवाही नदी. त्यामुळे या परिसरात गायी चरायला जाऊ लागल्या. मुले आनंदाने गायी चारत होती. दुधासोबतच मुलांना लोणी, तूप, खवा, मिठाईचा आस्वादही घेता येऊ लागला. हे सगळे बघून गावातील तरुण यतेश कोर यांनी स्वमालकीची जमीन भाड्याने लीजवर देण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे देणगीदार एस. हरिहरन् यांनी १२ लाख रुपये खर्च करून गोशाळाही बांधून दिली. संस्थेचे अध्यक्ष आणि ठाण्याचे आमदार संजय केळकर हे तर गोरक्षकच आहेत. त्यांच्या संपर्कातील अनेक शेतकर्यांनी गोमाता दान केल्या आणि १००च्या आसपास गोमातांची सेवा ‘समतोल’मध्ये सुरू झाली.
काही अनुभव नसताना आणि मनात काही नियोजन नसतानासुद्धा केवळ चांगली नीतिमत्ता असल्याने गोशाळा सुरू झाली. मात्र, या सगळ्या गोष्टी काही लोकांना बघवत नव्हत्या; म्हणून ते विरोधातसुद्धा गेले. अनेकांनी बाल गोसेवकांना धमकावले, मारलेसुद्धा. काहींनी तर गायी चोरण्याचा आणि गोहत्येचाही प्रयत्न केला. पण, ‘समतोल’ या सगळ्या संकटातून मार्ग काढत आजही गोशाळा चालवत आहे.
गोशाळा चालवताना सर्वांत महत्त्वाची अडचण म्हणजे, गोसेवकांची अपुरी संख्या. अनेक गोशाळांमध्ये गायी आहेत, पण त्यांना सांभाळणार कोण, असा प्रश्न पडतो. शेण, गोमूत्राची साफसफाई, औषधोपचार अशा अनेक गोष्टी आहेत. विशेष म्हणजे, गायीला वासरू होताना आणि त्यानंतरही काळजी घ्यावी लागते. त्यासाठी गोसेवक फार महत्त्वाचे. देशी गायी कल्पतरूप्रमाणेच असतात. जिवंत असताना आणि मृत्यूनंतरही गोमाता तेवढ्याच उपयोगी असतात, हे समजून घेणे आवश्यक व गरजेचे आहे. याचा विचार आणि अभ्यास करण्याचे प्रशिक्षण ‘समतोल फाऊंडेशन’च्या गोशाळेतील मुलांना दिले जाते. त्यामुळे बाल गोसेवक प्रत्यक्ष कृतीमधून तयार होत आहेत. ‘गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य’ यांच्या साहाय्याने अनेक गोष्टी सुकर होत आहेत. ‘समस्त महाजन’ यांच्या सहकार्याने आर्थिक मदत मिळते. त्यामुळे चारा-पाणी मिळते. पण, यामध्ये महिला व बाल विकास विभाग यांचे सहकार्य लाभले, तर बालगृहातील अनेक मुलांचे भवितव्य ‘गोसेवक’ म्हणून उदयास येऊ शकते.
‘समतोल फाऊंडेशन’ची ओळख खरं तर अशा घर सोडलेल्या मुलांच्या विकासासाठी आहे. आता तर भेटायला येणारे अनेक बालप्रेमी ‘समतोल’ची ‘रस्त्यावरील मुलांची गोशाळा’ अशीही नवीन ओळख करून देतात. संपूर्ण महाराष्ट्रात बालगृहातील रस्त्यावर, रेल्वे स्थानकांत राहणार्या मुलांना घेऊन गोसेवक म्हणून कार्य सुरू होऊ शकते; याचे प्रशिक्षणवर्ग सुरू होऊ शकतात. याबाबत संपूर्ण तयारी ‘समतोल फाऊंडेशन’मध्ये आहे. शासन प्रशासन विभाग आणि यंत्रणा यांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
विजय जाधव
९८९२९६११२४