‘विश्व हिंदू परिषदे’अंतर्गत ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’च्या कार्यकर्त्यांसाठी दि. ५ ते ७ जूनदरम्यान ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, केशवसृष्टी’ येथे त्रिदिवसीय कार्यकर्ता अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. हे प्रशिक्षण शिबीर न ठरता, जणू एक कार्यकर्तृत्व, संघटननिष्ठा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा प्रेरणादायी संस्कारयज्ञच ठरला. या अभ्यासवर्गाचा मागोवा घेणारा हा लेख...
विश्व हिंदू परिषदे’अंतर्गत ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’च्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेला त्रिदिवसीय कार्यकर्ता अभ्यासवर्ग म्हणजे कार्यकर्तृत्व आणि संस्काराचा वारसा जपणारा अभ्यासवर्ग होता. या अभ्यासवर्गात राज्याच्या विविध भागांतून आलेल्या १५० कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शुक्रवारी सकाळी देशभक्तीपर गीताच्या मंगल स्वरांनी आणि अतिथी परिचयानंतर अभ्यासवर्गास प्रारंभ झाला. उद्घाटन सत्रात माननीय गोविंद शेंडे यांनी ‘विश्व हिंदू परिषदे’ची स्थापना, उद्दिष्टे, इतिहास आणि हिंदू समाजासमोरील विविध आव्हानांचा सखोल ऊहापोह केला. हिंदू समाजाच्या संघटनासाठी उभारलेल्या विविध चळवळी, धर्मांतर व गोहत्येविरोधातील प्रयत्न, तसेच रामजन्मभूमी आंदोलनाचा इतिहास यांचे त्यांनी प्रभावी विवेचन केले. अनेक हिंदूंच्या त्याग, बलिदान आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळे साकारलेल्या राममंदिराचा उल्लेख करत, त्यांनी रामाचा वनवास संपला आहे, या भावनेने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
यानंतर कार्यकर्त्यांची ‘कमळगड’, ‘गोपाळगड’, ‘कोराईगड’, ‘प्रचितगड’ आणि ‘सुधागड’ अशा गटांमध्ये विभागणी करण्यात आली. प्रत्येक गटात ३० कार्यकर्ते आणि तीन चर्चा-प्रवर्तक होते. ‘कार्यकर्ता कसा असावा’ या विषयावर झालेल्या चिंतनपर चर्चेत कार्यकर्त्याचे व्यक्तिमत्त्व, संघटननिष्ठा, सातत्य, समर्पणभाव, संवादकौशल्य आणि शिस्तबद्ध आचरण यांवर सखोल चर्चा झाली. कार्यकर्ता हा केवळ विचार मांडणारा नसून ते स्वतःच्या जीवनातून जगणारा असावा, यावर सर्वांचे एकमत झाले. स्थानिक परिस्थितीची जाण, चूक मान्य करण्याची तयारी, अहंकाराचा त्याग आणि स्वार्थापलीकडे जाऊन कार्य करण्याची वृत्ती हे गुण कार्यकर्त्यांमध्ये असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सुधा मूर्ती यांच्या कार्यपद्धतीचा दाखला देत, ज्या समाजघटकात आपण कार्य करणार आहोत, त्यानुसार आपली केशभूषा, वेशभूषा आणि वर्तन समर्पक असावे, हा महत्त्वपूर्ण विचारही चर्चेतून पुढे आला. ‘बैठक कशी घ्यावी’ या विषयावरील कृती सत्राने अभ्यासवर्गाला विशेष व्यावहारिक परिमाण दिले. प्रत्येक गटाने प्रत्यक्ष बैठक आयोजित करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. बैठकीपूर्वीची तयारी, विषयाची समज, उद्दिष्टांची स्पष्टता, पुढील कामांचे नियोजन, नोंदी ठेवण्याची पद्धत आणि कार्यकर्त्यांशी संवाद यांसारख्या बाबींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या कृती सत्रामुळे संघटनात्मक कार्य अधिक परिणामकारक करण्याचे अनेक बारकावे सहभागी कार्यकर्त्यांना शिकता आले.
सत्संग हा संघटनेचा आधार आहे. कार्यकर्ता म्हणून संस्कारित होण्यासाठी सत्संग आवश्यक आहे, या भूमिकेतून ‘सत्संग कसा घ्यावा’ या विषयावर सुभाष लाडे यांनी अत्यंत प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले. ढोल, मंजिरी, टाळ आणि झांजांच्या निनादात भजन-कीर्तनाचे वातावरण रंगून गेले. अनेक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने परिसर भक्तिरसाने भारून गेला. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांवरील चिंतनिकेचे वाचन करण्यात आले आणि उपस्थितांमध्ये राष्ट्राभिमानाची प्रेरणा जागृत झाली.
अभ्यासवर्गाच्या दुसर्या दिवशीच्या पहिल्या सत्रात कॅप्टन अतुल इंदुरकर यांनी इस्लाम, ख्रिस्ती धर्म आणि हिंदुत्व यांची तुलनात्मक मांडणी अत्यंत प्रभावीपणे केली. ते आपल्या भाषणात म्हणाले, "बुद्धीमध्ये अहंकार असतो; परंतु सद्बुद्धीमध्ये विवेक जोडला जातो. धर्माचे कार्य करताना हा विवेक जागृत ठेवण्याची गरज आहे. शस्त्र आणि शास्त्र ही आजच्या काळाची गरज आहे.” त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून हिंदू धर्मरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
कोणत्याही सामाजिक कार्याला धनशक्तीची आवश्यकता असते, याची जाणीव ठेवून दुसर्या दिवशीच्या चर्चा सत्रात प्रतिष्ठानचे विश्वस्त मोहन सालेकर यांनी कार्यकर्त्यांना निधी संकलनाबाबत मार्गदर्शन केले. मासिक दान योजना, विशेष उत्सवांच्या काळात दान स्वीकारणे, मोठ्या उद्योजकांकडून सामाजिक दायित्व निधी प्राप्त करणे, तसेच व्यक्ती-व्यक्तीकडून धनसंग्रह करणे अशा विविध पद्धतींच्या मौलिक सूचना या चर्चासत्रात मांडण्यात आल्या.
संस्कृती आणि संस्कारांचे संवर्धन करण्याच्या हेतूने प्रतिष्ठान कार्यरत आहे. शालेय विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी रामायण, महाभारत आणि क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित कथापुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. त्या कथा शाळा-शाळांमध्ये जाऊन सांगण्यासाठी कार्यकर्ते तयार व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कार्यकर्त्यांना गोष्टी प्रभावीपणे सांगता याव्यात, म्हणून कथाकथन हा विषय कृती सत्रात घेण्यात आला. विविध गट करून त्यांना वेगवेगळे विषय देण्यात आले आणि स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ‘कमळगड’चे वसंत सोहोनी, ‘प्रचितगड’च्या कोमल संसारे, ‘कोराईगड’च्या डोंबिवली समूहाला आणि ‘गोपाळगड’च्या पिंपरी-चिंचवड समूहाला बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
सामाजिक कार्य सातत्याने पुढे न्यायचे असेल, तर नवीन व्यक्तींना संघटनेशी जोडणे आवश्यक असते. हे सूत्र लक्षात घेऊन ‘संपर्क कसा करावा’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. त्यामध्ये व्यक्तिगत संपर्क, विविध सामाजिक गटांना भेटी देणे आणि एकत्रित उपक्रमांची आखणी यांवर भर देण्यात आला. संवाद ही कार्यवृद्धीची आणि संपर्काची संजीवनी आहे, हे अधोरेखित करत महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यालयांचे संचालक, उद्योजक, गृहिणी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी नियोजनपूर्वक संपर्क साधण्याचे ठरले.
तिसर्या दिवशीच्या प्रथम सत्रात ‘कॉर्पोरेट कीर्तनकार’ म्हणून विख्यात असलेले समीर लिमये यांचे ‘अधिष्ठान’ या विषयावरील अत्यंत प्रेरणादायी विवेचन ऐकण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळाली. ते आपल्या भाषणात म्हणाले, दासबोधाच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामी यांनी सामाजिक कार्यकर्त्यांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे. कार्यकर्त्याने काम करत असताना आपण हे कार्य कशासाठी करतो, याचा विसर पडता कामा नये. त्यासाठी त्याने आपले अधिष्ठान वारंवार तपासण्याची गरज आहे. आपल्या कार्याला उपासनेची जोड दिली, तर ईश्वरशक्ती त्या कार्यावर कृपा करते.
त्यानंतरच्या कामकाजी सत्रात प्रतिष्ठानचे विश्वस्त मोहन सालेकर यांनी संघटनेची भौगोलिक रचना, वर्षभरातील अनिवार्य कार्यक्रम आणि निधी संकलनाचे महत्त्व याविषयी अत्यंत उद्बोधक विवेचन केले. समारोपाच्या सत्रात मानसी शिंदे यांनी आनंद केंद्रासाठी उपयुक्त असे विविध अभिनव खेळ, गीते आणि उपक्रम सादर केले. स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय आणि ऊर्जस्वल झाले. या त्रिदिवसीय अभ्यासवर्गातून कार्यकर्त्यांना संघटनात्मक कौशल्य, वैचारिक स्पष्टता, सांस्कृतिक बांधिलकी आणि समाजकार्यासाठी आवश्यक प्रेरणा प्राप्त झाली. ‘केशवसृष्टी’तील हा अभ्यासवर्ग कार्यकर्तृत्वाच्या जडणघडणीसाठी आणि हिंदू समाजाच्या संघटनबळाला नवी दिशा देणारा ठरल्याची भावना सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
मोहन सालेकर
(लेखक विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांताचे प्रांत मंत्री आहेत.)