उत्तर प्रदेशमध्ये विकासगंगेचा प्रवाह; ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटीसाठी ‘प्रोजेक्ट गंगा’चा शुभारंभ
10-Jun-2026
Total Views |
लखनऊ : (Project Ganga) उत्तर प्रदेशमधील डिजिटलायझेशनला गती देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने ‘प्रोजेक्ट गंगा’ हाती घेण्यात आला असून, या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील ग्रामीण भागामध्ये वेगवान इंटरनेट पोहोचविले जाणार आहे. तसेच, इंटरनेटबरोबरच डिजिटल शिक्षण, टेलिमेडिसिन, ई-गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञान आधारित रोजगाराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशात सरकारकडून जाईल.
या प्रकल्पांतर्गत उत्तर प्रदेशातील गावांना वेगवान इंटरनेट सुविधा पुरवण्यात येणार असून, पुढील दोन ते तीन वर्षांत 20 लाखांहून अधिक ग्रामीण आणि निमशहरी घरांना ब्रॉडबॅण्ड सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट या योजनेंतर्गत ठेवण्यात आले आहे. यामध्ये डिजिटल सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून 8 हजार डिजिटल उद्योजकांना प्रोत्साहन दिले जाणार असून, यामध्ये 50 टक्के महिलांना संधी दिली जाणार आहे.
या प्रकल्पाच्या उद्धाटनावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ’प्रोजेक्ट गंगा’ या डिजिटल परिवर्तनासाठी एक माध्यम म्हणून काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, त्यांच्या सरकारने 2026-27 च्या अर्थसंकल्पात आठ हजार ते दहा हजार डिजिटल उद्योजक निर्माण करण्याची योजना आखली असून, त्यामध्ये 50 टक्के महिलांचा समावेश अपेक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले.(Project Ganga)
‘प्रोजेक्ट गंगा’च्या पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 21 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून, लवकरच या प्रकल्पाचा विस्तार 75 जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे. या सुविधेनंतर अनेक ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड उपलब्ध होणार असून, यामुळे गावांचे रुपांतरण ‘स्मार्ट’ गावांमध्ये होण्यास मदत होणार आहे. ‘प्रोजेक्ट गंगा’च्या माध्यमातून ग्रामस्थांना त्यांची उत्पादने ऑनलाईन विकण्यासाठीही एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकार हा प्रकल्प वनओटीटी एंटरटेनमेंट लिमिटेड च्या सहकार्याने राबवत आहे. या योजनेअंतर्गत पुरवण्यात येणार्या सेवेला ’गंगा फायबर’ असे नावही देण्यात आले आहे.
‘प्रोजेक्ट गंगा’चे लाभ
- पूर्ण उत्तर प्रदेशात एक लाखांच्या वर प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती
- सीएम-युवा योजनेअंतर्गत भागीदारांना प्रशिक्षणआणि आर्थिक मदत
- स्थानिक भागांमध्ये इंटरनेट सेवा देणार्यांचे जाळे
- राज्यातील शेवटच्या गावापर्यंत इंटरनेट पोहचल्याने, विकासाचा वेग वाढणार (Project Ganga)