मुंबई : (Maharashtra Infrastructure Projects) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून विक्रम प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पत्र लिहून अभिनंदन केले आहे. तसेच गेल्या १२ वर्षांत महाराष्ट्राच्या विकासासाठी मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात म्हणाले की, "विकास, विश्वास आणि जनसहभागाचे १२ वर्ष पूर्ण झाले. भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ निर्वाचित पंतप्रधान म्हणून विक्रम प्रस्थापित केला, याचा अपार आनंद आज आम्हा कार्यकर्त्यांच्या मनात आहे. गेल्या १२ वर्षांत आपल्या राष्ट्राने एक मोठी झेप घेतली आणि त्यातून 'समर्थ भारत' ते 'विकसित भारत' असा एक दृढ आत्मविश्वासाचा संकल्प निर्माण झाला.
२५ कोटी देशवासियांना गरिबी रेषेतून बाहेर काढण्यापासून ते संरक्षण सामुग्री निर्यात करणारे राष्ट्र हा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. म्हणूनच मी आपले सातत्याने 'भारताचे वैश्विक नेतृत्त्व' असेच वर्णन करतो. या १२ वर्षांच्या आपल्या या प्रवासाचे साक्षीदार, सहभागी आम्हाला होता आले, याचा आनंद अपार आहे. राष्ट्राची प्रगती ही सर्वोच्चच असते. पण, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मला संधी दिलीत, त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या या महान भूमीची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले."
एल-निनोच्या संकटाला महाराष्ट्र समर्थपणे तोंड देईल
ते पुढे म्हणाले की, "आज वातावरण बदलाच्या समस्यांना आपण तोंड देत आहोत. एल-निनोचे संकट घोंगावते आहे. मान्सून हवा तसा आलेला नाही. पण, महाराष्ट्र म्हणून आम्ही या समस्येला समर्थपणे तोंड देण्याचा प्रयत्न करु. सिंचनाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण जो पाठिंबा दिला, तो कधीही विसरता येणार नाही. २०१५ मध्ये महाराष्ट्राच्या तीव्र दुष्काळी भागांसाठी एका विशेष पॅकेजची मागणी मी आपल्याकडे केली होती. आपण लागलीच त्याला मंजुरी दिली आणि त्यातून १०० हून अधिक प्रकल्प आम्ही पूर्ण केले. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतक-यांच्या समस्यांची आपल्याला जाणीव होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे ११ किल्ले युनेस्को यादीत समाविष्ट करणे असो, मराठी भाषेचा अभिजात दर्जा असो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील स्मारक असो, युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचे अनावरण असो, इंदूमिल स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय असो, प्रत्येक बाबतीत आपण पुढाकार घेत निर्णय केले. विकास आणि विरासत या धोरणाला अत्यंत सुसंगत अशी ही अनुभूती."
"नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो-३, नागपूर आणि पुण्याची मेट्रो, समृद्धी महामार्ग, अटलसेतू, कोस्टल रोड, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक असे कितीतरी प्रकल्प आपण जनतेच्या सेवेत रुजू करु शकलो, त्यामागे आपला भक्कम पाठिंबाच कारणीभूत आहे. यातील कित्येक प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते. पण, आपण एकाही प्रकल्पाची परवानगी थांबू दिली नाही. पुढचे ५० वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देईल आणि १० लाखांवर रोजगारनिर्मिती करेल, असे वाढवण बंदर हा पुढचा आयकॉनिक प्रकल्प केवळ आपल्या भक्कम पाठिंब्यामुळे पुढे जातो आहे."
"अमरावतीला आम्ही टेक्सटाईल पार्क सुरु केला, तर आपण त्याला मेगा टेक्सटाईल पार्कमध्ये समाविष्ट केले. छत्रपती संभाजीनगरची डीएमआयसी, ऑरिक सिटी, दिघी पोर्ट किंवा आता गडचिरोलीचा देशाचे ग्रीन स्टील हब म्हणून प्रवास यामागे सुद्धा आपण भक्कमपणे उभे राहिलात. माओवाद मुक्तीनंतर विकास काय असतो, याचे देशाचे मॉडेल म्हणून गडचिरोली उभे राहील, हा आमचा संकल्प आहे आणि त्यात प्रत्येक टप्प्यावर आपली साथ आहे.
एम्स, आयआयएम, आयआयसीटी अशा अनेक संस्थांची भर आपण महाराष्ट्राच्या गौरवात घातली. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी गर्जना आम्ही करतो, तेव्हा त्यात आपण ठामपणे पाठिशी आहात, हा आत्मविश्वास कायम मनात असतो," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात म्हणाले.(Maharashtra Infrastructure Projects)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....