गरीब नगरच्या बदल्याचा कट उधळला; दिल्ली पोलिसांच्या तपासात भयंकर प्रकार समोर; दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न

    01-Jun-2026
Total Views |
GAREEB NAGAR NEWS
 
मुंबई : (Delhi Police Investigate Terror Angle) काही दिवसांपूर्वी वांद्रे पूर्वेतील रेल्वे स्थानकाजवळील गरीब नगर परिसरात महापालिकेने ‘धडक मोहीम’ राबवत पाच दिवसांत ४०० पेक्षा अधिक अवैध बांधकामे जमीनदोस्त केली होती. याच अतिक्रमणविरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईला हादरवून सोडणार्‍या एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या सखोल तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 
संशयित दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई पोलीस, विविध सुरक्षा यंत्रणा आणि शहरातील अतिमहत्त्वाची-सर्वाधिक गर्दीची ठिकाणे होती. पोलिसांवर थेट हल्ला करण्यासोबतच महत्त्वाच्या ठिकाणी मोठे स्फोट घडवून मुंबईत दहशत माजवण्याचा या संशयितांचा मुख्य उद्देश असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.
 
हॅण्डलर्ससोबत झालेले चॅट्सही तपास यंत्रणांच्या हाती
 
दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावे जप्त केले आहेत. आरोपींच्या मोबाईल आणि इतर उपकरणांची तपासणी केली असता, त्यात मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांचे व्हिडिओ आणि फोटो आढळले. यावरून दहशतवाद्यांनी शहराची ‘रेकी’ केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, परदेशात बसलेल्या त्यांच्या हॅण्डलर्ससोबत झालेले चॅट्सही तपासयंत्रणांच्या हाती लागले आहेत.
 
घातपातासाठी ‘आयएसआय’चा हात
 
पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ आणि कुख्यात गुंड मुन्ना झिंगाडा यांच्यासह काही प्रमुख विदेशी सूत्रधारांचा मोठा सहभाग असल्याचा दाट संशय आहे. या परदेशी हॅण्डलर्सच्या थेट इशार्‍यावरून आणि आर्थिक रसदीवरच मुंबईत हा कट शिजत होता.
 
 
मुंबई पोलीस आणि दहशतवादविरोधी पथक सतर्क
 
मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा हा भयंकर कट उघडकीस आल्यानंतर, मुंबई पोलीस दल आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अत्यंत सतर्क झाले असून त्यांना ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रत्येक संशयास्पद हालचालीवर करडी नजर ठेवली जात आहे. या दहशतवाद्यांना मुंबईत राहण्यासाठी किंवा ‘रेकी’ करण्यासाठी स्थानिक पातळीवरून कोणी रसद पुरवली होती का, याचा शोध घेण्यासाठी ‘स्लीपर सेल’ आणि स्थानिक नेटवर्कचीही कसून चौकशी सुरू आहे. ‘दिल्ली स्पेशल सेल’च्या या तत्पर कारवाईमुळे सुदैवाने मुंबईवर येऊ पाहणारे एक मोठे संकट टळले आहे.
 
दाऊदचा हस्तक मुन्ना झिंगाडा रडारवर
 
दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय आणि छोटा शकीलचा विश्वासू साथीदार मानला जाणारा मुद्धसर हुसेन सय्यद उर्फ मुन्ना झिंगाडा याचे नाव तपासात पुढे आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तपासादरम्यान या नेटवर्कचे धागेदोरे ‘मुंबई अंडरवर्ल्ड’पर्यंत पोहोचल्याचे समोर आले. विशेषतः मुन्ना झिंगाडा हा या कथित नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तो फरार गुन्हेगार डी-कंपनीशी संबंधित असून छोटा शकीलचा निकटवर्तीय मानला जातो.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या काही संशयितांचे संपर्क मुंबई, दिल्ली आणि पंजाबमधील नेटवर्कशी जोडलेले असल्याचे तपासात आढळले आहे. या मॉड्यूलच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया, आर्थिक व्यवहार, शस्त्रसाठा आणि परदेशातील सूत्रधारांशी संपर्क यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही संशयित आणि आर्थिक नेटवर्कचा शोध सुरू असून विविध राज्यांतील तपासयंत्रणा समन्वयाने चौकशी करत आहेत.(Delhi Police Investigate Terror Angle)