महायुतीचा १७ पैकी १७ जागांवर विजय निश्चित;-राज्यात मोठा राजकीय विजय मिळणार; लाडक्या बहिणी योजनेतील पात्रता पुनर्तपासणी होणार - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    01-Jun-2026
Total Views |
 
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : (Chandrashekhar Bawankule) विधानपरिषद निवडणुकीत १७ पैकी १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होणार असून महायुतीला केवळ विजयच नव्हे तर मोठा विजय मिळेल,असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.  महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
 
राज्यातील जागावाटपाचा निर्णय महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी एकमताने घेतला असून भारतीय जनता पक्ष ११, शिवसेना (शिंदे गट) ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सुनेत्रा पवार गट) २ जागांवर निवडणूक लढवणार असून महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
अमरावतीच्या संदर्भात माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी दोघेही प्रगल्भ नेते असून काही स्थानिक मतभेद असले तरी ते महायुतीसोबतच राहतील, असे स्पष्ट केले. मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
 
महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे सांगताना बावनकुळे यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला स्थानिक राजकीय परिस्थिती आणि मतदार संघातील ताकद लक्षात घेऊन ठरविण्यात आल्याचे स्पष्ट केले.
 
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसने स्वतःच्या नगरसेवकांमध्ये नाराजी का निर्माण झाली याचा आत्मपरीक्षण करावे. महिलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी काँग्रेसवर टीका करत महिला आरक्षण विधेयकाला पूर्ण पाठिंबा न दिल्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्याची संधी गमवावी लागल्याचा आरोप केला.(Chandrashekhar Bawankule)
 
लाडक्या बहिणी योजनेतील पात्रता पुनर्तपासणी होणार
 
‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, काही नावे निकषांबाहेर असल्याने वगळण्यात आली आहेत. मात्र अशा प्रकरणांची पुन्हा समितीमार्फत तपासणी होणार असून पात्र महिलांना न्याय दिला जाईल.
 
संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राष्ट्रहित, विकास आणि विकसित भारताच्या संकल्पनेशी संबंधित अनेक मुद्द्यांमुळे मोदींजीबद्दलचा आदर अधिक वाढतो, असे त्यांनी सांगितले.
 
भाजपने इतर पक्षांतील काही नेत्यांना उमेदवारी दिल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखत सक्षम आणि प्रगल्भ व्यक्तींनाही संधी देण्याची भूमिका भाजपची आहे. पक्ष संघटनेत नवे आणि जुने कार्यकर्ते या दोघांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा
 
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त होऊ नये, असा सर्वोच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भातील अनेक प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट होतील, असेही ते म्हणाले.
 
नागपुरात विक्रमी मताधिक्य मिळेल
 
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. राजीव पोद्दार यांच्या उमेदवारीबाबत बोलताना बावनकुळे यांनी त्यांचे सामाजिक आणि संघटनात्मक कार्य अधोरेखित केले. करोना काळात त्यांनी मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख करत यावेळी भाजपला विक्रमी मताधिक्य मिळेल, असा दावा त्यांनी केला.
 
नागपूरमधील निवडणूक बिनविरोध करण्याबाबत विरोधी पक्षांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र प्रत्येक पक्षाची स्वतंत्र भूमिका असते आणि निवडणूक होणे ही लोकशाही प्रक्रियेचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Chandrashekhar Bawankule)