स्व. वसंतराव भागवत : राजकारणातील आदर्श

    08-May-2026
Total Views |
Vasantrao Bhagwat Biography
 
भाजपचा आज जो वटवृक्ष देशभर बहरला आहे, त्यामागे कित्येक ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे अतुलनीय योगदान आहे. असेच एक राजकारणातील आदर्श ठरलेले संघाचे समर्पित स्वयंसेवक आणि भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणजे स्व. वसंतराव भागवत. आज स्व. वसंतराव भागवत यांच्या जयंतीनिमित्ताने संघटनपर्वातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करणारा हा लेख...
 
पक्षाच्या सभेची तयारी मी करेन; पण मी वक्ता असणार नाही. जाहीरसभेची बातमी मी करेन; पण बातमी माझ्या नावावर असणार नाही. निवडणुकीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन; पण मी उमेदवार असणार नाही. पक्षासाठी मी झिजेन; पण मी श्रेय घेणार नाही.प्रत्येक कार्य होणारच; पण त्यात मीपणाचा अहंकार नसेल.” महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात जवळपास ४० वर्षे काम करणाऱ्य़ा जनसंघ-भाजप संघटनमंत्री असलेल्या वसंतराव भागवत यांची उपरोक्तप्रमाणे कामाची पद्धत होती. आज जरी हे कोणालाही खरे वाटणार नाही. परंतु, वसंतराव भागवत यांच्या जीवनाची हीच कार्यपद्धती होती. वसंतराव भागवत यांच्या कार्यपद्धतीच्या ज्या आठवणी स्व. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, प्रा. राम कापसे, रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ नाईक आणि रावसाहेब दानवे, माधव भांडारी यांनी लिहून ठेवल्या आहेत; त्यात उपरोक्त आठवणींप्रमाणेच कामाची पद्धत लक्षात येते.
 
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात अनेक नेते सत्ता, वारसाने मिळालेली राजकीय पदे किंवा लोकप्रियतेमुळे ओळखले जातात. मात्र, काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, जी पडद्यामागे राहून इतिहास घडवत असतात. स्व. वसंतराव भागवत हे अशाच निःस्पृह व अफाट जनसंपर्क असलेल्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक राजकीय व्यक्तिमत्त्व होते. वसंतराव भागवत महाराष्ट्रात जनसंघ ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र संघटनमंत्री होते आणि त्यांनी महाराष्ट्रात भाजपच्या संघटनात्मक पायाभरणीत तथा पक्षाला स्थायी स्वरूप देण्यात अत्यंत मोलाचे योगदान दिले होते.
 
वसंतराव भागवत यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेमधून झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतील शिस्त, अनुशासन, राष्ट्रभावना, सेवाभाव आणि दीर्घकालीन संघटनेचा दृष्टिकोन हे गुण त्यांच्या राजकीय कार्याचे अधिष्ठान होते. तसेच, त्यांनी राजकीय क्षेत्रात एखाद्या तपस्वी ऋषीप्रमाणे कार्य करीत राजकीय क्षेत्राला सत्तेचे साधन न मानता, समाजपरिवर्तनाचे माध्यम म्हणूनच निःस्वार्थ कार्य केलेले आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामधील आदर्श मानले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते जनसंघ भाजप संघटनमंत्री असा त्यांचा प्रवास सामान्य कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देणारा आहे. म्हणूनच, त्यांच्या पावन स्मृती-स्मरणार्थ हा अल्प लेख आहे.
 
‘अंत्योदय’चा जिव्हाळा
 
वसंतराव भागवत यांचा जन्म दि. ८ मे १९३३ रोजी कोंढाळा, ता. चिपळूण, रत्नागिरी जिल्ह्यात झाला. पुढे शिक्षण पुणे येथे झाले. वसंतराव भागवत पुणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या भागात त्यांच्या आत्याबाईंकडे राहायचे आणि त्या भागातील संघशाखेत जात असत. हळूहळू त्या शाखेचे मुख्य व कार्यवाहचे त्यांनी दायित्व निर्वहन केले. रेल्वे स्थानकाजवळ राहत असल्याने, पुणे शहरात येणार्याे संघ अधिकारी यांना कार्यालयात आणणे किंवा कार्यालयामधून रेल्वे स्थानकावर पोहोचविणे, त्यांना सतत भेटणे असा त्यांचा क्रम सुरू असताना संघाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गासोबत त्यांचा संपर्क दृढ होत होता. तसेच रेल्वे स्थानकाजवळच त्यांची शाखा असल्याने शाखेत रेल्वे हमालांच्या परिवारातील मुलांचा सहभाग असायचा. त्यांचे दैनंदिन जीवन वसंतराव भागवत यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळेच पुढे ‘अंत्योदय’ हा विषय त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग तथा जिव्हाळ्याचा विषय ठरला होता.
तत्कालीन पुण्यातील संघाचे प्रचारक रामभाऊ गोडबोले यांच्यासोबत त्यांचा दृढ संपर्क होता. त्यामुळे त्यांचाच प्रेरणेमधून वसंतराव भागवत यांनी १९६० साली प्रचारक जीवन स्वीकारले आणि पुढे अंतिम क्षणापर्यंत पांढर्या कपड्यातील आधुनिक ऋषीप्रमाणे ते व्रतस्थ जीवन जगले.
 
संघाचे प्रचारक ते संघटनमंत्री
 
वसंतराव भागवत अत्यंत गोरेपान, देखणे व्यक्तिमत्त्व होते आणि ते नेहमी टापटीप, नीटनेटके राहायचे. कधीच त्यांचे कपडे विस्कळीत नसायचे. सोलापूरच्या व्याख्यानमालेत प्रा. राम कापसे यांनी त्यांच्या आठवणी सांगताना, त्यांना ‘मिस्टर टिनोपाल’ म्हणत असल्याचा उल्लेख केला होता. वसंतराव भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करीत असताना पहिल्यांदा विस्तारक म्हणून गेले होते. संघ कार्यपद्धतीमध्ये ठरावीक अल्पकाळासाठी पूर्णवेळ संघकार्य करण्यास ‘विस्तारक’ म्हणतात. वसंतराव भागवत कोपरगावला ‘विस्तारक’ म्हणून गेल्यावर त्यांची भेट सूर्यभानजी वहाडणे यांच्यासोबत झाली व कायमचे ऋणानुबंध निर्माण झाले आणि जे अगदी शेवटपर्यंत कायम होते.
 
पुण्यातील संघाचे प्रचारक रामभाऊ गोडबोले यांच्या सततच्या संपर्कामुळे वसंतराव भागवत वर्ष १९६० मध्ये संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले. कालांतराने त्यांच्याकडे भारतीय जनसंघाच्या कामाची जबाबदारी आली होती. त्याकाळात देशात काँग्रेसचा एकछत्री अंमल असताना जनसंघाचे काम उभे करणे अत्यंत कठीण होते. परंतु, त्या कठीण काळात त्यांनी संघटनेच्या संघटनात्मक कामात स्वतःला झोकून दिले. संघटनेचा विस्तार, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, वैचारिक बैठक पक्की करणे, कार्यकर्तानिर्माण इत्यादी रचनात्मक कामे त्यांनी केली होती. १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर त्यांना संघटनमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. संघटनमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर पक्षाची शिस्तबद्ध व स्थायी रचना उभारण्याचे कठीण कार्य केले. स्व. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, ना. स. फरांदे, अण्णा डांगे, भाऊसाहेब लहाने, पांडुरंग फुंडकर अशी देश व महाराष्ट्र व्यापी नेत्यांची फळी उभी केली होती.
 
सोशल इंजिनिअरिंग ‘मा-ध-व’ प्रयोग
 
वसंतराव भागवत महाराष्ट्र भाजप संघटनमंत्री म्हणून कार्य करीत असताना, महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रबळ वर्चस्व होते. सोबतच साखरसम्राट, सहकार क्षेत्रातील दिग्गज तथा शिक्षण क्षेत्रातील मोठ्या हस्तींचा मोठा प्रभाव होता. अशा परिस्थितीत भाजपचा विस्तार करणे, हे सोपे काम नव्हते. मात्र, वसंतराव भागवत यांनी दीर्घकालीन स्थायी संघटनबांधणीवर भर दिला.त्यासाठी त्यांनी ‘सोशल इंजिनिअरिंग’चा पहिला प्रयोग महाराष्ट्रात केला होता. मायावती यांनी उत्तर प्रदेशात आणि प्रकाश आंबेडकरांनी ग्रामीण भागात जो ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग केला आहे, तो प्रयोग वसंतराव भागवत यांनी मायावती व प्रकाश आंबेडकर यांचा नेतृत्व-उदय होण्याअगोदर म्हणजे, सात दशकांपूर्वीच केला होता. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात बहुजन समाज, बारा बलुतेदार यांची मोट बांधून ‘सोशल इंजिनिअरिंग’ ‘मा-ध-व’ फॉर्म्युला विकसित केला. ठरावीक पद्धतीने संघटनेचा विस्तार करण्यासाठी नियमबद्ध रचना उभी केली. जिल्हा, तालुका, ग्रामीण पातळीवर कार्यकर्त्यांची फळी उभी केली. त्यामुळेच भाजपची मुळे समाजात खोलवर रुजली आणि नंतरच्या काळात पक्षाला सत्ता मिळवण्याचा मजबूत पाया तयार झाला. त्या क्षणिक निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्याऐवजी संघटनबांधणीला त्यांनी महत्त्व दिले होते. त्यामुळेच त्यांच्या हयातीतच महाराष्ट्रात १९७८च्या ‘पुलोद’ प्रयोगापासून १९८९ साली खासदार-संख्या व १९९० मध्ये भाजप आमदारांची लक्षणीय संख्या वाढून विधानसभेत यश प्राप्त करता आले होते. आज तर सर्वच्या सर्व क्षेत्रांत भाजप यश संपादन करीत असून, त्यामागे वसंतराव भागवत यांसारख्या अनेक पांढर्या. कपड्यातील आधुनिक ऋषींची तपश्चर्या महत्त्वाची आहे.
 
‘निर्मोही’ वसंतराव भागवत
 
‘निर्मोही’ असलेल्या वसंतराव भागवत यांनी कधीच व्यक्तिकेंद्रित राजकारण केले नव्हते. आमदार, खासदार होण्याचा मोहसुद्धा केला नाही. सत्ता आणि प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांनी संघटन सांगेल ते कार्य करून व्यक्तिनिर्माण, कार्यकर्ते घडवण्याला प्राधान्य दिले. त्यांच्या काळात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्यव्यापी आणि देशव्यापी कार्यकर्ते तयार झाले होते आणि त्यांनी राज्य आणि देश पातळीवर नेतृत्वसुद्धा केले आहे. म्हणूनच, त्यांना पडद्यामागील शिल्पकार असे म्हटले जाते. ज्वलंत राष्ट्रवाद, सांस्कृतिक मूल्ये, संघशिस्त आणि संघटनात्मक विचारधारा, निष्ठा या तत्त्वांचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला. सततचा प्रवास, दगदग आणि कठोर परिश्रम इत्यादीमुळे त्यांचे शरीर थकले. त्यांना विविध आजारांनीसुद्धा ग्रासले होते. अखेरच्या क्षणी स्व. प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा महाजन यांनी त्यांची शुश्रूषा केली होती. काळजी घेतली होती. शेवटी दि. २१ फेब्रुवारी १९९० रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
 
आज जरी ते आपल्यात नसले, तरी त्यांनी उभी केलेली संघटनेची संघटनात्मक परंपरा आजही जिवंत आहे. स्व. वसंतराव भागवत हे राजकारणातील असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी स्वतःसाठी सत्ता, पद मिळविण्याचा कधीच विचार केला नाही. परंतु, संघटनेसाठी कठीण परिश्रम करत राजकीय सत्तेचा मजबूत मार्ग तयार करून दिला आहे. त्यामुळेच भाजप आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात स्व. वसंतराव भागवत यांचे नाव कायम स्मरणात राहील.
 
आ. निरंजन डावखरे
(लेखक भाजप, महाराष्ट्र प्रदेशसरचिटणीस आहेत.)