‘एसआयआर’ची धास्ती

    08-May-2026
Total Views |
Maharashtra SIR Voter Review
 
देशभर सुरू असलेली मतदारयादी विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात, ‘एसआयआर’ मोहीम आता महाराष्ट्रातदेखील राबवली जाणार आहे. मतदारयादीतील त्रुटी दूर करणे, मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करून मतदारयादी अद्ययावत करणे, हा याचा मुख्य उद्देश. मात्र, ‘एसआयआर’ची धास्ती विरोधकांनी आधीच घेतलेली दिसते.
 
कारण, आपले बोगस मतदान जाणार आणि आपला हा ‘व्होट जिहाद’चा काळा चेहरा उघड होणार, अशी चिन्हे दिसू लागल्याने महाविकास आघाडीतील नेते कावरेबावरे होत आहेत. महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्य़ा ‘एसआयआर’संदर्भात बुधवार, दि. ६ रोजी भाजपची कार्यशाळा वसंत स्मृती, दादर येथे संपन्न झाली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांसह राज्यभरातले भाजपचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात जवळपास ५० लाख बोगस मतदार आहेत. यावर भाजपचे कार्यकर्ते आक्षेप घेणार आहेत. कारण, त्यांच्याकडे बोगस जन्म प्रमाणपत्रे आढळून आली आहेत. ‘एसआयआर’ मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील असे बोगस बांगलादेशी घुसखोर हद्दपार होणार असून, बोगस मतदानास पूर्णविराम मिळणार आहे.
 
आता ही बोगस ‘व्होट बँक’ कुणी वाढवली, हे राज्याला चांगलेच माहीत आहे. त्यामुळेच विरोधक आपले भांडे फुटणार, यातूनच त्रस्त झाले आहेत. मुंबईत खोट्या कागदपत्रांच्या केल्या गेलेल्या जन्म प्रमाणपत्र नोंदीचा घोटाळा उघडकीस आला होता. यामध्ये जवळपास ८७ हजारांच्या वर अशी बनावट कागदपत्रे आढळून आली आहेत. नांदेडमध्ये एका गावात २०२५ साली १५ हजार, ५६०च्या आसपास बनावट जन्म प्रमाणपत्रे दिली गेली होती, तर मालेगावमध्ये तीन हजार बनावट जन्मदाखला प्रमाणपत्र रद्द करण्यात आली होती. यवतमाळच्या आर्णी तालुयात शेंदुरसणी या लहान गावातून सुमारे २७ हजार बनावट जन्मप्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल दहा हजार बांगलादेशी नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते. प. बंगालमध्ये ‘एसआयआर’च्या माध्यमातून अनेक बोगस मतदार घटले. दक्षता म्हणून भाजपने घरोघरी जागरूकता करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात ‘एसआयआर’वरुन राज्यातही राजकीय संघर्ष रंगताना पाहायला मिळेल.
 
‘टेक वारी २.०’
 
आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) प्रत्येकक्षेत्रातील महत्त्व ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेत ‘टेक वारी २.०’ महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह दि. ४ मे ते ८ मेदरम्यान त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय येथे सुरू आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या पाच दिवसांत ‘तालरंग’, ‘नादरंग’, ‘योगरंग’, ‘कलारंग’ आणि ‘संस्कृतीरंग’ असे पाच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर, ‘एआय एजंट वासुदेव’ हा नावीन्यपूर्ण प्रयोग या कार्यक्रमात वापरण्यात आला. ‘एआय’ एजंटने प्रेक्षकांशी संवाद साधला व त्यांनी कार्यक्रमाची पूर्ण माहिती दिली. तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश हा सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करणे आहे.
 
सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’ असून, त्याच्या सेवेसाठीच ‘टेक वारी’ आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘आयआयटी’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘गुगल’ यांसारख्या संस्था यावेळी आपली ‘एआय’ उत्पादने घेऊन लोकांना त्याची आवश्यकता व महत्त्व या सप्ताहात सांगत आहेत. कृषी क्षेत्र, प्रशासन, कला, चित्रपट, मानसिक आरोग्य या सर्वच क्षेत्रांत ‘एआय’ची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे यावेळी अधोरेखित करण्यात आले. माणसाने तयार केलेल्या या हुशार हेल्परमुळे खरोखरच क्रांती झाली आहे. जॉन मेकार्थी यांनी ही संकल्पना सर्वप्रथम १९५५ मध्ये वापरली अन् १९५६ साली ‘एआय रिसर्च कॉन्फरन्स’चे आयोजन केले गेले, असे म्हटले जाते. ‘नोबेल’ विजेते जेफ्री हिंटन यांना ‘एआय’चे पितामह म्हटले जाते. तर, कृषी क्षेत्रात पुणे जिल्ह्यातील निंबूजच्या सुरेश जगताप या शेतकऱ्य़ाने २०२५ साली ‘एआय’चा वापर करून ऊस उत्पादन वाढवले, तेही कमी पाण्यात, तर पारंपरिक शेतीत थोडा बदल करत २०२४ साली नितीन पाटील या तरुण शेतकर्या ने द्राक्ष बागेत ‘एआय’चा वापर करून ‘सेन्सर’ उपकरणद्वारे कीटकांचा सामना, पिकांना पाणी, खत याबाबत नियोजन केले. यातही त्यांनी ५० टक्के पाण्याची बचत केली. या सर्व उदाहरणांवरून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रत्येक क्षेत्रातील आपले प्रश्न कसे सोडवता येतील, याबाबत ‘टेक वारी २.०’ नक्कीच फायद्याची ठरेल.
 
अभिनंदन परुळेकर