निदा खानला एमआयएमचा आसरा; मंत्री संजय शिरसाट यांची चौकशीची मागणी

    08-May-2026   
Total Views |
Sanjay Shirsat
 
छत्रपती संभाजीनगर : (Sanjay Shirsat) नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगमधून अटक करण्यात आली असून तिला एमआयएम पक्षाच्या नगरसेवकाने आसरा दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या नगरसेवकांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
 
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "काल संभाजीनगरमध्ये पोलिसांनी कारवाई करून नाशिकमधील धर्मांतराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला ताब्यात घेतले. दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत ती संभाजीनगर जिल्ह्यातील झोपडपट्टीच्या भागात ड्रग्सचे अवैध व्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी लपली होती. निदा खान ही एकटी नसून तिच्यासोबत तिची आई आणि मावशीसुद्धा होती. यात एमआयएम पक्षाने तिला साथ दिली होती. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागे यासंदर्भात उघड वक्तव्य करत एका अर्थाने तिला पाठिंबा दर्शवला होता. मुंब्रा, पुणे, नाशिक अशा अनेक ठिकाणच्या प्रकरणांतून एमआयएम त्यांची गतीविधी वाढवण्याचा प्रयत्न करते. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे असे सगळे प्रकार एमआयएमच्या महाशयांच्या नेतृत्वात होतात. निदा खान ही एक मोहरा आहे. महाराष्ट्रभर त्यांचे जाळे पसरले आहे."(Sanjay Shirsat)
 
एसआयटी चौकशी व्हावी
 
ते पुढे म्हणाले की, "हिंदूंचा द्वेष करणे, त्यांचे धर्मांतर करणे अशा प्रकारांमुळे समाजात चीड निर्माण होऊ लागली आहे. निदा खानकडून याबाबतची माहिती समोर येणारच आहे. परंतू, या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहे. यातील मास्टरमाईंड कोण आहे, ते समोर यायला हवे. याप्रकरणाचे धागेदोर पसरलेले असतील. एमआयएमचे इम्तियाज जलील आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर लोकांचीही चौकशी झाली पाहिजे. या चौकशीतून निश्चितच मोठे षडयंत्र महाराष्ट्राच्या समोर येईल. एमआयएमच्या निवडून आलेल्या ३३ नगरसेवकांपैकी किती नगरसेवक गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित आहे ते बघितले पाहिजे."(Sanjay Shirsat)
 
 
निदा खानला एमआयएम नगरसेवकाचा आश्रय
 
गेल्या एक ते दीड महिन्यांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यासाठी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांची चौकशी करण्यात येणार असल्याचेही समजते.
 
"मागच्या काही दिवसांत इम्तियाज जलील यांनी निदा खानचे समर्थन केले. काल ती संभाजीनगरमध्ये सापडणे आणि तिला एका नगरसेवकाचे पाठबळ असणे म्हणजे यामागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी इम्तियाज जलील आणि एमआयएमच्या नगरसेवकांची चौकशी करून त्यांना या गुन्ह्यात आरोपी करावे."
- आ. गोपीचंद पडळकर (Sanjay Shirsat)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....