पुणे Ravi Pandit KPIT Technologies founder Pass away : भारतीय ‘ऑटोमोटीव्ह आणि मोबिलिटी सॉफ्टवेअर’ अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि ‘केपीआयटी टेक्नॉलोजी’चे सह-संस्थापक व अध्यक्ष डॉ. एस. बी. (रवि) पंडीत (१९५०–२०२६) यांचे ८ मे २०२६ रोजी सकाळी पुण्यात निधन झाले. पेशाने सीए असलेल्या रवी पंडीत यांचा तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठण्यापर्यंतचा प्रवास फार प्रेरणादायी आहे.
आपल्या दूरदृष्टीने आणि कठोर मेहनतीने पुण्यात सुरू केलेल्या एका छोट्याश्या स्टार्टअपला एका जगविख्यात कंपनीपर्यंत नेऊन ठेवले. जगभरातील लाखो वाहनांमध्ये त्यांचे तंत्रज्ञान कार्यरत आहे, ज्यात स्वयंचलित तंत्रज्ञान, इलेक्ट्रीक तंत्रज्ञान आणि क्लीन एनर्जी सारख्या घटकांचा सामावेश आहे.
मराठी शाळेत शिक्षण ते एमआयटीपर्यंतचा प्रवास
पुण्यातील एका सर्वसाधारण मराठी कुटूंबात जन्म झालेल्या डॉ. रवी पंडीत यांचे शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले होते. त्यांनी पुणे विद्यापीठातून एम.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. १९७६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचे वडील बी.आर. पंडीत यांच्या 'किर्तने अँड पंडित' (Kirtane & Pandit) या सीए फर्ममध्ये रुजू झाले. ते स्वतः एक गोल्ड मेडलिस्ट सीए होते. पुढे उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील ‘एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेमजमेंट’मध्ये प्रवेश घेतला आणि तिथून व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. काही काळ शिकागोत काम केल्यानंतर त्यांनी भारतात परत त्यांचे सहकारी किशोर पाटील यांच्यासोबत काम केले. या दरम्यान उत्पादन आणि ग्राहक सेवा हे क्षेत्र त्यांना समजले.
एका सीएच्या डोक्यात कशी आले जगविख्यात तंत्रज्ञान कंपनी तयार करण्याची कल्पना?
१९८०च्या दशकाच्या शेवटी जेव्हा भारत आपल्या अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करत होता. तेव्हा डॉ. पंडीत यांनी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील बूम ओळखली. २५ जानेवारी १९९०मध्ये त्यांनी किशोर पाटील आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ शिरीष पटवर्धन यांच्यासोबत ‘केपीआयटी इन्फोसिस्टम्स’ची स्थापना केली.
छोट्याश्या ‘सीए फर्म’च्या कार्यालयात सुरू झालेल्या या कंपनीचा विस्तार आजघडीला जगभरात आहे. सुरुवातीचे ५० ते ६० ग्राहक त्यांनी आपल्या सीए फर्म आणि पूर्वपुण्याईच्या जोरावर मिळवले. याशिवाय अन्य सामान्य ‘आयटी आउटसोर्सिंग’ कंपन्यांशीही त्यांचा संबंध आला. यानंतर ‘केपीआयटी’ने संपूर्ण कामकाजाचा रोख ‘ऑटोमोटीव्ह’ आणि उत्पादन क्षेत्राकडे वळवला. कठिण तांत्रिक समस्या ज्या अभियांत्रिकीच्या जोरावर निराकरण केल्या जाऊ शकतील, अशा संधी त्यांनी शोधल्या.
...आणि ‘केपीआयटी’ बनली जगातील तंत्रविख्यात कंपनी
सुरुवातीला काहीकाळ भांडवली चणचण आणि नव्या तंत्रज्ञान समस्या असूनही संस्थापकांच्या दूरदृष्टीमुळे कंपनी तरुन गेली. १९९९मध्ये कंपनीने आयपीओ बाजारात आणला आणि तो यशस्वीही झाला. सुखद धक्का म्हणजे हा आयपीओ ५० टक्क्यांनी ओव्हर सबस्क्राईब झाला. ज्यामुळे कंपनीने स्वतःला सिद्ध केल्याची पावतीच मिळाली.
२००२मध्ये ‘कमिन्स इन्फोटेक’सोबत रणनितीक विलीनीकरण झाल्यानंतर केपीआयटीचे नामांतर ‘कमिन्स इन्फोसिस्टम’ असे झाले. या विलयानंतर कंपनीला आंतरराष्ट्रीय पटलावरील ऑटोमोटीव्ह अभियांत्रिकी क्षेत्रात भक्कम स्थान मिळाले. २०१८-१९मध्ये कंपनीत मोठे बदल करण्यात आले. ज्यात मोबिलिटी आणि सॉफ्टवेअर आणि ‘डिफाइंड व्हीकल्स’वर भर देण्याचा निर्णय घेतला. स्वच्छ, स्मार्ट आमि सुरक्षित जग या व्हीजनद्वारे स्वतःला कंपनीने नवी ओळख दिली.
आजघडीला ‘केपीआयटी’चे १५ देशात साम्राज्य आहे. कंपनीत एकूण १३ हजार तज्ज्ञ आहेत. कंपनीचे सॉफ्टवेअर जगभरातील दोन कोटींहून अधिक वाहनांना तंत्रसुसज्ज बनवते आहे. ‘बीएमडब्ल्यू’, ‘होंडा’, ‘फोर्ड’, ‘मर्सिडीझ बेन्झ’ सारख्या कंपन्यांना केपीआयटी सेवा देते.
व्यावसायासोबत देश आणि समाजसेवेलाही देत महत्व
डॉ. रवि पंडीत हे देशाच्या 'नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन'च्या समुहात सामील होणारे एकमेव खासगी सदस्य होते. त्यांनी पुण्यातील आंतरराष्ट्रीय केंद्र व जनवाणीची सहस्थापना केली. तसेच पुण्यातील शून्य कचरा उत्सर्जन प्रकल्पाला चालना दिली. प्रसिद्ध वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांच्यासोबत ‘लीपफ्रॉगिंग टू पोल-वॉल्टिंग’ नावाच्या पुस्तकासाठी योगदानही दिले. त्यांच्या याच योगदानांमुळे कित्येक विद्यापीठांनी त्यांना मानद ‘डॉक्टरेट’ ही पदवी दिली आणि ‘इंडियन नॅशनल सायन्स’ ‘अकेडमीसाठी फेलोशिप’साठी निवडही केली होती. एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेल्या कंपनीने आज २० हजार कोटींचे साम्राज्य उभे केले आहे.
शेअर बाजारानेही वाहिली आदरांजी
दिवसभरातील पहिल्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘बीएसई’वर ‘केपीआयटी टेक्नॉलोजी’चा शेअर ०.६१ टक्क्यांनी वाढून ७२६ रुपयांवर पोहोचला. या आठवड्यात तो १४३३ रुपये इतका उच्चांक गाठला होता. कंपनीला मार्च तिमाहीत एकूण निव्वळ नफा १६४ कोटी इतका झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ३३ टक्क्यांनी घसरला असला तरीही कंपनीच्या महसुलात एकूण १२ टक्क्यांनी वृद्धी दिसून आली. गेल्या वर्षी हा महसुल १५२८ कोटी इतका होता तर यंदा १७११ कोटी इतका झाला.