मुंबई : (Rashtriya Swayamsevak Sangh) भारतीय 'समाज' ही संकल्पना पाश्चात्त्य 'सोसायटी' संकल्पनेपेक्षा मूलतः वेगळी आहे. भारताची सभ्यतावादी विचारधारा एकात्मता, सहकार्य, कर्तव्यभावना आणि परस्पर जबाबदारी यांवर आधारित आहे; ती सामाजिक कराराच्या पाश्चात्त्य सिद्धांतांवर आधारित नाही. सर्व अस्तित्व एकच आहे, ही भावना भारतीय विचारसरणीचा आणि सामाजिक समरसतेचा मूलाधार आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
कर्नाटकातील जेएसएस महाविद्यापीठ येथे 'राष्ट्रीय विकासासाठी सामाजिक समरसता ही प्रेरक शक्ती' या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सुत्तुर क्षेत्राचे पूज्य जगद्गुरु श्री शिवरात्री देशकेंद्र महास्वामीजी यांच्या उपस्थितीत 'आत्मनो मोक्षार्थम् जगत् हितायाचं' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.(Rashtriya Swayamsevak Sangh)
सामाजिक भेदभाव आणि विषमता या मनात निर्माण होतात असे सांगत, त्या दूर करण्यासाठी वर्तनातील बदल, सामाजिक संवाद आणि भावनिक एकात्मता आवश्यक असल्याचे सरसंघचालकांनी यावेळी नमुद केले. विविध समाजघटकांमध्ये मैत्री निर्माण करणे, भिन्न सामाजिक स्तरातील कुटुंबांना भेट देणे आणि सामाजिक समतेसाठीच्या उपक्रमांना पाठिंबा देणे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेवरील भाषणांचा संदर्भ देताना ते म्हणाले की, सामाजिक समानता आणि बंधुता नसल्यास राजकीय व आर्थिक समता टिकू शकत नाही. राष्ट्रीय एकात्मता आणि घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी बंधुता अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संवाद सत्रादरम्यान त्यांनी धर्म, जात, कुटुंबव्यवस्था, विवाह, घटनात्मक मूल्ये, लोकसंख्या धोरण आणि सामाजिक समरसता यांसंदर्भातील प्रश्नांची उत्तरे दिली. धर्म आणि समाज घटकांमधील समन्वय मानवतेच्या अस्तित्वासाठी आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी आचरण आणि उदाहरणातून जातीय भेदांवर मात करण्याचे आवाहन केले. सामाजिक समरसता ही केवळ राष्ट्रीय विकासाची प्रेरक शक्ती नसून सर्वांगीण विकासासाठीची 'पूर्वअट' आहे. समाजाने या मूल्यांचा दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष आचरण सुरू करावे, असे आवाहनही त्यांनी केले.(Rashtriya Swayamsevak Sangh)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक