नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण : आतापर्यंत आठ आरोपी ताब्यात फरार; निदा खानला छत्रपती संभाजीनगरातून अटक!

    08-May-2026   
Total Views |
Nashik
 
मुंबई : (Nashik 'Corporate Jihad' Case) नाशिकच्या एका आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणात फरार असलेली आरोपी निदा खानला अखेर पोलिसांनी अटक केली. नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सुमारे २५ दिवस शोधमोहीम राबवल्यानंतर गुरुवारी तिला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. अशी माहिती आहे की, या प्रकरणात यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. संबंधित आयटी कंपनीच्या बीपीओ युनिटमध्ये काही धर्मांध मुस्लिम कर्मचाऱ्यांकडून संघटित पद्धतीने हिंदू महिला कर्मचाऱ्यांचे शोषण केल्याचे आरोप समोर आले होते.
 
पीडित महिलांनी लैंगिक छळ, मानसिक दबाव, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच निदा खान महिलांना हिजाब आणि बुर्का परिधान करण्यासाठी, इस्लामी पद्धती स्वीकारण्यासाठी आणि धार्मिक स्वरूपाचा मजकूर पाहण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचेही सांगितले जात आहे. तपासात असेही समोर आले की, पीडितेला काही मोबाईल अ‍ॅप्स आणि धार्मिक आशयाचे साहित्य पाठवण्यात आले होते. तसेच तिचे नाव बदलण्याचाही कथितपणे प्रयत्न केला जात होता.
 
 
अटकेपूर्वी निदा खानने नाशिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आपण गर्भवती असून मुंबईत राहत असल्याने अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी तिने न्यायालयाकडे केली होती. बचाव पक्षाने महाराष्ट्रात स्वतंत्र धर्मांतरविरोधी कायदा नसल्याचा युक्तिवाद करत जबरदस्ती धर्मांतराचे आरोप निराधार असल्याचेही म्हटले होते. मात्र न्यायालयाने तिचे युक्तिवाद मान्य केले नाहीत आणि अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात डिजिटल पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि अनेक संवेदनशील माहिती समोर आली असून आरोपीची कोठडीत चौकशी आवश्यक आहे.(Nashik 'Corporate Jihad' Case)
 
गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खान फरार होती. तिचा मोबाईल फोन तसेच काही नातेवाईकांचे फोनही बंद आढळले होते. तिच्या पतीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अनेक संभाव्य ठिकाणी छापे टाकले, मात्र प्रत्येक वेळी घरे बंदच आढळली. त्यानंतर राज्यभर शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. या प्रकरणात निदा खानविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत लैंगिक छळ, बदनामी आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.(Nashik 'Corporate Jihad' Case)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक