या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता

    08-May-2026
Total Views |
Nalini Prabhakar Naik
 
संघाच्या शतकभराच्या वाटचालीत स्वयंसेवकांमागे कंबर कसून उभे राहणार्यास मातृशक्तीचे योगदान लाखमोलाचे! याच मातृशक्तीचे मूर्तिमंत रूप असलेल्या नलिनी प्रभाकर नाईक यांच्याविषयी...
 
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता|
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
 
संपूर्ण विश्वात मातृशक्तीचे जे दैवी स्वरूप आहे, ते केवळ उत्पत्तीचेच नव्हे; तर संस्कारांचे आणि सृष्टीचेही आधारस्तंभ आहे. ज्या मातृशक्तीने स्वतःचे अस्तित्व, स्वकल्याण आणि वैयक्तिक सुखाचा विचार बाजूला ठेवून, समाज आणि राष्ट्रासाठी स्वयंसेवकांना अखंड पाठबळ दिले, अशा मातृशक्तीचे योगदान वंदनीय असेच!
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज आपल्या स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करत आहे. या शतकभराच्या प्रवासात संघाने ‘जगातील सर्वांत मोठे स्वयंसेवी संघटन’ म्हणून नावलौकिक मिळवला. आज देशभरात ९० हजारांहून अधिक शाखा आणि अनेक सहयोगी संघटनांच्या माध्यमातून रा. स्व. संघाचे राष्ट्रउभारणीचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. या अवाढव्य विस्ताराचे श्रेय जिथे समर्पित प्रचारक आणि कार्यकर्त्यांना जाते, तिथेच या कार्याचा पाया मजबूत करणार्याह त्या ‘अदृश्य मातृशक्ती’चा वाटाही तितकाच मोलाचा ठरतो. आणीबाणीच्या काळात संघसमर्थक स्त्रीशक्तीचे धैर्य पहिल्यांदा विशेष रूपाने समाजासमोर आले. घरातील बैठका असोत किंवा कार्यकर्त्यांची भोजन व्यवस्था, कोणत्याही गाजावाजाशिवाय ही ‘मातृशक्ती’ सदैव कंबर कसून उभी राहिलेली देशाने पाहिली आहे.
 
अशाच एका समर्पित मातृशक्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे, वसई-उमराळे येथील नलिनी प्रभाकर नाईक. त्यांचे पती प्रभाकर गोविंद नाईक हे गेल्या ५६ वर्षांपासून नालासोपारा परिसरात संघाचे निष्ठावान कार्य करीत आहेत. शाखा मुख्य शिक्षकापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास, आज जिल्हा कार्यवाहपदापर्यंत पोहोचला आहे. प्रभाकर यांचा हा अव्याहत प्रवास शय झाला, तो केवळ त्यांच्या पत्नी नलिनीताई यांच्या खंबीर साथ आणि त्यागामुळेच!
 
दि. २८ एप्रिल १९६६ रोजी जन्मलेल्या नलिनीताईंचे बालपण संघर्षात गेले. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी पितृछत्र हरपल्यानंतर, मातोश्री जनीबाई आणि नातेवाईकांच्या आधाराने त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. कष्टाची सवय त्यांना लहानपणापासूनच होती. १९८७ मध्ये प्रभाकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचा गृहप्रवेश झाला. माहेरी संघाचा कोणताही परिचय नसतानाही, सासरी आल्यावर त्यांनी संघाची शिस्त आणि विचार केवळ स्वीकारलेच नाहीत, तर त्यांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भागही बनवले.
 
दीप्ती, भाग्यश्री आणि जतीन या तीन अपत्यांच्या संगोपनाची जबाबदारी असो किंवा प्रभाकर यांच्या संघकार्यामुळे वाढलेली कार्यकर्त्यांची वर्दळ असो, नलिनीताईंनी सर्व जबाबदार्याी हसतमुखाने पेलल्या. संघकार्यासाठी पती अनेक दिवस घराबाहेर असतानाही मुलांचे शिक्षण आणि घरातील सर्व संकटांचा सामना त्यांनी एकटीनेच समर्थपणे केला. १९९२ची अयोध्या कारसेवा असो किंवा संघशिक्षणाचे वर्ग, प्रभाकर निर्धास्तपणे आपले दायित्व पूर्ण करू शकले. कारण, घराची धुरा नलिनीताईंनी समर्थपणे सांभाळली होती. पतीच्या राष्ट्रकार्यात त्यांनी कधीही अडथळा आणला नाही. उलट, आपल्या भूमिकांतून त्यांना प्रोत्साहनच दिले.
 
केवळ कौटुंबिक जबाबदारीच नव्हे, तर नलिनीताईंनी स्वतःचे सामाजिक अस्तित्वही जपले. नलिनीताईंचे कार्य केवळ घराच्या चार भिंतींपर्यंत मर्यादित राहिले नाही. त्यांनी कौटुंबिक जबाबदार्यां सोबतच स्वतःचे एक वेगळे सामाजिक स्थानही निर्माण केले. पतीच्या सेवानिवृत्तीनंतर २०१७ पासून, त्या ‘रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान, बोळिंज’च्या माध्यमातून सक्रिय आहेत. या धार्मिक आणि सामाजिक संस्थेचे कामकाज त्या अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि यशस्वीरीत्या सांभाळत आहेत.
 
हिंदू नववर्षानिमित्त काढली जाणारी ‘स्वागतयात्रा’, उमा देवी उत्सव आणि नरेंद्राचार्य संप्रदायाचे सत्संग यांमध्येही त्यांचा पुढाकार असतो. समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि संस्कृती जपण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. प्रभाकर संघकार्यासाठी वारंवार दौर्याावर असताना मुलांवर राष्ट्रभक्तीचे आणि समाजसेवेचे संस्कार करण्याची मुख्य जबाबदारी नलिनीताईंनी यशस्वीपणे पार पाडली. आज त्यांची मुले आणि नातवंडे ज्या सुसंस्कृत वातावरणात घडत आहेत, त्याचे संपूर्ण श्रेय त्यांच्या दूरदृष्टीलाच जाते. गेल्या ३९ वर्षांच्या संसारात अनेक आर्थिक आणि कौटुंबिक संकटे आली. मात्र, प्रभाकर नोकरी आणि संघकामाच्या व्यापात असतानाही नलिनीताईंनी कधीही डगमगून न जाता, धैर्याने सर्व परिस्थिती हाताळली. ‘पतीला समाजसेवेसाठी मोकळे सोडणे’ हीच त्यांची खरी देशसेवा ठरली.स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालून त्यांनी समाजासाठी झटणार्याा कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे पसंत केले. ही ‘अदृश्य शक्ती’ म्हणूनच आज वसई-नालासोपारा परिसरात संघकामाचा वटवृक्ष उभा राहिला आहे.
 
संघाच्या शताब्दी वर्षात जेव्हा आपण डोळे दिपवणारा विस्तार पाहतो, तेव्हा त्यामागे नलिनीताईंसारख्या हजारो माता-भगिनींचे मौन तप सामोरे येते. आपला संसार नेटका करून पतीला समाजसेवेसाठी मोकळे सोडणे आणि स्वतःही समाजकार्यात झोकून देणे, हे कार्य दिव्य आहे. नलिनी नाईक यांना त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त आणि त्यांच्या आजवरच्या त्यागाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
 
कमलेश संखे