‘महारेल’ भविष्यातील ‘टेनोलॉजी पॉवरहाऊस’

Total Views |
MahaRail Official Website
 
महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासाला वेग देणाऱ्य़ा ‘महारेल’ने अल्पावधीतच नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, वेगवान अंमलबजावणी आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रेल्वे, पूल आणि मल्टी-मॉडेल कनेटिव्हिटीच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला गती देणाऱ्य़ा ‘महारेल’च्या वाटचालीबाबत, तसेच संशोधन, नेतृत्व आणि भविष्यातील दृष्टिकोनाविषयी ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जैसवाल यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला संवाद.
 
‘महारेल’ला ‘काँक्रीट क्रॅश बॅरियर विथ इंटिग्रेटेड युटिलिटी डट’ या शोधाचे पेटंट मिळाले आहे. याबद्दल आणि ‘महारेल’च्या संशोधन आणि विकास उपक्रमांबद्दल काय सांगाल?
 
हो, नक्कीच! ‘महारेल’चा ‘एम.डी.’ या नात्याने मला हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो की, ‘काँक्रीट क्रॅश बॅरियर विथ इंटिग्रेटेड युटिलिटी डट’ हे पेटंट मिळवणारी ‘महारेल’ ही पायाभूत सुविधा क्षेत्रातील देशातील पहिलीच शासकीय संस्था ठरली आहे. आम्ही अशाच प्रकारे विविध क्षेत्रांमध्ये संशोधन आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर काम करत आहोत. एखाद्या शासकीय संस्थेने केवळ प्रकल्पांची अंमलबजावणी न करता, स्वतः तंत्रज्ञान विकसित करून त्याचे स्वामित्व हक्क मिळवणे, ही अभियांत्रिकी क्षेत्रातील मोठी उपलब्धी आहे. शासकीय संस्थांना पेटंट मिळाल्यास त्या तंत्रज्ञानाचा वापर इतर राज्यांतील किंवा केंद्र सरकारच्या प्रकल्पांमध्येही करता येतो. यामुळे ‘रॉयल्टी’च्या माध्यमातून महसूल मिळण्यासोबतच देशाच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेलाही बळ मिळते. ‘महारेल’चे हे पाऊल भविष्यात भारतीय रेल्वे आणि रस्तेबांधणी क्षेत्रात एक नवीन मानक ठरू शकते.
 
नागपूर (इतवारी)-नागभीर रेल्वेमार्गाचे गेज रूपांतरण, तसेच इतर सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे कशाप्रकारे प्रवाशांना लाभ होणार आहे?
 
हा प्रकल्प विदर्भातील वाहतुकीचा कणा ठरणार आहे. पूर्वीची ‘नॅरोगेज’ लाईन आता ‘ब्रॉडगेज’मध्ये रूपांतरित केली जात आहे. त्यामुळे नागपूरहून चांदाफोर्ट (चंद्रपूर) कडे जाणार्यात कोळसा आणि इतर मालवाहतुकीला मोठी गती मिळणार आहे. सध्या मालगाड्यांना वर्ध्यावरून वळसा घालून जावे लागते. मात्र, या नवीन मार्गामुळे अंतर कमी होईल आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. या मार्गाचे विद्युतीकरणदेखील सुरू आहे. ‘महारेल’ने या प्रकल्पात ‘फास्ट-ट्रॅक’ पद्धतीचा अवलंब केला असून काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे.
 
मुंबईतील प्रभादेवी पुलाच्या कामाच्या प्रगतीविषयी काय सांगाल?
 
प्रभादेवीचा (जुना एल्फिन्स्टन रोड) पूल हा मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या पुलाचे पाडकाम आणि पुनर्बांधणी ही अतिशय आव्हानात्मक प्रक्रिया आहे. कारण, त्या परिसरात दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असते. हा प्रकल्प म्हणजे अक्षरशः चालत्या गाडीचे चाक बदलण्यासारखा आहे. खाली रेल्वेच्या लोकल धावत असताना आणि वरून दाट वस्तीतून मार्ग काढणे, हे मोठे अभियांत्रिकी आव्हान आहे. मात्र, ‘महारेल’ने यापूर्वीही अशा कठीण प्रकल्पांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. ‘शिवडी-वरळी कनेटर’ हा मुंबईच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणारा प्रकल्प ठरणार आहे. हा ‘२ + २ लेन’चा उन्नत मार्ग शिवडीहून थेट वरळीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईहून येणारी वाहतूक थेट दक्षिण मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचू शकेल. सध्या नवी मुंबईहून वरळीपर्यंत पोहोचण्यासाठी एक ते दीड तास लागतो. मात्र, या कनेटरमुळे हे अंतर अवघ्या दहा ते १५ मिनिटांत पार करता येईल.
 
‘महारेल’ला आजच्या उंचीवर नेऊन ठेवताना तुमच्यासमोर सर्वांत मोठे आव्हान कोणते होते आणि तुम्ही त्यावर कशी मात केली?
 
‘महारेल’चा व्यवस्थापकीय संचालक म्हणून या प्रवासाकडे पाहताना मला खूप समाधान वाटते. ‘महारेल’ची स्थापना महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी झाली होती. मात्र, सुरुवातीला परिस्थिती सोपी नव्हती. मी ‘महारेल’ला एक ‘सरकारी स्टार्टअप’ मानतो. शून्यातून संस्था उभी करताना पारंपरिक मानसिकता बदलणे आणि वेळेचे महत्त्व प्रस्थापित करणे, हे सर्वांत मोठे आव्हान होते. सरकारी प्रकल्पांमध्ये ‘तारीख पे तारीख’ ही संस्कृती सामान्य मानली जाते. मात्र, ‘महारेल’मध्ये आम्ही ‘फास्ट-ट्रॅक एझियुशन’ मॉडेल आणले. ‘डिजिटल वर्क-फ्लो’ आणि ‘रिअल-टाईम मॉनिटरिंग’मुळे निर्णयप्रक्रियेला गती मिळाली. तसेच, बाहेरून तंत्रज्ञान विकत घेण्याऐवजी आम्ही स्वतःचे ‘आर-अॅईण्ड-डी सेंटर’ विकसित करण्यावर भर दिला. त्यामुळे खर्च कमी झाला आणि गुणवत्ता वाढली.
 
पुढील पाच वर्षांसाठी ‘महारेल’बद्दलचे तुमचे मुख्य ध्येय काय आहे?
 
पुढील पाच वर्षांत ‘महारेल’ ही केवळ बांधकाम संस्था न राहता, एक ‘टेनोलॉजी पॉवरहाऊस’ म्हणून ओळखली जावी, हे माझे ध्येय आहे. महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे आणि त्या इंजिनला ‘हायस्पीड’ देण्याचे काम ‘महारेल’ करेल.
 
आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत तुम्ही कोणत्या रणनीतींवर विश्वास ठेवता?
 
जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, स्थानिक कौशल्य आणि वेगवान अंमलबजावणी या त्रिसूत्रीमुळे ‘महारेल’ आज देशातील इतर राज्यांसाठी आदर्श मॉडेल ठरत आहे. सरकारी क्षेत्रात आमची स्पर्धा कोणत्याही खासगी कंपनीशी नसून काळाशी आणि कार्यक्षमतेशी आहे. ‘महारेल’ला एक ‘बेंचमार्क’ संस्था म्हणून उभे करण्यासाठी आम्ही तीन प्रमुख रणनीतींवर भर देतो: १. इंजिनिअरिंग-फर्स्ट विचारधारा (Innovative Engineeing) २. मल्टी-मॉडेल इंटिग्रेशन (Integrated Growth) ३. गती आणि पारदर्शकता (Speed Transparancy)
 
नवीन प्रकल्प किंवा गुंतवणुकीचा निर्णय घेताना तुम्ही कोणत्या प्रमुख घटकांचा विचार करता? तसेच ‘एआय’ आणि ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’चा वापर कसा करत आहात?
 
‘महारेल’चा दृष्टिकोन केवळ रेल्वे रुळ किंवा पूल बांधण्यापुरता मर्यादित नाही. प्रत्येक प्रकल्पाचा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होणे महत्त्वाचे असते. आम्ही प्रकल्प निवडताना आर्थिक व्यवहार्यता, बिगर-भाडे महसूल, जाहिराती, रिअल इस्टेट विकास आणि उद्योगांना मिळणारी जोडणी यांचा विचार करतो. तसेच, प्रकल्पाचा ‘कार्बन फूटप्रिंट’ कमी करण्यासाठी सुरुवातीपासून नियोजन केले जाते. ‘एआय’, ‘डिजिटल वर्क-फ्लो’ आणि ‘रिअल-टाईम मॉनिटरिंग’ यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून महारेल भविष्यात ‘टेक-इन्फ्रा’ कंपनी म्हणून उदयास येत आहे.
 
कार्यसंस्कृती आणि एकूणच कर्मचाऱ्य़ांच्या कौशल्यविकास आणि नवनिर्मितीसाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना राबवित आहात?
 
कोणतेही तंत्रज्ञान कितीही प्रगत असले, तरी ते यशस्वीपणे राबवणारी माणसेच सर्वांत महत्त्वाची असतात. ‘महारेल’मध्ये आम्ही केवळ कर्मचारी भरती करत नाही, तर ‘इंजिनिअरिंग लीडर्स’ घडवतो. नवनिर्मिती तिथेच घडते, जिथे प्रश्न विचारण्याची आणि प्रयोग करण्याची मोकळीक असते. मी माझ्या टीमला नेहमी सांगतो, नवीन काही करण्याच्या प्रयत्नात चूक झाली, तरी चालेल; पण जुन्याच चुका पुन्हा करणे किंवा काहीच नवीन न करणे, हे चालणार नाही. याच वातावरणातून आम्हाला ‘क्रॅश बॅरिअर’सारखी पेटंट्स मिळाली आहेत.
 
यशस्वी टीम बनवण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा गुण कोणता असावा? तसेच ‘वर्क-लाईफ बॅलेन्स’ कसे राखता?
 
माझ्या मते, तांत्रिक कौशल्य शिकवता येते; पण विश्वास कमवावा लागतो. कोणत्याही यशस्वी टीमचा पाया म्हणजे विश्वास. टीममधील प्रत्येक व्यक्तीला आपली भूमिका आणि उद्दिष्ट स्पष्ट असणे आवश्यक असते. मी माझ्या टीमला नेहमी सांगतो, निर्णय घ्यायला अजिबात घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. हा विश्वास मिळाल्यावरच टीम आपली १०० टक्के क्षमता वापरू शकते.
 
तरुण उद्योजक आणि कॉर्पोरेट जगतात उच्चपदांचे स्वप्न पाहणार्याद युवकांना तुम्ही काय सल्ला द्याल?
 
आजच्या वेगवान युगात संधी खूप आहेत; मात्र यशस्वी होण्यासाठी केवळ पदवी पुरेशी नसते. कॉर्पोरेट जगात तोच पुढे जातो, जो समस्या मांडण्याऐवजी समाधान घेऊन येतो. तुमचा दृष्टिकोन नेहमी ‘हा प्रश्न मी कसा सोडवू शकतो,’ असा असावा. मोठे प्रकल्प किंवा मोठे करिअर एका रात्रीत घडत नाही. जसे रेल्वेचे रुळ टाकण्यापूर्वी मजबूत पाया घालावा लागतो, तसेच करिअरमध्येही सुरुवातीची काही वर्षे स्वतःला घडवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. यशाचा कोणताही ‘शॉर्टकट’ नसतो; फक्त सातत्य असते. मोठी स्वप्ने पाहा, पण पाय नेहमी जमिनीवर ठेवा. मोठी झेप घेण्यासाठी मोठी तयारी आवश्यक असते. महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात योगदान देणारे नेतृत्व तुम्ही घडवावे, हीच माझी सदिच्छा!
 
(प्रतिनिधी)

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.