कुठे राहिली लोकशाही?

    08-May-2026
Total Views |
 
Bengal Political Violence
 
प. बंगालमध्ये भाजप नेते सुवेंदू अधिकारींच्या स्वीय साहाय्यकाची परवा रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. बंगालमध्ये अन्य ठिकाणीही भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. पण, भाजपमुळे ‘लोकशाही धोक्यात आहे’ असा एरव्ही उच्चरवाने कंठशोष करणार्यार किती विरोधकांनी, पुरोगामी पत्रकारांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला? म्हणूनच, या मंडळींना प्रश्न विचारावासा वाटतो; आता सांगा पाहू, कुठे राहिली लोकशाही?
 
पश्चिम बंगालमध्ये यापूर्वीच्या निवडणुकांच्या तुलनेत यंदाच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग, स्थानिक पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र दलांनी केलेल्या बंदोबस्ताने चोख भूमिका बजावली. म्हणूनच, पहिल्यांदाच अगदी भयमुक्त वातावरणात दोन्ही टप्प्यांत विक्रमी मतदान बंगालमध्ये नोंदवले गेले. दि. ४ तारखेला निकाल जाहीर झाले आणि भाजपने २०७ जागांसह स्पष्ट बहुमत संपादित करीत, ममतादीदींच्या १५ वर्षांच्या जुलमी राजवटीला कायमचा सुरुंग लावला. बंगालमधील भाजप कार्यकर्तेच नाही, तर तमाम हिंदूंनी रस्त्यावर उतरत ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी अवघा आसमंत दणाणून सोडला. बंगालला एका अत्याचारी, अन्यायकारक, अराजकवादी सरकारपासून स्वातंत्र्य मिळाल्याचा अभूतपूर्व जल्लोष गुलाल उधळत, भाजपचे झेंडे फडकवत बंगालमध्ये अगदी गल्लोगल्ली साजरा झाला. पण, बुधवारी रात्री उशिरा आलेल्या एका बातमीने या विजयोत्सवावर विरजण पडले. ममतादीदींना भवानीपूर मतदारसंघात थेट भिडलेले बंगालचे भाजपचे ‘फायरब्रॅण्ड’ नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय साहाय्यक चंद्रनाथ रथ ऊर्फ चंद्रा यांच्या चारचाकीवर हल्लेखोरांनी गोळीबार केला. या जीवघेण्या हल्ल्यात चंद्रनाथ जागीच ठार झाले. चंद्रनाथ यांनाच लक्ष्य का करण्यात आले, तर ते सुवेंदू अधिकारींचे निकटवर्तीय तर होतेच. शिवाय, दीदींना सुवेंदूंनी ज्या भवानीपूर मतदारसंघातून मात दिली, तेथील निवडणूक व्यवस्थापनातही चंद्रनाथ यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे सुवेंदूंचा ‘उजवा हात’ म्हणून ओळखल्या जाणार्यान चंद्रनाथ यांना संपवण्यात आले. हा हल्ला नेमका कुणी केला, ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण, तृणमूल काँग्रेसने पराभवाचा वचपा काढण्यासाठीच ही राजकीय हत्या घडवून आणल्याचा प्राथमिक कयास आहे.
 
त्याचे धागेदोरे लवकरच समोर येतील आणि आरोपींना कठोर शासनही होईलच. पण, तृणमूलकडून भाजप कार्यकर्त्यांना धमकावणे, त्यांच्या घरांना-दुकानांना आगीत भस्मसात करणे, घरातील महिला-मुलींना बलात्काराच्या धमक्या देणे आणि तरीही कुणी ऐकले नाही; तर त्यांची हत्या करणे, हे विकृत प्रकार गेल्या १५ वर्षांत बंगालने अनुभवले. तृणमूलच्या या खुन्शी राजकारणामुळेच आजवर भाजपच्या ३००हून अधिक कार्यकर्त्यार्ंना बंगालमध्ये आपला जीव हकनाक गमवावा लागला. पण, तेव्हाही किंवा परवाच्या घटनेनंतरही, विरोधकांसह पुरोगामी पत्रकारांनी याप्रकरणी तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन मौनच बाळगलेले दिसते. त्यामुळे ‘लोकशाही बचाव’च्या नावाखाली भाजपला वारंवार आरोपीच्या पिंजर्यामत उभे करणार्यांना, चंद्रनाथ यांच्या हत्याकाडांतून ‘लोकशाहीची हत्या’ झाल्याचे मुळी वाटतच नाही. त्यामागचे कारण म्हणजे, त्यांचा लोकशाहीकडे बघण्याचा सोयीस्कर दृष्टिकोन!
 
चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा ‘इंडी’ आघाडीतील एकाही नेत्याने साधे ‘ट्विट’ करून निषेध नोंदवला नाही. कारण, शेवटी चंद्रनाथ भाजपचा कार्यकर्ता होता. पण, या हत्याकांडाला केवळ ‘भाजप विरुद्ध तृणमूल’च्या रक्तरंजित संघर्षाची किनार नाही. कारण, लोकशाहीत अशाप्रकारे राजकीय वैमनस्यातून होणार्याळ हत्या या सर्वथा निषेधार्हच! मग तो कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा का असेना. परंतु, दुर्दैवाने आजचे राजकारण इतके संकुचित आणि पक्षकेंद्रित झालेले दिसते की, अशा राजकीय हत्यांकडेही पक्षीय संघर्षाच्या चष्म्यातूनच बघितले जाते. म्हणूनच, राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल आणि विरोधकांपैकी कुणीही चंद्रनाथ हत्याकांडावर तोंडातून साधा ‘ब्र’ही काढलेला नाही. पण, बंगालमधील मतदानानंतर जेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते देबदीप चटर्जी यांची हत्या करण्यात आली, त्यानंतर मात्र राहुल गांधींनी दि. २६ एप्रिल रोजी निषेधाचे ‘ट्विट’ केले. त्यात राहुल गांधी म्हणतात, "पश्चिम बंगालमध्ये आता लोकशाही उरलेली नाही. तृणमूलचे गुंडाराज आहे. मतदानानंतर विरोधकांचा आवाज दाबणे, हिंसा करणे हेच तृणमूलचे चरित्र!” एकीकडे राहुल गांधींनी तृणमूलच्या ‘गुंडाराज’वर बोट ठेवले. पण, ममतादीदींच्या दारुण पराभवाला नंतर भाजपची ‘व्होटचोरी’च जबाबदार असल्याचे तुणतुणेही वाजवले. हाच ‘लोकशाही खतरे में हैं’च्या नावाखाली गळे काढणार्यांचा पराकोटीचा दुटप्पीपणा! ‘संविधान’, ‘लोकशाही’, ‘लोकशाहीतील यंत्रणा’, ‘लोकशाहीची हत्या’ असे सगळेच यांच्यासाठी मुळात अगदी सोयीस्कर! यांना वाटेल तेव्हाच लोकशाही जिंकते, यांना वाटेल तेव्हाच लोकशाही जीवही तोडते. म्हणजेच काय, तर एखाद्या रबरासारखेच लोकशाहीला हवे तेव्हा ताणा आणि हवे तेव्हा सोडून द्या! राहुल गांधींसह विरोधकांचा लोकशाहीच्या नावाने सुरू असलेला हा केविलवाणा पोरखेळ सामान्यांच्याही नजरेतून अजिबात सुटलेला नाही. म्हणूनच, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना जागा दाखवून दिली. पण, त्यातूनही धडा घेतील, चिंतन-मनन करतील, ते विरोधक कसले?
 
जी गत विरोधकांची, तीच गत या देशातील ‘जमात-ए-पुरोगामी’ आणि माध्यमांतील ढुढ्ढाचार्यांची. विरोधकांना किमान राजकारणासाठी मुखवटे घालावे लागतात; समर्थनाचे, विरोधाचे, प्रसंगी ढोंगही करावे लागते. पण, माध्यमविश्वात स्वत:ला निष्पक्ष, निष्कलंक आणि महाज्ञानी म्हणून मिरवणार्याव पत्रकारांच्या त्या जमातीबद्दल काय म्हणावे? विरोधक जसे लोकशाहीला आपल्या सोयीने फायद्यासाठी वापरून घेतात, तसेच हे पुरोगामी पत्रकारही त्यांच्या अजेंड्याला, ‘नॅरेटिव्ह’ला साजेसेच लोकशाहीचे चित्र रंगवतात. म्हणजे, बंगाल असो अथवा केरळम्मधील भाजप-संघ स्वयंसेवकांचे पडलेले खून, या बातम्या ‘लोकशाहीची हत्या’ या मथळ्याखाली प्रसारित-प्रकाशित कदापि होत नाहीत. पण, एखाद्या भाजपशासित राज्यात विरोधकांच्या कार्यकर्त्याला गैरकृत्यासाठी झालेली अटक असेल, तर ती घटना मात्र लगोलग ‘लोकशाहीची हत्या’ म्हणून चवीने चार दिवस चघळली जाते.
 
पण, एखाद्या माध्यम-संस्थेने भाजप कार्यकर्त्यांच्या राजकीय हत्यांचा मुद्दा उपस्थित केलाच, तर लगोलग त्यांच्यावर ‘गोदीमीडिया’चे शिक्कामोर्तब करून ‘ट्रोलधाड’ सुरू होते. आताही चंद्रनाथ रथ यांच्या हत्याकांडानंतर बरखा दत्त, रवीश कुमार आणि अन्य पुरोगामी पत्रकारांनी त्याविषयी एका चकार शब्दानेही भाष्य करण्याचे टाळलेले दिसते. पण, हीच पुरागोमी पत्रकारांची टोळी नक्षलवाद्यांना ठार मारू नका, अवैध घुसखोरांच्या घरांवर बुलडोझर फिरवू नका, म्हणून आक्रंदन करण्यात आघाडीवर! मग तेव्हा ‘संविधान’, ‘मानवाधिकार’, ‘सामाजिक न्याय’ आणि ‘लोकशाहीची मूल्ये’ वगैरेची पोपटपंची करुन दाखले दिले जातात. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनातही ही मंडळी सहभागी होतात. यामागचे कारण म्हणजे, हिंदुत्ववाद्यांचा पराकोटीचा द्वेष आणि डाव्यांची तळी उचलण्याची अघोषित परंपरा. अशा ‘गेटकीपिंग’मुळेच मग साहजिकच लोकशाही कुठे सुरक्षित आणि कुठे धोक्यात, याचे अगदी सोयीस्कर निष्कर्ष काढले जातात. चंद्रनाथ रथ यांच्या हत्याकांडाबाबतही काही वेगळे घडलेले नसून, तोच कित्ता ही मंडळी निलाजरेपणाने गिरवत आहेत.
 
असो. नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकांच्या निकालानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "विजय आणि पराजय हे लोकशाहीचे अविभाज्य भाग आहेत. परंतु, लोकशाहीमध्ये भीतीचा नाही, तर जनतेच्या विश्वासाचा विजय होतो.” बंगालमध्येही जनतेच्या भाजपवरील याच अखंड विश्वासाचाच ऐतिहासिक विजय झाला. पण, निवडणुकीत पराभूत होऊनही राजीनामा न देण्याची ममतादीदींची आडमुठी भूमिका असेल, चंद्रनाथ रथसारख्या समर्पित कार्यकर्त्याची निष्पाप हत्या असेल, हे बघितले की खरंच ‘कुठे राहिली लोकशाही?’ या प्रश्नाचे आता विरोधकांसह पुरोगामी माध्यमवीरांनीही उत्तर द्यावे!