मुंबई : (AI in Film Industry) कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही कला, चित्रपटसृष्टी तसेच सर्वच क्षेत्रासाठी उपयुक्त तांत्रिक साधन असले, तरी मानवी भावना, संवेदना आणि सर्जनशीलतेची जागा ती कधीच घेऊ शकत नाही, असा सूर मंत्रालयात आयोजित ‘टेक वारी २.०' कार्यक्रमातील ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ या परिसंवादात उमटला. कला, चित्रपट आणि शिल्पकलेतील मान्यवरांनी एआयच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना तंत्रज्ञानाचा वापर सजगतेने आणि विचारपूर्वक करण्याची गरज अधोरेखित केली.
सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित ‘टेक वारी २.०’ अंतर्गत ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ या विशेष परिसंवादाचे आयोजन गुरुवार दि.७ रोजी करण्यात आले होते. या परिसंवादात काळा घोडा आर्ट्स फेस्टिव्हलच्या संस्थापक आणि कलाकार बृंदा मिलर, शिल्पकार अरझान खंबाटा, चित्रपट दिग्दर्शक रोहन सिप्पी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अशोक कौल यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालक निधी चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा उपस्थित होत्या.
काळा घोडा फेस्टिव्हलच्या आयोजक तथा संस्थापक बृंदा मेलर म्हणाल्या की, "गेली २७ वर्ष काळा घोडा फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते आहे. या फेस्टीव्हलमध्ये सातत्यता असल्यामुळेच हा फेस्टिव्हल यशस्वी आहे."
आता फेस्टिव्हल शासनाच्या मदतीमुळे चांगला होत आहे याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.(AI in Film Industry)
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अशोक कौल एआयवर आधारित चित्रपटांच्या वाढत्या वापराबाबत बोलताना कौल म्हणाले, “चित्रपट हे केवळ तंत्रज्ञान नाही, तर मानवी भावनांचे माध्यम आहे. संवेदना आणि भावनिक स्पर्श नसलेला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आज वेळ वाचवण्यासाठी अनेक शॉर्टकट वापरले जात आहेत; मात्र चित्रपट हा विविध कलांचा संगम असल्याने त्यामध्ये मानवी स्पंदन टिकणे अत्यावश्यक आहे.”(AI in Film Industry)
चित्रपट दिग्दर्शक रोहन सिप्पी यांनी एआयला चित्रपटसृष्टीसमोरील नवे आव्हान मानले. “प्रत्येक काळात चित्रपट क्षेत्रासमोर नवी आव्हाने उभी राहिली आणि ती काळानुसार बदलत गेली. एआयचा वापर वाढत असला, तरी मानवी कौशल्य आणि सर्जनशीलतेचे महत्त्व कायम राहणार आहे,” असे ते म्हणाले.
शिल्पकार अरझान खंबाटा यांनी सार्वजनिक कलेचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. “पब्लिक आर्ट म्हणजे समाजाला कलेशी जोडणारा एक भक्कम दुवा आहे. धातू, दगड, काच यांपासून बनवलेली भव्य शिल्पे, भित्तीचित्रे, लाईट इन्स्टॉलेशन्स आणि स्मारके समाजाच्या सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करतात,” असे ते म्हणाले.(AI in Film Industry)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक