द्रौपदी स्वयंवर
द्रुपदकन्या आता विवाहयोग्य झाली. तिच्या विवाहासाठी राजा द्रुपदाने एक समारोह रचला. राजाने त्याला ‘स्वयंवर’ असे नाव दिले. स्वयंवरासाठी एक अटही ठेवली गेली. स्वयंवराची अट राजाने निश्चित केली; परंतु स्वतः द्रौपदीलाच ती अट माहीत नव्हती. मग हे ‘स्वयंवर’ कसले? हो, व्यासांच्या अनुसार हे ‘द्रौपदी-वृत्ती’चे स्वयंवर आहे. स्वयंवराच्या अटीप्रमाणे सभामंडपाच्या मध्यभागी एक खांब उभा केला होता. त्याच्या वरच्या टोकावर एक मासा यंत्राद्वारे सारखा फिरता ठेवला होता. खाली स्तंभाभोवती एक तेलाचे पात्र ठेवले होते. त्या तेलाच्या पात्रातील प्रतिबिंबाकडे पाहून, वर फिरणार्या माशाचा डोळा फोडायचा होता. अट अत्यंत कठीण होती, परंतु जो पुरुष माशाचा डोळा फोडेल, त्यास द्रौपदीसारखी सुंदर, सुकुमार, बुद्धिमान राजकन्या मिळेल. मग तो पुरुष कोणत्याही जातीपातीचा, कुळाचा अथवा नीच संस्कारांचा असो! कोणताही पिता अशा प्रकारे अविचारी अट ठेवून, आपल्या प्रिय मुलीस कुसंस्कारी धनुर्धार्यास कसा समर्पित करेल? कधीच नाही. मग बुद्धिमान व्यास अशा प्रकारची स्वयंवराची अट कसे बरे ठेवतील?
व्यास जीवनाला संसार सागर वा नित्य वाहणारी सरिता, म्हणजेच नदी मानतात. त्या जीवन सरितेमध्ये सहज पोहणार्या व पैलतीरावर म्हणजे मोक्षप्राप्तीला नेणार्या ज्ञानाला, ते मत्स्याचे रूपक देतात. त्यांनी आपल्या मातेचे नाव ‘मत्स्यगंधा’ ठेवले आहे, जी एका कोळ्याची म्हणजे मच्छीमाराची मुलगी दाखविली आहे. ज्ञानाने परिपूर्ण आहे ती मत्स्यगंधा. द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी याच मत्स्याचा, म्हणजेच ‘ज्ञानाचा’ डोळा फोडण्याची अट ठेवली गेली होती. अशा प्रकारे ज्ञानाचा डोळा फोडण्याचे काम साधनावीर अर्जुनच करू शकतो. स्वयंवरात भाग घेण्यासाठी अनेक राजे, महाराजे आणि धनुर्धर आले; परंतु कोणाकडूनही ही विचित्र अट पुरी होऊ शकली नाही. नंतर कर्ण आला. मत्स्याचा डोळा फोडण्यासाठी कर्ण सिद्ध झाला. इतक्यात द्रौपदीने कर्णाबरोबर विवाह करण्यास नकार दिला; कारण तो सूतपुत्र म्हणजे नीच जातीचा होता. या ठिकाणी नीच जाती म्हणजे ‘नीच वृत्ती’ मानली पाहिजे. द्रौपदीने कर्णाचा अपमान केला, हे शल्य कर्णाने शेवटपर्यंत मनात ठेवले आणि द्रौपदीचा बदला घेण्याचे ठरविले.
अर्जुनाने तेलाच्या भांड्यात वर फिरणार्या मत्स्याचे प्रतिबिंब पाहून, एकाच बाणाने त्या मत्स्याचा डोळा फोडला. ज्ञानाला ज्ञान मिळाले, म्हणूनच पांडवी वृत्ती द्रुतगतीने द्रौपदीरूप परम्पद प्राप्त करू शकली. द्रौपदीने वीर अर्जुनाच्या गळ्यात वरमाळा घातली आणि आपल्या सुंदर, सुलक्षणी, बुद्धिमान आणि स्वाभिमानी वृत्तीरूप कायेस घेऊन, अर्जुन घरी परतला. घरी आल्यावर अर्जुनाने आपली आई कुंती हिला सांगितले, "आई, मी एक वस्तू जिंकून आणली आहे.” कुंतीने अर्जुनाला सांगितले की, "ती वस्तू पाचजणांत वाटून घ्या.” कुंतीच्या इच्छेनुसार द्रौपदी पाच पांडवांची धर्मपत्नी बनणार होती; द्रौपदी एका पांडवापाशी अडीच महिने राहील, असे ठरले. त्याचवेळी अन्य पांडवांनी त्यांचा एकांतभग करू नये. पाच पतींजवळ राहूनसुद्धा ती पूर्ण पतिव्रता होती. द्रौपदीच्या पंचपतित्वाची कथा पाहून काहीजण आपली बुद्धी चालवून आपल्या पूर्वजांविषयी चुकीच्या कल्पना फैलावण्याचा प्रयत्न करतात की, द्रौपदीच्या वेळी एका स्त्रीने अनेक पती करण्याची प्रथाच होती! हे जर खरे असेल, तर स्वतः द्रौपदीची आई आणि भावजईचे किती पती दाखविले गेले आहेत? काय महाभारतात बहुपतित्वाची उदाहरणे अन्यत्र सापडतात? जर असे नसेल, तर अशा आमच्या कथित विद्वानांना आमच्या पूर्वजांवर असे लांछनास्पद आरोप करण्याचा काहीही अधिकार नाही.
हो, त्यानंतरच्या काळात बहुपतित्वाची प्रथा भारताच्या केवळ एकाच प्रदेशात राहिली आणि आजही ती आहे, तो प्रदेश आहे लडाख! लडाखमध्ये बहुसंख्य बौद्ध आहेत, जे महाभारत काळापूर्वीपासूनच बौद्ध आहेत. त्यामुळे ते महाभारताची प्रथा पाळत आहेत. पण, अशी प्रथा निर्माण होण्याचे कारण काही अन्य आहे. लडाखमध्ये अन्नधान्य कमी उगवते. एवढ्या उंचीवर प्राणवायूच्या कमतरतेमुळे जीवन कठीण आहे. यासाठी त्या काळच्या बौद्ध विचारवंतांनी त्यांच्यासाठी एक नियम घालून दिला होता. एका परिवारात जर अधिक भाऊ असतील, तर त्यांच्यामधील सर्वांत मोठा भाऊ असेल, त्यानेच एका स्त्रीशी विवाह करायचा आणि दुसर्या धाकट्या भावांनी त्यांच्या मोठ्या भावजईशी पत्नीसारखा शरीरसंबंध ठेवावयाचा. या सामाजिक रितीमुळे लडाखमध्ये लोकसंख्येवर पूर्ण नियंत्रण राहिले आणि त्यामुळे इतया उंचीवरही ते सुखाने राहू शकले; परंतु इस्लाम धर्माचा तेथे प्रचार झाला आणि मुल्ला-मौलवींनी ती बौद्ध रिती मानली नाही. त्याचा परिणाम, आज लडाखवासीयांसमोर अन्नधान्याची जटिल समस्या उभी राहण्यात झाला आहे. लडाख सोडून भारताच्या कोणत्याही प्रदेशात, बहुपतित्वाची सामाजिक प्रथा नाही. यासाठी या द्रौपदीच्या कथेमध्ये व्यासांचे अध्यात्मस्वरूप असले पाहिजे. पंचप्राणांची काया वृत्ती द्रौपदी आहे, जी साधकाला द्रुतगतीने उच्च अध्यात्मपदाला नेते.
द्रौपदी वस्त्रहरण
भारतात सर्वत्र द्रौपदी वस्त्रहरणाची कथा सर्वांनाच ठावूक आहे. संतांनी या कथेचा आपल्या काव्यात भरपूर उपयोग केला आहे. मीराबाई म्हणते, "द्रौपदी की लाज राखी तुम बढायो चीर| हरी! तुम हरो जन की भीर॥” सूरदास म्हणतात, "लज्जा मोरी राखो श्याम हरी| किनी कठिन दुःखासन मोसे गही केशों पकरी॥” या कथेचा खरा आशय संत कबीरांना ठावूक होता. त्यांनी आपल्या दोह्यांमध्ये द्रौपदी आणि राधेचा खरा ‘व्यास आशय’ घेऊनच, आपली काव्यरचना केली आहे. सामान्य व्यक्तींच्या शरीरात एक प्राकृतिक ‘धारा’ असते. तिला आपल्या कठीण साधनेने जो साधक बरोबर उलटी करून ‘राधा’ म्हणजेच आनंदमयी बनवितो, ज्याला कबीर ‘राधा’ म्हणतात, जी भगवान कृष्णाला परस्त्री असूनही अतिशय प्रिय होती. साधकाच्या शरीरात जन्मतःच ज्या शक्तिधारा (quality particle arrangement) असतात, त्यांना योगशास्त्रात ‘कुंडलिनी’ असे म्हणतात. त्या प्रखर साधना केल्यावर हळूहळू बदलून उलट होतात, ज्याला वेदव्यास ‘राधा’ अवस्था म्हणतात. साधकाचा विवाह आपल्या जन्मतः प्राप्त प्राकृतिक कायारचनेशी होत असतो. साधना केल्यावर ही प्राकृतिक कायारचना म्हणजेच ‘धारा’ बदलून, साधनेत ती अति आनंददायक म्हणजेच ‘राधा’ बनते. ही काया आता साधकास परकी वाटते, कारण ही काया जन्मतः प्राप्त अशा कायारचनेपेक्षा अलग असते. म्हणून ‘राधा’ एक परस्त्री दाखविली आहे, जिच्यावर भगवान कृष्ण अत्यंत प्रेम करतात.
- योगिराज हरकरे