मौनाच्या गाभार्‍यातील ईश्वरी साद

    07-May-2026
Total Views |
Rabindranath Tagore Jayanti
 
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे नाव ज्ञात नाही, असा माणूस विरळच! जागतिक पातळीवर त्यांच्या तत्वज्ञानाची आणि काव्याची मोहिनी आजही आहे. मात्र, त्यांच्या काव्यातील अध्यात्मही तितकेच गुढ आहे. उद्या रवींद्रनाथ टागोरांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या अध्यात्मचिंतनाचा घेतलेला मागोवा...
 
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे नाव उच्चारले की, आपल्या मनात एका क्षणात एक भव्य प्रतिमा उभी राहते. ‘नोबेल’विजेते, विचारवंत, ‘गीतांजली’चे महाकवी, ‘शांतिनिकेतन’चे स्वप्नवेडे संस्थापक आणि राष्ट्रगीताचे रचनाकार! त्यांचा हा परिचय जरी खरा असला, तरी टागोरांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अत्यंत खोल, आतला पदर सामान्य वाचकांपर्यंत क्वचितच पोहोचतो; तो म्हणजे, त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान. टागोर हे केवळ शब्दांचे जादूगार नव्हते, तर ते खर्‍या अर्थाने एक साधक होते. जगणे, अनुभवणे, लिहिणे आणि ईश्वराशी अखंड संवाद साधणे, या चारही गोष्टींचा त्यांनी आपल्या आयुष्यात एक एकसंध गोफ विणला होता. टागोरांचे अध्यात्म कोणत्याही धर्मस्थळांच्या चार भिंतींत किंवा कर्मकांडांच्या चौकटीत, कधीच बंदिस्त झाले नाही. उपनिषदांमधील अद्वैत, वैष्णव भक्तिकाव्यातील लडिवाळपणा आणि बंगालच्या ‘बाउल’ गायकांची गूढ गाणी या सर्वांतूनच, त्यांच्या अध्यात्माची जडणघडण झाली. मात्र, त्यावर त्यांच्या स्वतःच्या निखळ अनुभवाचाही ठसा उमटला होताच. त्यांच्या मते, ईश्वर केवळ मूर्तीत नाही; तो राबणार्‍या शेतकर्‍याच्या नांगरणीत आहे, दगडफोड्याच्या घामात आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखातही उभा आहे. ईश्वराला भेटायचे असेल, तर संसारातून पळ काढण्याची गरज नाही, याच निसर्गात त्याला अनुभवता येते.
 
यातूनच त्यांच्या तत्त्वज्ञानातील सर्वांत तरल जाणीव आकाराला आली, की हाच अफाट ईश्वर माणसाच्या अंतरात्म्यातही विराजमान आहे. टागोरांनी त्याला ‘जीवन देवता’ म्हटले. तो आकाशातून शिक्षा देणारा कठोर परमेश्वर नाही; तर तो सखा आहे, प्रत्येक श्वासातला प्राण आहे. बाहेरचा आणि आतला ईश्वर एकच असून, ही अनुभूतीच टागोरांच्या साहित्याचा मुख्य पाया ठरली आहे.
पण मग या ‘जीवन देवते’शी संवाद कसा साधायचा? शब्दांनी? प्रार्थनांनी की पूजेने? यावरचे टागोरांचे उत्तर आपल्याला अंतर्मुख करते. ते सांगतात, ईश्वराशी संवादाचे माध्यम शब्द नाही, तर ‘मौन’ आहे. येथेच त्यांच्या ‘गीतांजली’तील १९वे गीत समोर येते. जेव्हा शब्दांच्या मर्यादा संपतात, तेव्हाच हे गीत सुरू होते:
 
मौन
तुम न बोलोगे, सजन,
के तब मैं भी न बोलूँगी, सजन|
मैं तुम्हारा मौन भर लूँगी हृदय में,
और सह लूँगी, सजन|
जागती है तारकों में रात, जैसे सिर झुकाए,
मैं तुम्हारी राह देखूँगी, कि चुप माथा नवाए|
वो सवेरा आएगा, आ जाएगा ही;
रात बीतेगी, अँधेरा जाएगा ही|
तब तक की वो वाणी तुम्हारी...
तब तक की वो वाणी तुम्हारी,
चीर अम्बर के किनारी,
अमित स्वर्णिम रेखियों में
फूट बरसेगी, बहेगी|
वे तुम्हारे बोल
मेरे पंछियों की चहक में तब उड़ चलेंगे,
वे तुम्हारे गीत
मेरे कुंज-कुसुमों पर भी गुंजन भर चलेंगे|
तुम न बोलो, सजन,
मैं तुम्हारा मौन भर लूँगी हृदय में
और सह लूँगी, सजन...
भर लूँगी हृदय में, मैं तुम्हारा मौन...
तुम्हारा मौन... मौन...
 
वरवर वाचले, तर हे एका प्रेयसीचे विरहगीत वाटेल. पण, टागोरांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात इथला ‘सजन’ म्हणजे परमात्मा, आणि अबोल ‘मी’ म्हणजेच जीवात्मा आहे. टागोरांच्या मते, हे ‘मौन’ म्हणजे कोणतीही रिक्तता किंवा पोकळी नाही, तर ती ईश्वराशी होणार्‍या संवादाची परमोच्च अवस्था आहे.
 
आपण साधारणपणे मौनाला संवादाचा अभाव मानतो. पण टागोर हळूवारपणे सांगतात की, ईश्वराचे मौन हे शून्य नाही, तर तो एक परिपूर्ण ध्वनी आहे. ‘जागती है तारकों में रात, जैसे सिर झुकाए...’ ही अथांग रात्र मुकी नाही; ती धैर्याची आणि एका निबीड प्रतीक्षेची भाषा बोलत आहे. रात्रीचे हे ‘सिर झुकाए’ असणे, म्हणजे निसर्गाचे ईश्वरासमोर नतमस्तक होणे. म्हणूनच जीवात्मा या मौनाला केवळ मुकाट्याने सहन करत नाही, तर त्यात ईश्वराचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो.
 
आणि ही प्रतीक्षा व्यर्थ जात नाही. अंधार हे अज्ञान आणि मौन हा साधनेचा काळ आहे. जेव्हा साधना पूर्ण होते, तेव्हा एक आश्वासक पहाट उगवते, ‘वो सवेरा आएगा, आ जाएगा ही|’ प्रभात हा आत्मसाक्षात्काराचा क्षण आहे; जेव्हा ईश्वराची वाणी आकाशाच्या सीमा भेदून सोनेरी प्रकाशासारखी बरसते, पक्ष्यांच्या किलबिलाटात आणि फुलांच्या सुगंधात दरवळते. ईश्वर बोलतोच, पण मानवी शब्दांत नाही; तर निसर्गाच्या अथांग भाषेत...
 
टागोरांच्या या मौनाचा अत्यंत तरल वेध, पुण्याच्या ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरू रोहिणी भाटे यांनी आपल्या कलेतून घेतला. १९९० मध्ये त्यांनी या कवितेवर केलेली नृत्यसंरचना म्हणजेच, या तत्त्वज्ञानाचा जिवंत अविष्कार होती. रोहिणीताईंनी ‘मौन’ म्हणजे केवळ ‘शांतता’ नव्हे, तर ‘परमात्म्याचा आवाज’ असा समर्पक अन्वयार्थ लावून, आत्मा-परमात्म्याचे निःशब्द नाते भावमुद्रांतून अत्यंत संयतपणे व्यक्त केले.
 
आजच्या कोलाहलाच्या काळात, जिथे मौनाला ‘मेडिटेशन अ‍ॅप’मध्ये पॅकेज करून विकले जाते, तिथे टागोरांचा हा विचार आपल्याला मुळापासून हलवतो. मौन हे बाहेरून विकत घेऊन उपभोगायचे साधन नसून, ते आतून अनुभवायचे असते, हृदयात साठवायचे असते आणि त्यातूनच ईश्वरी साद ऐकायची असते.
 
‘भर लूँगी हृदय में, मैं तुम्हारा मौन... तुम्हारा मौन... मौन...’ या ओळींमध्ये टागोरांची कविता, स्वतःच एका अथांग मौनात विलीन होते. तिथे शब्द संपतात, पण अर्थाचे वलय संपत नाही. उलट, तिथेच टागोरांचे खरे तत्त्वज्ञान सुरू होते; कारण जिथे आपले शब्द संपतात, नेमका तिथेच ईश्वर बोलू लागतो!
 
आपल्या काव्यातून अध्यात्माचा असा सरेख अर्थ उलगडणार्‍या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची उद्या जयंती. मानवी जीवनाचा आणि निसर्गाचा एवढा सखोल वेध घेणार्‍या आणि ‘मौना’तून ईश्वराची साद ऐकणार्‍या, त्यांच्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
 
 
- आसावरी पाटणकर