नितीशकुमारांचे १० खास नेते पुन्हा कॅबिनेटमध्ये, दोन नावे अनपेक्षित! सम्राट कॅबिनेटमध्ये एक मुस्लीम मंत्री

    07-May-2026
Total Views |

CMO Bihar

पाटणा Nitish Kumar cabinet expansion Bihar : मुख्यमंत्री सम्राट चौधरींच्या मंत्रीमंडळ विस्तारात एकूण १० माजी मंत्र्यांना पुन्हा स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे हे १० मंत्री नितीश कुमारांच्या मर्जीतील मानले जातात. याशिवाय निशांत कुमार, शैलेश कुमार उर्फ बुलो मंडल आणि श्वेता गुप्ता या तीन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
यापूर्वीही मंत्री असणारे चेहरे कोणते?
१. श्रवण कुमार – जदयू विधायक दलाचे नेते श्रवण कुमार नालंदा येथून विधानसभेवर निवडून आले. त्यांनी सलग आठव्यांदा आमदारकी जिंकली. नितीश कुमारांच्या सरकारमध्ये ते ग्रामीण विकास, संसदीय कार्य आणि परिवान विभागाचे मंत्री होते. त्यांचे वय ६६ वर्षे आहे.


२. लेशी सिंह – जयदूच्या कोट्यातून मंत्रीपदी वर्णी लागलेले लेशी सिंह पूर्णिमा जिल्ह्यातील धमदाहा विधानसभा क्षेत्रातून निवडून येतात. कित्येकदा निवडणूक जिंकून या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गेल्या सरकारमध्ये त्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री होत्या.
३. दामोदर रावत – दामोदर रावत नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये माजी मंत्री होते. झाझा विधानसभेतून ते निवडून आले आहेत. इतिहासात एमएचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे. त्यांचे वय ६७ इतके असून ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

४. अशोक चौधरी – अशोक चौधरींचे वडिल महावीर चौधरी काँग्रेसच्या सरकारचे मंत्री होते. १९६८मध्ये जन्म. मगध विद्यापीठातून त्यांनी पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. ते पाटणास्थित ए.एन. महाविद्यालायात ते प्राध्यापक होते.

५. भगवान सिंह कुशवाहा – भोजपूरच्या जगदीशपूर विधानसभा क्षेत्रातून ते आमदार झाले आहेत. यापूर्वी नितिश कुमार सरकारमध्ये ते ग्रामविकास मंत्री होते. नितीश कुमारांनी त्यांना जदयूमध्ये राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी सुपूर्द केली होती. त्यांची कुशवाहा समाजातील नेतृत्व म्हणून पकड चांगली आहे. समता पार्टीत असतानाही त्यांनी नितीश कुमारांना मदत केली होती.


६. मदन सहनी – जदयू नेता मदन सहनी हे मागासवर्गीय समाजातून येतात. त्यांचा जन्मा १९७१मध्ये दरभंगा जिल्ह्यातील खराजपूर येथे झाला होता. राजकारणाच्या सुरवातीच्या काळात ते दरभंगा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. २०१५मध्ये ते सर्वात आधी आमदार झाले. त्यांनी नितीश कुमारांच्या सरकारमध्ये विविध विभागात मंत्रीपद भूषवले आहे. बहादुरपुर विधानसभेतून ते आमदार आहेत.


७. रत्नेश सदा - रत्नेश सदा यापूर्वी नितीश कुमारांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी सलग सहरसा जिल्ह्यात सोनबरसा सारख्या (सुरक्षित) मतदार संघातून आमदारकी लढवली. वर्ष २०२३मध्ये जेव्हा संतोष सुमन यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांच्या जागी रत्नेश सदा मंत्री बनले होते.




८. शीला कुमारी - सम्राट चौधरी यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदी शपथ घेणाऱ्या शीला कुमारी उर्फ शीला मंडल यांनी नीतीश कुमार यांच्या सरकारमध्ये परिवहन मंत्री राहिल्या होत्या. त्यांचे सासरे धनिक लाल मंडल बिहार विधानसभेचे अध्यक्ष होते. २०२०मध्ये त्या राजकारणात आल्या. मधुबनीच्या फुलपरास विधानसभा मतदार संघातून त्या आमदार म्हणून निवडून येतात.



९. सुनील कुमार – निवृत्त आयपीएस सुनील कुमार आधीच्या नितीश कुमार सरकारमध्येही मंत्री होते. दिल्लीतील सेंट स्टीफेंस कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते. २०२०मध्ये ते जदयूत प्रवेश करुन राजकारणात आले. त्यांनी गोपालगंजच्या भोरे या (सुरक्षित) विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आणि निवडूनही आले.



१०. जमा खां – बहुजन समाजवादी पक्षातर्फे आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या जमा खाँ यांनी २०२०मध्ये पहिल्यांदा आमदारकी लढवली. ते निवडूनही आले. आता ते कैमूरतील चैनपुर विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांनी नितीशबाबूंच्या सरकारमध्ये अल्पसंख्यक कल्याण मंत्री विभागाची धुरा सांभाळली होती.