पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींचा पराभव अन् आता संजय राऊतांना जनतेमध्ये फिरण्याची आठवण — नवनाथ बन

    07-May-2026
Total Views |
Navnath Ban/ Sanjay Raut
 
मुंबई : (Navnath Ban) भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवार दि.७ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला."पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पराभवानंतर संजय राऊत अचानक झोपेतून जागे झाल्यासारखे नाशिक दौऱ्यावर निघाले आहेत. अनेक वर्षे मुंबईत बसून राजकारण करणाऱ्या राऊतांना आता जनतेमध्ये फिरण्याची वेळ आली आहे. नाशिक, जळगाव, धुळे येथे कितीही दौरे केले तरी हिंदुत्वाची साथ सोडल्यामुळे जनता उबाठा गटाच्या पाठीशी उभी राहणार नाही."असे बन म्हणाले.
 
कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या धर्मध्वजावरून नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. "भगवा ध्वज पाहून राऊतांना त्रास होतो, पण हिरवा ध्वज फडकल्यावर आनंद होतो. हा धर्मध्वज हिंदू संस्कृतीचा आणि सनातन परंपरेचा प्रतीक असून उबाठा गटाने हिंदुत्वाशी बेइमानी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सोडून दिल्यामुळेच शिवसेनेची ही अवस्था झाली आहे." असे बन म्हणाले.
 
"भाजप ठेकेदार नसून हिंदुत्वाची सेवा करणारा पक्ष आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठेसाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते, मात्र मतांच्या राजकारणासाठी त्यांनी जाणे टाळले. हिंदुत्व सोडून मतांच्या लालसेने उबाठा गट चालत आहे."अशी टीकाही बन यांनी केली.(Navnath Ban)
 
" उद्योगपतींवर आरोप करताना त्यांच्याच कार्यक्रमांना उपस्थित राहून मविआतील सत्ताधाऱ्यांनी लाभ घेतले आहेत. मातोश्रीवर कोणासाठी रेड कार्पेट अंथरले जात होते याचे उत्तर जनतेला द्यावे."असा सवालही बन यांनी उपस्थित केला.(Navnath Ban)
" महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना प्रभू रामाचे नाव घेण्याचा अधिकार नाही. रावणाप्रमाणे अहंकार आणि दादागिरी करणाऱ्या महाविकास आघाडीचा पराभव जनता करेल. विधानसभा निवडणुकीत जनतेने उबाठा गटाला घरी बसवले." असेही बन यांनी स्पष्ट केले.(Navnath Ban)
 
 
"कुंभमेळ्यासाठीचा खर्च हिंदू बांधवांच्या सुरक्षेसाठी आणि व्यवस्थेसाठी होत आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या सुशोभीकरणावर खर्च चालतो, पण हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर खर्च झाला की विरोध होतो." असा आरोप बन यांनी केला.
 
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावरून नवनाथ बन यांनी ममता बॅनर्जी सरकारवर गंभीर आरोप केले. "भाजप नेत्यांच्या कार्यकर्त्यांवर आणि सहकाऱ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे तिथे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर बंगालमधील हिंसा आणि दादागिरी संपवली जाईल." असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना नवनाथ बन जोरदार प्रत्युत्तर देताना म्हणाले की," पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४० कोटी भारतीयांचे सेवक आहेत, पाकिस्तानचे गुलाम नाहीत. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईच्या वर्षपूर्तीवर विरोधक एक शब्दही बोलत नाहीत, यावरून त्यांची मानसिकता स्पष्ट होते."
 
"अनेक प्रकरणांत २४ तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशा संवेदनशील घटनांवर राजकारण न करता पीडितांच्या पाठीशी उभे राहावे." असे आवाहन बन यांनी विरोधकांना केले.(Navnath Ban)