इराण युद्धजन्य परिस्थितीतही हिजाब सक्तीच्या भूमिकेत!

हिजाब विरहीत महिलांवर इराणी मौलवींची टीका

    07-May-2026   
Total Views |
 Hijab Controversy
 
मुंबई : (Hijab Controversy) इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणी सरकार हिजाब सक्तीच्या अंमलबजावणीवर भर देताना दिसत आहे. अशातच इराणमधील एका मौलवीने महिलांबाबत केलेल्या तीव्र वक्तव्यामुळे सत्ताधारी व्यवस्थेमधील हिजाबविषयक मतभेद पुन्हा समोर आले आहेत. दुसरीकडे, सरकारी माध्यमे युद्धकाळात जनतेचा व्यापक पाठिंबा दर्शवण्यासाठी हिजाबविरहीत महिलांचे फोटो प्रचारात वापरत असल्याचे दिसत आहे.
 
इराणच्या उत्तरेकडील रश्त शहरातील शुक्रवार नमाजचे इमाम रसूल फलाही यांनी युद्ध सुरू झाल्यानंतर आयोजित सरकारी समर्थनाच्या सभेत भाषण करताना बिनहिजाबी महिलांवर कठोर टीका केली. त्यांनी या महिलांवर 'व्यवस्था आणि कुराणाविरोधात उभे राहण्याचा' आरोप केला. तसेच त्यांना 'अनैतिक आणि बेशरम' संबोधत त्यांच्या वडिलांनाही, पतींनाही आणि भावांनाही 'बेइज्जत' म्हटले.
 
हेही वाचा : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे शिष्टमंडळासमवेत मुंबईत आगमन
 
रूढीवादी वृत्तपत्र ‘फरारू’ने या विषयावर हिजाबविरहीत महिलांवर हल्ला का? या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध केला. या लेखात म्हटले आहे की, ‘स्वयंसेवी बलिदानी मुलींच्या’ परेड असो किंवा सैनिकांच्या समर्थनार्थ रात्री आयोजित सभा असोत, सरकारी कॅमेरे मुद्दाम हिजाब विरहीत महिलांना शोधतात, जेणेकरून राष्ट्राच्या समर्थनासाठी सर्व स्तरातील लोक एकत्र असल्याचे चित्र उभे करता येईल. एका बाजूला सरकारी प्रचारात या महिलांना स्थान दिले जाते, तर दुसऱ्या बाजूला मशिदींमधून त्यांच्याविरोधात कठोर भाषणे केली जात आहेत.
 
कट्टर हिजाब समर्थक, ज्यामध्ये फलाही यांच्यासारख्या मौलवींचा समावेश आहे, ते इराणी कायद्यानुसार हिजाब अनिवार्य असल्याचे सांगतात. ते अली खामेनेई यांच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देतात. खामेनेई यांनी हिजाब न पाळणे हे धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या निषिद्ध असल्याचे म्हटले होते.
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक