Thane Hindu Conference : ठाणे पूर्व नगरात हिंदू संमेलनाची यशस्वी नांदी!

समाजजागृतीला मिळाली नवी दिशा

    05-May-2026   
Total Views |
Thane Hindu Conference
 
ठाणे : (Thane Hindu Conference) ठाणे पूर्व नगरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेले ‘हिंदू संमेलन’ उत्साहात आणि दिमाखात पार पडले. ठाणे येथील जिजामाता वस्तीमधील शिवनेरी मैदान, अष्टविनायक चौक येथे ३ मे रोजी सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे संमेलनाला विशेष रंगत आली.
 
कार्यक्रमाची सुरुवात निहारिका फडके आणि अरचित माळी यांच्या ‘जयोस्तुते’ या गीताच्या बासरी वादनाने आणि सांघिक गीताने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोरंजन क्षेत्रातील सुप्रसिद्ध कलाकार रागिणी सामंत होत्या, तर प्रमुख वक्त्या म्हणून ठाण्यातील कीर्तनकार ह. भ. प. शिवानी नेमावरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृता फडके यांनी केले.(Thane Hindu Conference)
 
गेल्या १५ वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या संमेलन प्रमुख संगीता जोशी यांनी आपल्या उद्बोधनात संमेलनामागील उद्देश स्पष्ट केला. नागरिकांनी आपली कर्तव्ये ओळखून देशप्रेमाची भावना जागृत ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. पर्यावरणपूरक उपक्रमांचा भाग म्हणून कापडाचे पुष्पगुच्छ, पर्यावरण दिनदर्शिका आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.(Thane Hindu Conference)
 
 
कार्यक्रमात विविध सांस्कृतिक आणि शारीरिक सादरीकरणांची रेलचेल पाहायला मिळाली. गणेश वंदना, प्रार्थना, महाराष्ट्र गीत, ‘गोफ’ हा पारंपरिक खेळ, ‘महाराष्ट्राची परंपरा’ दर्शविणारे कथ्थक नृत्य, भारूड, पोवाडा तसेच दंड प्रयोग आणि दंड युद्ध यांसारख्या सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. स्थानिक कलाकारांनी या कार्यक्रमात आपली कला सादर करत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला.(Thane Hindu Conference)
 
अध्यक्षीय भाषणात रागिणी सामंत यांनी 'मला हिंदू असण्याचा अभिमान आहे आणि प्रत्येकाने तो अभिमान व्यक्त करायला हवा', असे सांगत उपस्थितांना आत्मचिंतनाचे आवाहन केले. अशा संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रमुख वक्त्या शिवानीताई नेमावरकर यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून उपस्थितांना खिळवून ठेवले. राम-कृष्ण परंपरा आणि संत-विचारवंतांच्या आदर्शांचा उल्लेख करत ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना जागृत ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. हिंदू समाज हा विश्वशांती आणि विश्वकल्याणासाठी कार्य करणारा असून, गरज पडल्यास राष्ट्ररक्षणासाठी सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Thane Hindu Conference)
 
सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि पर्यावरण दिनदर्शिका देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी रा. स्व. संघाचे ठाणे पूर्व नगर कार्यवाह आदित्य फडके यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी ‘पंच परिवर्तन’मधील स्व-बोध, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य आणि पर्यावरण या पाच मुद्द्यांचा उल्लेख करत, त्यातील एखादा जरी मुद्दा आचरणात आणला तरी संमेलन यशस्वी ठरेल, असे मत व्यक्त केले.(Thane Hindu Conference)
 
या संमेलनात स्थानिक स्त्री-पुरुष, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अखेरीस ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.(Thane Hindu Conference)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक