Pune Crime Nasrapur Case : लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका; विधी आणि न्याय विभागाला मुख्यमंत्र्यांचे निर्देश
05-May-2026
Total Views |
मुंबई : (Pune Crime Nasrapur Case) पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. सर्वत्र आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना पॅरोल देऊ नका, असे निर्देश विधी व न्याय विभागाला मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिले.(Pune Crime Nasrapur Case)
"लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणातील ८० ते ९० टक्के आरोपी हे आधीच्याच गुन्ह्यात जामीन किंवा पॅरोलवर सुटलेले असतात. त्या काळात ते पुन्हा असेच गंभीर गुन्हे करतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी २०१४ ते २०१९ या काळात आपण मुख्यमंत्री असताना अशा गुन्हेगारांना पॅरोल न देण्याचा कायदा केला होता. काही काळ तो अस्तित्वातही होता. परंतू, नंतर न्यायालयाने तो रद्द केला. त्यामुळे आता पुन्हा नव्याने तसाच कठोर कायदा तयार करावा," असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला दिल्याचे समजते.(Pune Crime Nasrapur Case)
नसरापूरमधील (Nasrapur Incident) दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः पीडितेच्या वडिलांशी दोन वेळा संवाद साधला आहे.याविषयी माहिती देताना ते म्हणाले, "अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली जावी, अशी भावना सर्वांचीच असते. मात्र, लोकशाही कायद्याने चालते. त्यामुळे कायद्यात कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा होईल, यादृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) वेळेत दाखल करून हा खटला उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालवला जाईल. तसे लेखी आश्वासन पीडितेच्या कुटुंबालाही देण्यात आले आहे."(Pune Crime Nasrapur Case)
नेमकी घटना काय?
दि. १ मे रोजी भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर ६५ वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या घटनेचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटत असून त्या नराधमाला तात्काळ फाशी देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने तिच्या तोंडात पायात घालण्याचा मोजा कोंबल्याचे तसेच छातीवर ओरखडे आणि व्रण उमटले असल्याचे शवविच्छेदन करताना निदर्शनास आल्याची माहिती समोर आली आहे.(Pune Crime Nasrapur Case)