निदा खान अजूनही फरार

    05-May-2026
Total Views |
Nashik Corporate Crime Case
 
नाशिकमध्ये घडलेल्या ‘टीसीएस’ कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान अद्याप फरार असून, पोलीस प्रशासनाला तिला अटक करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेनंतर सुरुवातीला पोलिसांनी तपासाची गती वाढवल्याचे दिसून आले. विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले, संशयितांची धरपकड करत चौकशीदेखील करण्यात आली. तसेच आरोपीच्या हालचालींबाबत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, इतक्या दिवसांनंतरही मुख्य आरोपी सापडलेली नाही, ही बाब चिंताजनकच. आपण गर्भवती असल्याचे कारण पुढे करत निदा खान हिने जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, न्यायालयाने हा प्रयत्न हाणून पाडत तिला कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्याने तिची अटक क्रमप्राप्त आहे.
 
परंतु, तिच्यापर्यंत पोहोचण्यात आजच्या घडीपर्यंत तरी पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. ती आपला ठावठिकाणा बदलत पोलीस, तसेच ‘एसआयटी’ला गुंगारा देण्यात यशस्वी झाली आहे. यासाठी तिला बाहेरील काही व्यक्तींची मदत मिळत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. पोलिसांनी तांत्रिक साधनांचा वापर करून तिचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. एकीकडे मोठ्या कंपनीशी संबंधित घटना आणि दुसरीकडे आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याची शक्यता, यामुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाने अधिक जबाबदारीने आणि पारदर्शकपणे काम करणे गरजेचे आहे. तसेच समाजातील नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास ती पोलिसांपर्यंत पोहोचवणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नाशिकमधील ‘टीसीएस’ प्रकरण हे केवळ एक गुन्हेगारी प्रकरण नसून, कायदा अंमलबजावणी यंत्रणेच्या कार्यक्षमतेची कसोटी आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून न्याय मिळवून देणे, हे पोलीस प्रशासनासमोर सर्वांत मोठे आव्हान आहे.
 
कल्पना खरातला तरी शोधा!
 
एकीकडे हिंदू तरुणींचा मानसिक आणि शारीरिक छळ करून त्यांचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान फरार असताना, दुसरीकडे शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करून, त्यांची आर्थिक फसवणूक करून लुबाडणार्‍या भोंदूबाबा अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातदेखील पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाली आहे. शिर्डी येथील कथित जमीन व्यवहाराप्रकरणी पोलीस प्रशासन तिचा शोध घेत आहेत. परंतु, कल्पना खरात निदा खान प्रमाणेच फरार आहे. त्यामुळे पोलिसांच्या या दोन्ही प्रकरणांतील तपासावर संशय व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालत, या दोन्ही प्रकरणांचा तपास करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना खुली सूट दिली. वेगवान तपासासाठी विशेष तपास पथकाचीही नेमणूक केली. परंतु, कल्पना खरात जाळ्यात न सापडल्याने शिर्डी येथील जमीन व्यवहाराच्या तपासाला म्हणावा तसा वेग अजूनही आल्याचे दिसून येत नाही.
 
मधल्या काळात कल्पना खरातच्या वतीने तिच्या वकिलाने राहाता न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. परंतु, न्यायालयाने तो फेटाळला. यावेळी झालेल्या युक्तिवादादरम्यान, आपल्या पतीने गुन्हा केला असून, त्यात आपला सहभाग नसल्याचे तिने न्यायालयाला सांगत आपला गळा मोकळा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करून पाहिला. मात्र, न्यायालयाने पोलिसांना शरण येण्यावाचून गत्यंतर नसल्याचेच निकाल देताना सांगितले. तरीही, फरार कल्पना खरात अजूनही पोलिसांना शरण आलेली नाही. त्यामुळे तिच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव वाढला असून, या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी कल्पना खरातची अटक होणे अतिआवश्यक आहे. पण, पोलीस प्रशासन आणि ‘एसआयटी’ तिचा शोध घेण्यात सध्यातरी अपयशी ठरल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे. ही घटना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर असून, पोलिसांनी अधिक दक्षता आणि समन्वय साधून काम करणे आवश्यक आहे. आरोपीला लवकर अटक करून न्याय मिळवणे, हीच सध्याची सर्वांत मोठी गरज आहे.
 
- विराम गांगुर्डे