Mumbai Municipal Corporation : महापालिका रुग्णालयांच्या हाऊसकीपिंग टेंडरमध्ये ४५ कोटींचा घोटाळा; आमदार मिहीर कोटेचा यांचा खळबळजनक आरोप
स्थायी समितीच्या मंजुरीपूर्वीच कामगारांची नियुक्ती; सखोल चौकशीसाठी आयुक्तांना पत्र
05-May-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai Municipal Corporation) महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांतील हाऊसकीपिंग कंत्राटांमध्ये तब्बल ४५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. हे टेंडर प्रक्रिया अत्यंत संशयास्पद असून ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी कोटेचा यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून केली आहे. विशेष म्हणजे, उद्या (बुधवारी) हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे.(Mumbai Municipal Corporation)
आमदार कोटेचा यांनी पत्रात नमूद केले की, मेसर्स ऑरा एफएमएस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने २६६ कोटी रुपयांच्या कंत्राटासाठी अंदाजित खर्चापेक्षा २० टक्के कमी दराने बोली लावली आहे. या निविदेत कामगारांची ग्रॅच्युइटी, सुरक्षा साहित्य आणि दैनंदिन स्वच्छता साहित्यासाठी (उदा. फिनाईल, साबण, झाडू) 'शून्य' दर कोट केला आहे. "८०० बाथरुम्स आणि ४१ लाख चौरस फूट क्षेत्राची स्वच्छता ही कंपनी कोणत्याही साहित्याशिवाय आणि नफ्याशिवाय कशी करणार? ही कंपनी म्हणजे जणू जगातील मोठी समाजसेवक संस्था आहे," असा टोला कोटेचा यांनी लगावला.(Mumbai Municipal Corporation)
हा घोटाळा केवळ तांत्रिक नसून आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाल्याचा दावा कोटेचा यांनी केला आहे. ऑरा एफएमएस ही केवळ एक 'फ्रंट' कंपनी असून, पडद्यामागून सर्व सूत्रे वादग्रस्त कंत्राटदार मेसर्स हायवे कंस्ट्रक्शन हलवत असल्याचा आरोप त्यांनी केला. निविदा प्रक्रियेत विशिष्ट कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी फेरफार करण्यात आल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.(Mumbai Municipal Corporation)
स्थायी समितीची अद्याप मंजुरी मिळालेली नसतानाही कंत्राटदाराने केईएम रुग्णालयात शेकडो कामगार कामावर रुजू केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे कंत्राटदाराने हा मनमानी कारभार सुरू केल्याचा संताप कोटेचा यांनी व्यक्त केला. कामगारांच्या सामाजिक सुरक्षेच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.(Mumbai Municipal Corporation)