राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; आदिवासी शिक्षणाला चालना, नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम मंजूर

    05-May-2026
Total Views |
Maharashtra Cabinet Decision)
 
मुंबई : (Maharashtra Cabinet Decision) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण क्षेत्राला चालना देणारे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण, तंत्रशिक्षणाची उपलब्धता आणि अभियांत्रिकी शिक्षणाच्या विस्तारावर भर देण्यात आला आहे.
 
आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढकरण्यास मंजुरी देण्यात आली. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ व यासाठी आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या निर्णयामुळे डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतीमान होणार आहे. 
 
हेही वाचा : Railway Land Illegal Construction Mumbai : वांद्रे पूर्वेतील रेल्वेस्थानक परिसरातील झोपड्यावर कारवाई कायम
 
सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून पदवी स्तरावरील तीन नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. एआय अँड मशीन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखांचा समावेश असून प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असणार आहे. या निर्णयामुळे सोलापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
 
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालवले जाणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महाविद्यालयाचे सक्षमीकरण होऊन अद्ययावत सुविधा उपलब्ध होतील आणि परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळेल.