Maharashtra Cabinet Decision : दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण होणार गतीमान

१९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिकमध्ये श्रेणीवाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

    05-May-2026   
Total Views |
TRIBAL
 
मुंबई : (Maharashtra Cabinet Decision) आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि १९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक – कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतीमान होणार आहे.(Maharashtra Cabinet Decision)
 
या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार आहे. या आश्रमशाळांची श्रेणीवाढ केल्याने आवश्यक अशा पदनिर्मितीस आणि त्याकरिता खर्चाच्या तरतूदीस मंजुरी देण्यात आली. राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी सन १९७२-७३ पासून 'आश्रमशाळा समूह' योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सध्या स्वयंसेवी संस्थाकडून ५५६ अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये सुमारे २ लाख ६१ हजार ८३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आश्रमशाळा दुर्गम, अतिदुर्गम, डोंगराळ किंवा नक्षलग्रस्त अशा भागात आहेत. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आदिवासी विद्यार्थी तालुका किंवा जिल्हयाच्या ठिकाणी जाऊन पुढील शिक्षण घेण्यास उत्सुक नसल्यामुळे गळतीच्या प्रमाणात वाढ होऊन विद्यार्थी माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहतात. या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच निवासी शिक्षण उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे.(Maharashtra Cabinet Decision)
 
 
 त्यानुसार राज्यातील ५ प्राथमिक आश्रमशाळांची श्रेणीवाढ करुन तिथे ८ वी ते दहावीचे वर्ग सुरु करण्यास तसेच माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये १८ ठिकाणी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व एका ठिकाणी केवळ ११ वी व १२ वी कला अशा १९ अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या माध्यमिक आश्रमशाळांमध्ये श्रेणीवाढ केल्याने आवश्यक शिक्षकांची ३० नियमित पदे व २५ बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची २५ पदे यांच्या पदनिर्मितीस तसेच १९ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी आवश्यक १४८ शिक्षकांच्या नियमित पदनिर्मितीस आणि या सर्व पदांच्या आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली.(Maharashtra Cabinet Decision)
 
सोलापुरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
 
सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्लाय सुरु करण्यास आणि त्यासाठी सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे नाव यापुढे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी), सोलापूर असे करण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली.(Maharashtra Cabinet Decision)
 
श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित
 
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता हे महाविद्यालय श्री. तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर, या नावाने ओळखले जाईल. या निर्णयामुळे महाविद्यालयाचे सक्षमीकरण होऊन या परिसरात अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध होण्याने या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण मिळणे सुलभ होणार आहे.(Maharashtra Cabinet Decision)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....