भारतामध्ये सध्या विविध कारणांमुळे मानवी जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. या बदलाचे परिणाम आपल्याला आरोग्यावरही दिसून येतात. याच बदलत्या जीवनशैलीमुळे यकृताचे आजार देशात झपाट्याने वाढताना दिसत आहेत. विशेषतः ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर’ हा आजार तर आता मोठ्या प्रमाणावर आढळू लागला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना आजाराची जाणीव तेव्हाच होते, जेव्हा यकृताचे नुकसान होण्यास आधीच सुरुवात झालेली असते.
कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी या आजारात नेमके काय होते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील यकृत हे अन्नपचनासाठी अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. जेव्हा आपण जास्त तेलकट, गोड किंवा प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ खातो आणि शारीरिक हालचाल कमी करतो, तेव्हा यकृतामध्ये हळूहळू चरबी साचू लागते. सुरुवातीला ही अवस्था साधी वाटली, तरी ती दुर्लक्षित राहिल्यास पुढे ‘नॉन-अल्कोहोलिक स्टिअटोहेपेटायटिस’मध्ये बदलते. या टप्प्यावर यकृतामध्ये सूज येते आणि यकृतातील पेशींना इजा होऊ लागते. पुढे याचे गांभीर्य वाढत जाऊन, ‘फायब्रॉसिस’ अर्थात यकृत कडक होणे आणि शेवटी ‘लिव्हर सिरोसिस’ म्हणजे यकृताचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. अनेकदा कर्करोगाचा धोकादेखील उद्भवतो.
या आजाराची कारणे केवळ लठ्ठपणापुरतीच मर्यादित नाहीत. मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेली ‘कोलेस्टेरॉल’ पातळी आणि ‘इन्सुलिन रेसिस्टन्स’ हे महत्त्वाचे घटकही त्यामागे आहेत. विशेष म्हणजे, भारतात ‘लीन फॅटी लिव्हर’ ही समस्यादेखील अलीकडे वाढलेली दिसते. यामध्ये व्यक्ती दिसायला जरी बारीक असली, तरी तिच्या यकृतामध्ये मोठ्या प्रमाणावर चरबी साचते. लक्षणांच्या बाबतीत हा आजार अधिकच धोकादायक असून, यामध्ये सुरुवातीला काहीच जाणवत नाही. परिणामी, त्याचा धोका अधिकच वाढतो. या आजारात पुढे थकवा, भूक मंदावणे, पोटाच्या उजव्या बाजूला जडपणा, तसेच काविळीसारखी लक्षणे असतात. हा आजार अधिक वाढल्यास पोट फुगणे, पायांना सूज येणे, रक्तस्राव होणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. या अवस्थेत उपचार अधिक गुंतागुंतीचे आणि खर्चिक ठरतात.
या आजारावर अलीकडे औषधांचा वापर वाढला आहे. ही औषधे वजन कमी करण्यास आणि शरीरातील साखरेचे नियंत्रण सुधारण्यास मदत करतात. मात्र, ही औषधेच या आजारावरील एकमेव उपाय नाहीत, कारण यकृताचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असल्यास, त्याला पूर्णपणे बरे करणे अजूनही शक्य झालेले नाही. म्हणूनच, या आजारावर सर्वांत प्रभावी उपाय म्हणजे जीवनशैलीत बदल होय. संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि साखर व चरबीचे प्रमाण कमी ठेवल्यामुळे, यकृताचे आरोग्य सुधारता येते. याशिवाय, नियमित रक्ततपासणी, सोनोग्राफी यांच्या मदतीने आजार लवकर ओळखता येतो आणि पुढील धोकाही टाळता येतो. एकंदरीत, यकृताचे आजार हे शरीरात शांतपणे वाढणारे असून, त्यांचे परिणाम अत्यंत गंभीर असतात. त्यामुळे काही त्रास नाही, या समजुतीत राहण्याऐवजी, योग्य वेळी तपासणी आणि जीवनशैलीत सुधारणा करणे, हेच दीर्घकालीन आरोग्यासाठी आवश्यक आहे.