भारताच्या प्राचीन आयुर्वेद वारशाचे महत्त्व सांगणारे आणि त्यासाठी परिश्रमपूर्वक संशोधन करणारे, कार्य करणारे ‘आयुर्वेदाचार्य’ डॉ. अश्विन सावंत. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
विज्ञान की पुराण’ या विषयावर वाद-चर्चा करण्यासाठी ‘आयुर्वेदाचार्य’ डॉ. अश्विन सावंत यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. अश्विन यांनी ‘प्राचीन भारतातील प्रगत शस्त्रक्रियाशास्त्र’ यावर विधान करताच, समोरचे सहभागी वक्ते आणि काही श्रोते यांनी, “भारतात कधीच अशाप्रकारचे शास्त्र प्रगत नव्हते,” म्हणत गोंधळ घातला. त्यावेळी डॉ. अश्विन म्हणाले, “तुम्ही महर्षी सुश्रुतांचे ‘सुश्रुत संहिता’ वाचले का? किंवा ‘आयुर्वेदा’वरचे प्राचीन पुस्तक वाचले का? जर वाचलेच नाही, तर तुम्ही त्यासंदर्भात माझ्याशी चर्चा कोणत्या आधारावर करत आहात?” त्यांचा प्रश्न ऐकून सगळेच गपगार झाले.
यामागची पार्श्वभूमी अशी २०१५ मध्ये ‘१०२ व्या इंडियन सायन्स काँग्रेस’चे अधिवेशन होते. त्यामध्ये वेदाचार्य डॉ. अश्विन यांनी ‘प्राचीन भारतातील शस्त्रक्रिया’ या विषयावर सादरीकरण केले. इतकेच नाही, तर महर्षी सुश्रुत यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी १२० यंत्रे/शस्त्रे निर्माण केली होती. त्या अधिवेशनात डॉ. अश्विन यांनी त्यातील काही साधने स्वत: बनवून प्रदर्शनामध्ये ठेवली होती. ते त्या अधिवेशनात म्हणाले की, “महर्षी सुश्रुत हे शस्त्रक्रियेचे जनक आहेत, ‘फादर ऑफ सर्जरी’ आहेत.” त्यावेळी काहींनी त्यांचे जोरदार समर्थन केले, तर काहींनी त्यांचे विधान खोटे आहे. भगव्या विचारसरणीच्या लोकांसारखे आहे, असे म्हटले. पण, डॉ. अश्विन त्यांच्या मतावर ठाम राहिले. आज त्यांच्या त्या ठाम विधानाला मूर्त स्वरूप आले आहे. दि. १९ जून २०२६ रोजी ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन, एडिनबर्ग’ येथे महर्षी सुश्रुत यांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा म्हणजे भारताच्या सक्षम आणि श्रीमंत अशा आयुर्वेदाचा सन्मान आहे.
डॉ. अश्विन यांनी ‘प्राचीन भारतातील शौच (स्वच्छता)व्यवस्था’ यावर ‘पीएचडी’ केली आहे. ‘मधुमेहाविरुद्ध आपण’ हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध. येणाऱ्या काळात सहा ऋतूंवर आधारित ‘ऋतुसंहिता’ पुस्तक प्रसिद्ध होणार आहे. सहा ऋतूंबद्दल प्राचीन साहित्यातील माहिती, तसेच आयुर्वेद ते आधुनिक शास्त्र, सहा ऋतूंमध्ये घेण्याची काळजी, उपचार या सगळ्यांचा सविस्तर मागोवा या पुस्तकामध्ये असणार आहे. अश्विन यांनी संस्कृतमध्ये ‘एमए’, हेल्थ केअर सर्व्हिसमध्ये ‘एमबीए’ केले. अगदी कराटेमध्ये त्यांनी ‘ब्लॅकबेल्ट’ मिळवला आहे. ‘आयुर्वेद आरोग्य’ यावर त्यांचे सव्वातीन हजार लेख प्रसिद्ध झाले आहेत, तर जवळजवळ सगळ्याच चॅनेलवर आयुर्वेदावरच्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले आहेत. देशात खूप कमी ‘आयुर्वेदाचार्य’ आहेत की, ज्यांच्याकडे परदेशातील रुग्ण उपचार घेतात. त्या मोजक्या आयुर्वेदाचार्यांपैकी एक अश्विन आहेत. रुग्णसेवेबरोबरच ते ‘निरोगी मुलुंड’ ही चळवळ राबवतात. दरवर्षी एक आरोग्य समस्या घेतात आणि त्यावर मंथन-जागृती करतात. २०१७ सालापासून त्यांनी जे विषय घेतले, ते पाहू- मधुमेहाचा सामना, गुडघेदुुखी, मन करा रे सक्षम, प्रदूषणजन्य रोगांचा सामना, २१ व्या शतकातील आरोग्य आव्हाने, रक्तक्षय-ॲनेमिया, जीवनशैलीजन्य रोगांमध्ये तृणधान्यांची भूमिका वगैरे वगैरे. तर, आयुर्वेदाचार्य डॉ. अश्विन यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ.
शिवाजी सावंत आणि वसुधा सावंत हे सावंत दाम्पत्य मूळचे रत्नागिरीचे. कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाले. शिवाजी हे खासगी कंपनीत ड्राफ्ट्समन, तर वसुधाबाई या शिक्षिका. घर संस्काराने समृद्ध आणि समाजशील. हेच संस्कार अश्विन यांच्यावर झाले. त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड. त्यावेळी ते विक्रोळीला राहत. त्यांच्या शेजारी अप्पा गोडसे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व राहत असे. अप्पांचे सुपुत्र उपेंद्र हे अश्विन यांचे मित्र, तर अनिरुद्ध यांच्याशीही मैत्री. अप्पांमुळे अश्विन यांनी सावरकरांचे संपूर्ण साहित्य वाचून काढले. देश-धर्म याबद्दलची त्यांची आत्मीयता पक्की झाली. पुढे दहावीनंतर त्यांनी ‘आयुर्वेदा’चे शिक्षण घेतले.
त्यावेळी ‘ॲलोपॅथी’ उपचार करणाऱ्यांची भरभराट होती. मात्र, अश्विन यांनी आयुर्वेदावरच काम करायचे ठरवले. १९९१ साल होते ते. आयुर्वेदानुसार, दशकभर काम केल्यानंतर पुढे २००२ साली त्यांनी मुलुंड येथे स्वतःचे आयुर्वेदिक रुग्णालय उभे केले. यामध्ये राजेश लाड आणि उपेंद्र गोडसे या त्यांच्या मित्रांनी मोलाची साथ दिली. आज मुलुंड (पूर्व) आणि मुलुंड (पश्चिम) अशा दोन ठिकाणी त्यांचे आयुर्वेदिक क्लिनिक आहे. हजारो रुग्णांनी त्यांच्या उपचाराचा लाभ घेतला आहे. ‘कोरोना’ काळातही डॉ. अश्विन यांनी शेकडो लोकांचे समुपदेशन केले. रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून काढा तयार केला. त्यामुळे अनेकांना फायदा झाला. या सगळ्यात त्यांची पत्नी आयुर्वेदाचार्य सुचेता यांचीही भक्कम साथ आहे. ते म्हणतात, “आयुर्वेदाचा अभ्यास करताना देशाचे सर्वच क्षेत्रांतले प्राचीन योगदान ठळकपणे समोर आले. समर्थ, शक्तिशाली देशासाठी देशाचे सर्व नागरिक शरीराने आणि मनानेही सशक्त, समर्थ आणि निरोगी असणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘आयुर्वेद’ हे नेहमीच आधार राहणार आहे. यासाठी आयुष्यभर मी कार्य करणार आहे.” आयुर्वेदाचार्य डॉ. अश्विन सावंत यांच्या कार्याला शुभेच्छा!
9594969638